या जगातील अखिल मानव जातीचे गुरु, अखिल मानव जातीचे शास्ता आणि अखिल मानव जातीचे मार्गदर्शक तथागत भगवान बुद्ध महामंगल सुत्तामधील पाचव्या गाथेत अस म्हणतात,"मातापितु उपट्ठानं पुत्तदारस्स संघहो अनाकुलाचं कंमत्ता एतं मंगल मुत्तमं!" म्हणजेच आई-वडिलांची सेवा करणे, बायकोमुलांचा सांभाळ करणे आणि सरळ मार्गाने कुशल कर्म करणे, हे उत्तम मंगल होय. बुद्ध आणखी एका ठिकाणी असे म्हणतात,"मानव जन्म दुर्लभ आहे!" आणि हा मानव जन्म आम्हाला आमच्या मात्यापित्यापासून मिळालेला आहे. म्हणून प्रत्येक मानवाने स्वतःला धन्य समजलं पाहिजे की तो माणूस म्हणून या भूमीवर जन्माला आला आहे. आणि धन्य समजलं पाहिजे त्या माता-पित्यांना की, त्यांच्यामुळेच आमचा या जगात माणूस म्हणून जन्म झाला आहे. आणि सर्वात स्वतःला धन्य यासाठी समजले पाहिजे की, या जगातील सर्वात श्रेष्ठ,सर्वात पवित्र आणि तात्काळ फळ देणाऱ्या बौद्ध धम्मात माझा एक उच्च जातीचा माणूस म्हणून झाला आहे.
याठिकाणी आपण एकाच वाक्याचा अर्थ पाहू तो म्हणजे आईवडिलांची सेवा करणे. तर माता-पित्यांची सेवा कशी करावी. यासंदर्भात तथागतांनी सिगालो नावाच्या तरुणाला सहा दिशांची पूजा कशी करावी. यासंदर्भात मार्गदर्शन करतांना सांगितलेले की, पूर्व दिशा आई-वडिलांना मानुन त्यांची पाच प्रकारे पुजा करावी.
१) आपल्या बालपणात जसे त्यांनी पालन केले त्याप्रमाणे त्यांची सेवा करावी.
२) त्यांची सर्व प्रकारे काळजी घ्यावी.
३) त्यांची कुळ परंपरा चालवावी.
४) वारसाधिकाराला लायक बनावे.
५) मृत पावलेल्या आई-वडिलांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करून त्यांचे स्मरणार्थ दान करावे.अश्या प्रकारे आम्ही मातापित्यांची सेवा केली की, मातापिता आमच्यावर पाच प्रकारची अनुकंपा करतात.
१) ते आपल्या मुलांना पाप कृत्यापासून वाचवतात. आणि सत्कार्य करण्याची सतत प्रेरणा देतात.
२)ते आपल्या मुलांना चांगल्या प्रकारे शिक्षण देतात.
३)ते आपल्या मुलांचे विवाह संबंध योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी जुळवून आणतात.
४)ते आपल्या मुलांची प्रगती सतत तपासतात.
५) आपण संचित केलेली संपत्ती व इतर वारसा योग्य वेळी मुलांच्या स्वाधीन करतात. त्यासाठी आमचेही कर्तव्य आहे की,आम्ही सुध्दा स्वयंप्रेरणेने खालील गोष्टी केल्या पाहिजे .
१)त्यांचे उपस्थितीत आपला मोबाईल फोन दूर ठेवावा.
२)ते काय म्हणतात त्यावर लक्ष द्यावे .
३) त्यांचा सल्ला मानावा.
४) त्यांच्याशी बोलतांना सांभाळून बोलावे.
५) त्यांना सन्मान द्यावा आणि सन्मानाने त्यांच्याकडे पहावे.
६) त्यांची नेहमी प्रसंशा करावी.
७) त्यांना चांगला समाचार जरूर सांगावा.
८) त्यांना वाईट बातमी देण्यापासून स्वतःला आवरावे .
९) त्यांचे दोस्त आणि प्रियजनांशी सौजन्याने वागावे.
१०) त्यांनी केलेली चांगली कामे सदैव लक्षात ठेवावी.
११) एकच गोष्ट ते पुन्हा पुन्हा सांगत असतील तरी ती मन लावून ऐकावी.
१२) त्यांच्या उपस्थितीत कानफुशी करू नये.
१३) त्यांच्यासोबत मानाने बसावे.
१४) त्यांचे विचार वाईट आहेत असे म्हणून त्यांची खिल्ली उडवू नये.
१५) त्यांचे बोलणे मध्ये छाटु नये.
१६) त्यांच्या वयाचा सन्मान करावा.
१७) त्यांच्यासमोर त्यांच्या नातवांना मारणे किंवा शिक्षा करणे असे प्रकार करू नये.
१८) त्यांच्या सल्ल्याचा आदर करावा.
१९) त्यांच्या नेतृत्वाखाली कोणती गोष्ट करावी.
२०) त्यांच्यासोबत कठोर आणि उंच आवाजात बोलू नये.
२१) त्यांच्या समोरून अथवा त्यांचे पुढे पुढे कधी चालू नये.
२२) त्यांच्या आधी जेवण करू नये.
२३) त्यांना रागाने कधीच पाहू नये .
२४) त्यांचे समोर आपले पाय आणि पाठ होतील असे कधी बसू नये.
२५) त्यांची बदनामी करू नये आणि दुसऱ्याने केल्यास त्या समर्थन देऊ नये.
२६) त्यांना आपले वंदनेत सामील करून घ्यावे.
२७) त्यांच्या उपस्थितीत आपल्या दुःखाचे प्रदर्शन करू नये.
२८) त्यांच्या चुकांवर हसू नये.
२९) ते बोलण्या आधीच त्यांचे काम करावे.
३०)आपले किंव्हा त्यांचे काही काम असेल तर त्यांना आपल्यापर्यंत न बोलावता आपण त्यांच्यापर्यंत जावे. ३१) त्यांच्याशी बोलतांना सजग व सावध असावे.
३२) आपला कोणताही निर्णय त्यांना विचारूनच घ्यावा.
अश्या पद्धतीने आपण वागलो तर खऱ्या अर्थाने त्यांना अभिमान वाटेल असे त्यांचे पुत्र बनू शकतो.दुसरी गोष्ट एक लक्षात ठेवावी ती ही की, खऱ्या अर्थाने ज्याला आईवडील आहेत तो सर्वात श्रीमंत असतो. ज्याच्यावर आईवडिलांची अनुकंपा असते तो सर्वात सुखी असतो. जो आईवडिलांची मनोभावे सेवा करतो तो आदर्श मुलगा असतो. ज्याच्यावर मायबाप कोपत नाहीत तो सर्वात गुणवान मुलगा असतो. ज्याला आईवडीलांची किंमत कळाली तो सर्वात यशस्वी मुलगा असतो. आणि जो आईवडिलांची स्वप्न पूर्ण करतो तो सर्वात महान असतो.
आणखी पुन्हा एक बाब इथे लक्षात असू द्यावी ती ही की, जो आईवडीलांशी उद्धट वर्तन करतो, त्यांचे अजिबात ऐकत नाही, त्यांच्याशी सारखा भांडतो आणि वेळप्रसंगी त्यांना मारहाण करतो तो सर्वात मूर्ख आणि पापी मुलगा असतो. आणि सरते शेवटी आईवडिलांना पोसण्याची ऐपत असतांना. ज्याचे मायबाप वृद्धाश्रमात असतात तो सर्वात नालायक मुलगा होय. म्हणून वरील पैकी आम्हाला त्यांचा कोणता मुलगा बनायचे आहे. हे ज्याच्या त्याच्या हातात आज आहे; उद्या नाही.
सर्वांचे मंगल हो!
0 टिप्पण्या