काव्यरस म्हणजे काय? भाग २ - वर्षा बेंडीगेरी कुलकर्णी, पुणे (ओळख वृत्तबद्ध कवितेची - साप्ताहिक सदर)

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

काव्यरस म्हणजे काय? भाग २ - वर्षा बेंडीगेरी कुलकर्णी, पुणे (ओळख वृत्तबद्ध कवितेची - साप्ताहिक सदर)

काव्यरस म्हणजे काय? भाग एक मागील सोमवारी आपण वाचला. दुसरा भाग आज आम्ही येथे प्रसिद्ध करीत आहोत. आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा...

काव्यरस म्हणजे काय? भाग एक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

३) करूण रस

मानवी मनातील शोक किंवा दु:ख या स्थायी भावनेतून करुण रसाचा उगम होतो. ह्दयाला स्पर्श करणाऱ्या  गोष्टींच्या वर्णनात हा रस आढळतो.  हानीमुळे, वियोगामुळे किंवा संकटमय प्रसंगात,  एकूणच हळव्या मनस्थितीच्या वर्णनातून ही रसनिष्पत्ति होते.

उदा.

हें कोण बोललें बोला? 'राजहंस माझा निजला!'

दुर्दैवनगाच्या शिखरीं। नवविधवा दुःखी आई!

तें हृदय कसें आईचें । मी उगाच सांगत नाहीं।

जें आनंदेही रडतें । दु:खांत कसें तें होई

आई म्हणून कोणी आईस हाक मारी

ती हाक येइ कानी मज होय शोककारी

काव्यरस म्हणजे काय? भाग एक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

४) रौद्र रस

स्थायी भाव क्रोध असतो. हा नऊ रसातला महत्त्वाचा रस आहे. एका व्यक्तीकडून अथवा पक्षाकडून दुसरी व्यक्ती अथवा पक्ष यांचा अपमान होणे. गुरूजनांची निंदा होणे यातून निर्माण झालेल्या  क्रोधाचे, संतापाचे वर्णन यात केलेले असते. शस्त्र चालवणे, दातओठ खाणे, चेहरा लालबुंद होणे अशा भावनांचे वर्णन असते.

उदा.

ओतीत विखारी वातावरणी आग

हा वळसे घालित आला मंथर नाग,

मधुनीच उभारी फणा, करी फूत्कार

ये ज्वालामुखिला काय अचानक जाग

काव्यरस म्हणजे काय? भाग एक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


५) हास्य रस

याचा स्थायी भाव हास्य असतो. या रसात प्रामुख्याने विडंबन, चेष्टा विसंगत यातून निर्माण होणारा विनोद, आनंद याचे वर्णन केलेले असते. विनोदी नाटक, कविता, या सारख्या कलाकृतीमधून हा रस पहायला मिळतो. साहित्य दर्पण मधे म्हंटले आहे 'बागादिवैकृतैश्चेतोविकासो हास इष्यते' म्हणजेच विशिष्ट प्रकारची वेशभूषा, संभाषण, हावभाव  यांच्या वर्णनातून ही रसनिष्पत्ति होते.

उदा. आचार्य अत्रे यांच्या "झेंडूची फुले" यातील विडंबन काव्याच्या काही ओळी

आम्ही कोण? म्हणून काय पुसतां दांताड वेंगाडुनी? ।

फोटो मासिक पुस्तकांत न तुम्ही का आमुचा पाहिला? ॥

किंवा गुच्छ तरंग अंजली कसा अद्यापि ना वाचिला? ।

चाले ज्यावरती अखंड स्तुतिचा वर्षाव पत्रांतुनी? 

काव्यरस म्हणजे काय? भाग एक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

६) भयानक रस

या रसाचा स्थायी भाव भय असतो. जेव्हा एखादी भयप्रद किंवा अनिष्ट घटना किंवा व्यक्ती पाहून किंवा ती परिस्थिती आठवून मनामधे भीती उत्पन्न होते. तेव्हा त्या वर्णनातून भयानक रसाची निर्मिती होते. युद्ध, मृत्यु, खून, सूड, राक्षस, स्मशान इ. च्या वर्णनातून ही रसनिष्पत्ति होते. 

भानुदासांनी भयाचा परिपोष आणि संपूर्ण इंद्रियांचा विक्षोभ  म्हणजे भयानक रस असे म्हंटले आहे. आचार्य सोमनाथ यांनी

'सुनि कवित्त में व्यंगि भय जब ही  परगट होय.

तही भयानक रस बरनि कहै बहै  कवि लोय'

अशी व्याख्या केली आहे.

उदा.

किर्र शांततेमधून

सळसळते भय जडून

थरथरता गूढ भास

सावलीस पांघरून

सोबतीस काळरात्र

भयकंपित गात्र गात्र

तिमिर लाट खळखळते 

दबा धरून संकटात

-वर्षा कुलकर्णी 

काव्यरस म्हणजे काय? भाग एक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

७) बीभत्स रस

स्थायी भाव जुगुप्सा किळस, वीट, तिटकारा, ओंगळवाणी अवस्था अशा वर्णनातून ही रसनिष्पत्ति होते. घृणा उत्पन्न करणाऱ्या वस्तू, परिस्थिती किंवा व्यक्ती यांना पाहून किंवा  यांच्याशी  संबंधित विचार यातून निर्माण होणारी घृणा किंवा किळस अशा पद्धतीचे वर्णन या रसात असते.  बीभत्स रसाला नऊ रसात विशिष्ट स्थान आहे. या रसाची परिस्थिती दुःख उत्पन्न करणारी अशी असते. करुण रस, रौद्र रस, भयानक रस हे याचे सहचर समजले जातात.

उदा.

वस्ती (वृत्त: लवंगलता)

सतत वाढत्या वस्तीमधली नित्याचीच सकाळ 

कडकड हाडांमधून वाजे घामट तेच गुऱ्हाळ 

गालावर शेंबुड सुकलेला वर अश्रुंचे डाग 

गोणपाट पत्र्यांना येते पुन्हा नव्याने जाग 

मलमूत्राचे ओढे त्यातच पेपर, प्लास्टिक, पाणी 

खडखड लोकल शेजारी शौचालय आणिक न्हाणी 

नाल्यावर नाहतात पोरे, खरूजलेली कुत्री 

भडक चेहरा पुसून झोपे कुणी जागुनी रात्री

-निलेश पंडित

काव्यरस म्हणजे काय? भाग एक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

८) अद्भुत रस

याचा स्थायी भाव आश्चर्य असतो. जेव्हा व्यक्तीच्या मनात अद्भुत वस्तू किंवा परिस्थिती पाहिल्यावर विस्मय निर्माण होतो तेव्हा तिथे अद्भुत रसाची निर्मिती होते.

अंगावर रोमांच उभे राहणे, आ वासून बघत राहणे, असे भाव त्यात वर्णन केलेले असतात. अद्भुत रसाच्या वर्णनातून पराकोटीच्या विस्मयामुळे संपूर्ण इंद्रिये प्रभावित होऊन स्तब्ध झाली आहेत असा अनुभव येतो.

उदा.

चांदीच्या झाडामागे चांदोबा राहातो

मोत्याच्या फुलातुन लपाछपी खेळतो

उंच उंच झोक्याला खेळ रंगला रद्द

मैनेचा पिंजरा वर टांगला

किती किती सुंदर चॉकलेटचा बंगला

चंदेरी सोनेरी चमचमता चांगला ॥

काव्यरस म्हणजे काय? भाग एक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

९)  शांत रस

 या रसाचा स्थायी भाव उदासीनता असतो.

ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर, संसारातून वैराग्य प्राप्त केल्यानंतर, परमात्माच्या रूपाचे दर्शन घडल्यानंतर मनाला ज्या शांतीची अनुभूति होते तेव्हा शांत रसाची उत्पत्ती होते. जिथे ना दुःख ना द्वेष ना मोह फक्त आणि फक्त केवळ शांतता आहे असे वर्णन आलेले असते. ह्या रसात प्रामुख्याने भक्ती ही भावना असते. देवालये, आश्रम याठिकाणी शांतता असते. हा रस भूपाळी, अभंग यात असतो.

"शांतोsपि नवमो रसः"नवरसातला शेवटचा रस म्हणून शांतरसाचा उल्लेख केलेला आहे.

भरतमुनींच्या नाट्यशास्त्रातील रसांबद्दलच्या विवेचनात आठ रसांच्या बाबतीतच वर्णन केलेले आढळते. शृंगार, वीर रसांच्या विभाव अनुभाव संचार भाव यांचे निरुपण केले आहे. पण शांत रसाला मान्यता दिलेली आढळत नाही.

उदा.

आता विश्वात्मके देवे । येणे वाग्यज्ञे तोषावे ।

तोषोनि मज् द्यावे । पसायदान् हे ।। 

जेखळांचि व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी रति वाढो । 

भूतो परस्परे पडो । मैत्र जीवांचे ।

काव्यरस म्हणजे काय? भाग एक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

एकूणच या नवरसांच्या अभ्यासातून आणि त्याविषयी अधिकाधिक जाणून घेतल्यानंतर काव्याची व्यापक ओळख व्हायला निश्चितपणे मदत होईल...




वर्षा बेंडीगेरी कुलकर्णी, पुणे 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या