Damodar More's poetry created a linguistic and cultural bridge - Dr. Shripal Sabnis
Social24Network
'संविधानाच्या गाभ्याला स्पर्श करणारी कविता लिहिणारे दामोदर मोरे हे युनीक कवी आहेत. महाराष्ट्राच्या नकाशात जन्माला येऊन दिल्लीच्या साहित्यिक सिंहासनापर्यंत ते पोहोचले आहेत. काळजाला चिरत जाणारी आणि देशभक्तीने न्हाऊन निघालेली त्यांची कविता फुले - आंबेडकरांची वंशधर आहे. त्यांच्या मानवतावादी कवितेने मराठी हिंदीत भाषिक आणि सांस्कृतिक सेतू निर्माण केला आहे.' असे प्रतिपादन ख्यातनाम साहित्यिक डाॅ. श्रीपाल सबनीस यांनी केले. लखनऊ विद्यापीठाचे प्रोफेसर डाॅ. कालीचरण स्नेही यांनी संपादित केलेल्या 'दामोदर मोरे की कविता में आंबेडकरवादी दृष्टि' या ग्रंथाच्या लोकार्पण समारंभात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे हिंदी विभागाध्यक्ष डाॅ. अर्जुन चव्हाण हे होते.
या वेळी प्रमुख वक्ते म्हणून बोलतांना प्राचार्य डाॅ. प्रकाश राठोड म्हणाले की, दामोदर मोरे यांची कविता सामाजिक क्रांतीचा जागर मांडणारी, नव्या मूल्यांची सूर्यकुळाची कविता आहे. सामान्य माणसांच्या मार्गातील काटे वेचून फुले अंथरणारी करुणा या कवितेत आहे. या कवीचं वाङमयीन चारित्र्य या ग्रंथात मांडलं गेलं आहे.'
आपल्या मनोगतात कवि दामोदर मोरे म्हणाले, शिदोड मधोमध उचलला तर तो खाली लोंबतो. अशी लिबलिबीत कविता मला आवडत नाही. अस्सल नाग मधोमध उचलला तर तो जसा फुत्कारतो, तशी माझी आंबेडकरवादी कविता सामाजिक कुरुपतेला दंश करते.'
अध्यक्षीय भाषणात प्रो. डाॅ. अर्जुन चव्हाण म्हणाले की, आंबेडकरवादी दृष्टी म्हणजे समतेची दृष्टि, बंधुभावाची दृष्टी, न्यायाची दृष्टी आणि मानवतावादी दृष्टी. या आंबेडकरवादी दृष्टीचे दर्शन दामोदर मोरे यांच्या कवितेत घडते. मराठी साहित्य आणि सांस्कृतिक चळवळीचे अग्रगण्य मुखपत्र मराठी साहित्य वार्ता फेसबुक पेजवर संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवयित्री कविता मोरवणकर यांनी केले.
Damodar-More's-poetry-created-a-linguistic-and-cultural-bridge-Dr-Shripal-Sabnis


0 टिप्पण्या