हाथरस हत्याकांड: चौकीदार बदलण्याची वेळ आली आहे ; प्रा. प्रकाश इंगळे
औरंगाबाद/प्रतिनिधी :- उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात घडलेली घटना माणुसकीला काळीमा फासणारी असून चौकीदार इमाने इतबारे काम करीत नसेल तर त्याला बदलण्याची हीच खरी वेळ असल्याची प्रतिक्रिया सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे प्रदेश महासचिव प्रा. प्रकाश इंगळे यांनी दिली आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्रा. इंगळे म्हणाले की, या देशामध्ये मनुवादी व्यवस्था लादण्याचे काम भाजपा सरकार करीत असून त्याविरोधात उभं राहण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. एकत्रीत लढ्यातुन ही सत्ता उलथून टाकायला वेळ लागणार नाही. हाथरस प्रकरणाची चुकीच्या पद्धतीने कागदपत्रे तयार केली जात असून आरोपींना पाठीशी घालण्याचे काम पोलीस आणि राज्यसरकार करीत आहे.
पैसे वाटप करून घाव मिटवता येणार नाही.
योगी सरकारने या प्रकरणी पिडित तरूणीच्या कुटुंबीयांना 25 लाख रूपयांचा निधी जाहिर केला. त्यावर बोलतांना प्रा. इंगळे म्हणाले की, ऐकीकडे अन्याय करायचा, अत्याचार करायचा आणि दुसरीकडे पैसे वाटायचा ही लोकशाहीला घातक असलेली पद्धत रूढ करण्यामागे मनुवादी शक्तींचा हात असून अशा प्रकारचे हल्ले सहन केल्या जाणार नाहीत असा इशारा यावेळी प्रा. प्रकाश इंगळे यांनी दिला आहे.


0 टिप्पण्या