Marathi Sahitya Warta
(कवितेशी गप्पा... कॅफेतून हे सदर आम्ही आजपासून मराठी साहित्य वार्ताच्या वाचकांसाठी सुरू करीत आहोत. या सदराद्वारे प्रसिद्ध फोटोग्राफर तथा चित्रकार सायली घोटीकर या लेखन करणार आहेत. ज्येष्ठ कवी अरूण म्हात्रे यांच्या मार्गदर्शनात सुरू झालेल्या कवितेशी गप्पा... कॅफेतुन या उपक्रमाचे अनुभव आपल्याला या सदरातून वाचायला मिळणार आहेत. या कार्यक्रमाचे दिग्दर्शन प्रसिद्ध कवी संकेत अरूण म्हात्रे यांनी केले असून सदरील कार्यक्रमाची लिंक खाली दिली आहे. आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा...)
मी एक कलाकार... फोटोग्राफर आणि चित्रकार. त्याबरोबर लिहितेही कधीमधी. कविता कॅफे बघायला मिळाले youtube वर. आणि खूप आवडलं. एक तर सुंदर कविता. आणि त्यांचं तितकच सहज, सुंदर आणि पारदर्शी चित्रण. वाटलं. हा अनुभव इतरांबरोबर share करावा. वाटून घ्यावा. म्हणून कविता कॅफे बद्दल थोडंसं...!
आभाळ निळे फडफडते माथ्यावरी...
स्क्रीन डोळ्यांसमोर येतो आणि एक शांत निरव वातावरण दिसतं... एक खुर्ची असते समोर, तिलाही तिचं व्यक्तिमत्त्व... पक्ष्यांचा सुंदर किलबिलाट आणि बर्डस आय व्हिऊ. तटस्थपणे बघतोय आपण या सगळ्यांकडे, कवीच्या नजरेतून. झाकोळून आलेलं निळं सावळं आभाळ सांगत जातं, कवी एकटा आहे तिथे ते. पण ते एकटेपण आनंददायी असणार नक्कीच. असं म्हणतात की चित्रकाराला खरं खुललेलं बघायचं असेल तर त्याच्या स्टुडिओत नकळत जावं. जेव्हा त्याची समाधी लागलेली असते. "कविता कॅफे पर्व २" बघताना अगदी हाच अनुभव आला मला. कॅमेरातून मध्ये एक पाऊल वाट दिसते आणि एका बाजूला बहरलेली शेतं. दुसऱ्या बाजूला पाणी आहे अथांग... माहित नसलेला भविष्यकाळ. आणि त्या सगळ्यात मिळून एकजीव झालेला कवी. हजारो पक्ष्यांच्या किलबिलाटातून निळे आभाळ दिसतंय कवीला. स्क्रीनवर त्यांच्या मनातलं निळं आभाळ, तसं प्रत्येकाचच एक स्वत:चं आभाळ असतं आणि स्वत:चा निळा रंग पण असतो. कोणाला तो व्हिन्सेंटच्या चित्रात भेटतो तर कुणाला पिकासोच्या ब्लू पिरेड मध्ये दिसतो. तसं मनाचा, दृश्यांचा आणि त्यातून अंतर्मनावर उमटणाऱ्या प्रतिमांचा संवाद असतोच ना कुठेतरी. कवीचं हे आभाळ त्याच्या बालपणातलं, कवी त्याच्या जगात आहे, त्याच्या आठवणीत रामलाय, गुलाबी झाक असलेलं वातावरण... काहीतरी गोड आठवणींत तो रमलाय असं जाणवतं... हळूहळू ग्रे कडे झुकत चाललंय ते आभाळ आता. हा रंगांचा खेळ डिरेक्टर कॅमेरातून इतक सुंदर टिपतो. की जणू आपण कविताच वाचतोय. कवीच्या मनात दाटून आलेल्या मोत्यांची कणसं डुलतायत. आणि आठवणी शीळ घालत बोलावतायत. स्क्रीन आता ग्रे कडे झुकतो. हा ग्रे रंग खूप जवळचा... आठवणी दाटून आल्या की मनावर तो असा बेमालूम पसरतो की तो हुरहूर लावतोच... त्याच्या डोळ्यात आहे त्याच्या वहीतला शाळेचा शिल्लक गाव. हा अनुभव "फक्त" त्याचा... तो जर तो आपल्यासमोर Present करायला लागला तर त्यातला निर्मळपणा कुठेतरी लोप पावेल. कृत्रिम होईल. तो आपल्यासाठी गात नाहीये त्याच्याच विश्वात आहे. हिरवा रंग डोकावतोय मधेच... त्याच्या बालपणातील गावाचा. तिचे आभास बोलवतात त्याला... कदाचित इतक्या दूर गेलेल्या पुसत होता होता परत एकदा गडद झालेल्या आठवणी, त्याच आता वयाच्या संध्याकाळी गतजन्मातल्या वाटत असतील. ती दूरवर जाणारी पाऊलवाट डिरेक्टरने इतकी सुंदर पकडलीये. ती आपल्याला तिकडे थेट घेऊन जाते. आपण आपल्या तंद्रीत चालत असावं, आपलाच रस्ता जणू आपला मित्र, आपलाच प्रवास आणि या सगळ्याची एक कविता फुटावी मनाला. ती आपल्याच तोंडातून गायली जावी... आपल्यासाठी. फक्त आणि फक्त आपल्यासाठी... मग ती पोचते समोरच्यापर्यंत थेट आपल्याला जाणवते तशी. Feel होते समोरच्याला तश्शीच. डिरेक्टरच्या या कसबाला सलाम!
हिरवा रंग आता स्क्रीन वर दिसायला लागतो. कशी मजा असते नाही, सगळ्यांचं या हिरव्या रंगाशी बालपणी आणि तारुण्याशी जोडलेले नातं. नव्हाळीचा रंग हा... हाताला लागून राहतो जन्मभर. कधीच साथ सोडत नाही. तो नितळ पणा पण तिच्या आभासांचाच. आत्ता पकडायला गेलो तर आपलेच हात हिरवे होतील जणू. म्हणूनच कवीला ही माणसाचा स्पर्श ना झालेली निरागस वेळ थांबवून ठेवतेय. मोठे तर काय आपण सगळेच होतो पण सगळ्यांना शेतात लावलेल्या कणसाचे दिवे नाही दिसत. त्यासाठी कवीचा जन्म घ्यावा लागतो. वेडं वेडं व्हावं लागत. नवजात राहाव लागतं, आजूबाजूचं जग कितीही बदललं तरी. आणि ती भावना अशी आपल्यापर्यंत त्याच अलवारपणे पोचवणारा हा डिरेक्टर... संकेत म्हात्रेने हे इतकं नाजूक सादरीकरण केलय की तेच एखाद्या कवितेसारखं आहे. एखाद्या हाताने बनवलेल्या सुंदर कलावस्तूला प्लॅस्टिकमध्ये गुंडाळून भेट देणं विचित्रच. त्या वस्तूसाठी तितकाच नाजूक सुंदर तलम कागद हवा. संकेतला मिळालाय तो कागद.!!!
सादरीकरण : अरुण म्हात्रे
दिग्दर्शन : संकेत म्हात्रे
- सायली घोटीकर
sayali.ghotikar@gmail.com

0 टिप्पण्या