अखिल भारतीय भिक्खू संघाचे महाराष्ट्र प्रदेश सल्लागार, धम्म संस्कार वर्गाचे प्रवर्तक, बालक संस्कार वर्गाचे निर्माते, दैनिक वृत्तरत्न सम्राटचे स्तंभलेखक पू. भदंत अश्वजीत थेरो यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त आंबेडकरी पत्रकार तथा समीक्षक आनंद चक्रनारायण यांचा लेख...
तथागत बुद्धांपासून चालत आलेल्या आणि बाबासाहेबांपर्यंत विसावलेल्या धम्मशब्द साहित्य परंपरेत अनेकांचे हात त्यांच्या लेखणीने झिजले आहेत. या झिजलेल्या लेखनिक परंपरेतील महत्वाचे लिपीकार म्हणुन पुज्य भदंत अश्वजित थेरो यांचे नाव आपणांस आदराने घ्यावे लागेल. आज त्यांचा तिसरा स्मृती दिन. त्यांच्या जाण्याने गेल्या पाच दशकांपासून अव्याहतपणे बुद्ध, धम्म संघ आणि आंबेडकरी विचारानं झपाटलेली लेखणी शांत झाली. मृत्यूसमयी ते हसतमुखाने काळाला सामोरे गेले होते. जिवंतपणी तर ते अक्षराचे सम्राट होतेच परंतु मृत्यूंनंतर ते मृत्यूला हरवणारे अजरामर लेखणी सम्राट झाले. दैनिक वृत्तरत्न सम्राटमध्ये गेल्या 19 वर्षापासून सातत्याने ते लेखन करीत होते. निधनानंतरही त्यांचे लेख दै. सम्राटने सातत्याने प्रसिद्ध करून त्यांच्या विचारांची चळवळ जिवंत ठेवण्याचे काम केले. एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर त्याची लेखन परंपरा एखादा दैनिकाने जिवंत ठेवणे हे एक अद्वितीय उदाहरण होय.
दैनिक सम्राटचा वीस वर्षाचा काळ आणि त्यापूर्वीचा अनेक दैनिकात लिहिण्याचा काळ जर आपण मोजला तर साधारणपणे तो पन्नास वर्षांचा असेल. मृत्यूसमयी वय 65 वर्षे आणि लिहिण्याचा काळ 50 वर्षे. म्हणजे या व्यक्तीने आपल्या आयुष्यातील 80% काळात फ़क्त लेखणी झिजविली आणि ती लेखणी केवळ धम्मचळवळ आणि आंबेडकरी चळवळीसाठी वाहिली. कधीही या लेखणीने मनोरंजन केले नाही. ही लेखणी स्वप्नरंजनात गुंतली नाही. ज्या प्रमाणे सम्राट अशोकाने शिलालेख करवून तथागत बुद्धांची वचने आपल्यापर्यंत पोहोचविली त्याचप्रमाणे काही कमी उणे अधिक प्रमाणात पुज्य भदन्त अश्वजित थेरो यांनी आपल्या पेनरुपी लेखणीने नव आंबेडकरी वाचकांना वाचते केले आणि लेखकांना लिहिते केले.
दैनिक सम्राट आणि भन्ते अश्वजीत यांचे एक अतुट नाते होते. ज्या गावामध्ये ते धम्मसंस्कार वर्ग घेण्यासाठी जात असत त्या विहारामध्ये तसेच गावातील, नगरातील लोकांना दैनिक सम्राटचे वर्गणीदार व्हायचे सांगत असत. वर्गणीदार करण्यावरच ते थांबत नसत तर दररोज प्रसिद्ध होणार्या लेखकांच्या लेखांची जाहीरपणे बोद्ध विहारातुन वंदना झाल्यानंतर वाचन करीत असत. त्यांच्या अशा प्रकारच्या प्रयोगामुळे नवलेखांना प्रेरणा तर मिळतच होती त्याबरोबरच उपासक-उपासिकांच्या ज्ञानातही भर पडत असे. तसेच ज्या-ज्या गावांमध्ये वास्तव्यास होते त्या-त्या गावांतील उपासक-उपासिकांना सम्राट पेपरचे वाचन सुरू आहे ना? असे फोन करून विचारायचे. दैनिक वृत्तरत्न सम्राट परिवाराशी त्यांचे केवळ अतुट नातेच निर्माण झाले नव्हते तर भन्ते अश्वजीत हे दैनिक वृत्तरत्न सम्राटच्या वाटचालीतील धम्मलेखाचे लिपीकार होते.
भन्ते अश्वजीत यांनी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये धम्मसंस्कार वर्ग राबविले. खडु आणि फळा हातात घेवून तरूण पिढीला दिशा देण्यासाठी धडपडणारे भदंत अश्वजीत थेरो हे समस्त चळवळीचे आदर्श होते. गावोगावी पायदळ फिरून धम्मप्रवचन देऊ लागले. जे मिळेल ते आणि जसं मिळेल तसं फ़क्त जगण्यासाठी आणि जिवंत राहण्यासाठी खाऊ लागले आणि या सगळ्या प्रवासात वेळातला वेळ काढून आपलं लिहिण्याचं कौशल्य अबाधित ठेवत आपले लेख दैनिक वृत्तरत्न सम्राटसह अनेक ईतर वर्तमानपत्रात देऊ लागले. भन्ते अश्वजित गावागावातील लहान मुलांच्या मनावर बुद्ध धम्माचे संस्कार रुजवू लागले. त्यांनी गावागावात विहारा-विहारात 'धम्म संस्कार वर्ग' सुरू केले. या संस्कार वर्गाना अतिशय चांगला प्रतिसाद मिळू लागला. भदन्त अश्वजित थेरो सतत बिझी असल्यामुळे त्यांचा अमुल्य वेळ सत्कारणी लागू लागला. त्यांच्या धम्म संस्कार वर्गाचा आवाका 32 गावांना वेढा घालून गेला. त्यांचा दैनिक वृत्तरत्न सम्राट मधील प्रसिद्घ झालेल्या लेखांचा संग्रह ‘चरथं भिक्खवे चारिकं’ आणि ‘धम्मसागरातील शंखशिंपले’ या दोन्ही पुस्तकांना महाराष्ट्र तथा देशभरातुन चांगला प्रतिसाद मिळाला. त्या आधी त्यांच्या कवितांचा संग्रह ‘हरवलेला अर्थ’ यालाही वाचकांची खुप पसंती मिळाली होती.
पुज्य भदंत अश्वजित थेरो आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत धम्म आणि समाज कार्यासाठी झटले. सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने त्यांनी लेखन केले. बालक वर्गाला, तरूणांना केंद्रबिंदु मानून त्याच्यावर जोपर्यंत चांगले संस्कार निर्माण होणार नाहीत तो पर्यंत एक आदर्श समाज आपल्याला निर्माण करता येणार नाही, हा एककलमी कार्यक्रम हाती घेवून भन्ते अश्वजीत यांनी चरथं भिक्खवे चांरिंक, बहुजन हिताय बहुजन सुखाय, ही धममगाथा पहिल्यांदा स्वतः अंगिकारली व त्यानंतर त्यांनी महाराष्ट्रभर एक पॅटर्न उभा केला, जो खर्या अर्थाने बौद्ध/आंबेडकरी चळवळीकरीता मैलाचा दगड ठरला आहे. भन्ते अश्वजीत यांचा आज तिसरा स्मृतीदिन आहे. त्यांच्या या स्मृतीदिनी त्यांनी एक आदर्श समाज निर्माण करण्याचे जे ध्येय ठरवले होते त्या दिशेने वाटचाल करण्याचा संकल्प करूया, हीच भंन्ते अश्वजीत थेरो यांना खरी आदरांजली ठरले !
त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन...! त्यांच्या पंचधम्मक्खन्धास सदगति लाभो.
अनिच्चा वत सन्खारा
उप्पाद वय धम्मिनो
उप्पज्जित्वा निरुज्झन्ति
तेसं वूप समो सुखो
आनंद दिवाकर चक्रनारायण
मो 7058630366


1 टिप्पण्या