बाळासाहेब आंबेडकर हे डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत. ते केवळ वंश परंपरा म्हणून, जैविक म्हणून नाहीत, केवळ रक्ताचे नाहीत तर वैचारिक वारसा चालविणारे आहेत. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ बौद्धांचे आहेत असे गेल्या 70 वर्षापासून चालत आलेल्या परंपरेला छेद देउन ते अखिल भारतीय आहेत, इथल्या दलित, आदिवासी, ओबीसी, भटक्या विमुक्तांचे आहेत, वारक-यांचे आहेत. हे क्रांतीकारी कार्य केवळ आणि केवळ श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनीच आतापर्यंतच्या 40 वर्षाच्या राजकारणातून, समाजकारणातुन, सांस्कृतिक चळवळीतुन दाखवून दिले आहे. बौद्ध वाड्यातुन डाॅ. बाबासाहेब आंबेडकर काढून विठ्ठलाच्या मंदिरात घेऊन गेले. हा क्रांतीकारी इतिहास पुढच्या पिढ्यांसाठी अनुसरणीय राहील.
विरोधकांनो! तुम्ही बौद्ध म्हणून जन्माला आले किंवा नंतर झालेले दीड शाहणे तुम्ही चिकित्सक होऊ शकत नाही. आदर्श होऊ शकत नाही. मात्र तुम्ही करंटे होऊ शकतात. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांसोबत वारकरी जर सहप्रवास करायला तयार असेल तर हा आंबेडकरी चळवळीचा सर्वांत मोठा विजय आहे. जातीअंताच्या लढाईला हातभार लावायला खुप मोठा आधार आहे. एकीकडे भारत बौद्धमय करायचा आहे तर 22 प्रतिज्ञेने होणार आहे का? शेवटी धम्माचे उद्धिष्ट काय आहे तर ‘जगाची पूर्नरचना करणे’ तर मग कशी करणार जगाची पूर्नरचना हे विरोध करणारे सांगू शकणार आहेत का? साधं पंचशीलाचे पालन न करणारे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांना टीकेचा धनी ठरवत आहेत. या विरोधकांना नैतीक अधिकार आहे का?
25 डिसेंबर 1955 रोजी देहू रोड येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या हस्ते बुद्ध मुर्तीची पहिल्या बौद्ध विहारामध्ये स्थापना करतांना बाबासाहेब म्हणाले होते की, ‘‘पंढरपूर येथे बौद्ध धर्माचे देवालय होते. हे मी सिद्ध करून देईन. पुंडलीक या शब्दापासून पांडुरंग हा शब्द तयार झाला. पुंडलीक याचा अर्थ कमळ.’’ याविषयी त्यांना शोधप्रबंध लिहायचा होता. मार्च 1955 ला लोणावळा येथे असतांना त्यांनी पांडुरंगावर शोध प्रबंध लिहायला सुरूवात सुद्धा केली होती. त्याचे चार पाच भाग त्यांनी लिहिले परंतु त्याच्या व्यस्ततेमुळे तो पुर्ण झाला नाही. ‘‘पंढरपुरच्या विठोबाची मुर्ती ही वस्तुतः बुद्धाची आहे.’’ हे सप्रमाण त्यांना सिद्ध करून दाखवायचे होते. परंतु ते झाले नाही. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे हे ऐतिहासिक अपूर्ण राहीलेले कार्य प्रत्यक्ष कृतीतुन आणि आंदोलनातुन पुढे नेणारे नवनायक श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे नवयान हेात. ज्यांना इतिहास माहिती असतो तेच इतिहास घडवित असतात. ज्यांना माहितच नाही. ते अज्ञानी विचारवंत वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकत्र्यांना भक्त म्हणून हिनवत आहेत. ते भक्त नसून आंबेडकरी चळवळीचे शिलेदार आहेत. नवक्रांतीचे वाहक आहेत.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली महान तत्वे स्वातंत्र्य, समता, बंधूत्व, न्याय ही लोकशाही वृद्धीगत करणारी आहेत. पंढरपूरच्या आंदोलनाने जातीयवादाला मुठमाती देऊन बंधूता निर्माण केली. भातृभाव समाजामध्ये निर्माण केला. कोरोनामुळे जे लोक उपाशी मरणार आहेत त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. धर्मनिरपेक्षता ही कशी असावी याचा उत्तम आदर्श घालून दिला. जात आणि धर्माच्या पलिकडे जाऊन मानवता निर्माण करण्याचा एक नवआदर्श घालून दिला. जात आणि धर्माने जे स्वातंत्र्य हिरावून घेतले होते त्याला वाट दाखविण्याचा मार्ग या आंदोलनाने घालून दिला. डिकास्टिंगच्या पुढे घेऊन जाणारे हे आंदोलन होते. विरोधक जे ओरडत आहेत. ते गाढवाच्या कर्कश आवाजासारखेच व्यक्त होत आहेत. त्याला वैचारीक पाश्र्वभूमी नाही. नैतीकतेचे मुल्य, सभ्यतेचे मुल्य पायी तुडवून जातीयवादी दिंडीत सहभागी झाले आहेत. पंढरपूरचे आंदोलन हे वैदिक परंपरेला एक हादरा होते. संत परंपरेला विरोध करणारे या आंदोलनाने गार झाले. या युद्धामध्ये आपले मित्र कोण? आणि शत्रु कोण? हे ओळखून पुढील वाटचाल करावी लागणार आहे. या आंदोलनामुळे बौद्धांना आयसोलेट होण्यापासून वाचविण्यात श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यशस्वी क्रांतीनायक आहेत. सलाम बाळासाहेब!
प्रा. भारत सिरसाट, औरंगाबाद
मो. नं. 9421308101
प्रा. भारत सिरसाट हे आंबेडकरी चळवळीचे राजकीय भाष्यकार असून फुले-शाहु-आंबेडकर विद्वत सभेचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष आहेत.
0 टिप्पण्या