अनुसूचित जाती जमाती, मागासवर्गीय, भुमीहीन मजुर, बांधकाम मजुरांचे विजबील 100 टक्के माफ करा...! पॅथर दीपक केदार यांची मागणी
Social24Network
मंत्रीपदाची शपथ घेतांना उर्जामंत्री नितीन राऊत यांनी ‘‘जयभीम’’चा नारा दिला होता. आज लॉकडाऊनमुळे सर्वांत जास्त नुकसान हे वंचित समूहाचे झाले आहे. कामगारांचे झाले आहे. त्यांना वाढीव बील देवून भरण्याची सक्ती करणा-या नितीन राऊत यांनी मंत्रीपदाची शपथ घेतांना घेतलेल्या घोषणेला तरी जागून निर्णय घ्यावा, असा टोला ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी उर्जामंत्री नितीन राऊत यांना लगावला आहे.
सोशल 24 नेटवर्कशी बोलतांना दीपक केदार म्हणाले की, जैविक संकटाने देशात थैमान घातले आहे. कोरोना महामारी आणि लॉकडाऊन हे गरीबांच्या मुळावर उठलेली संकट आहेत. यात खऱ्या अर्थाने अनुसूचित जाती जमातीचे मागासवर्गीय यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणी निर्माण झाल्या. भुमिहीन मजुर कामगारांच्या हाताचे काम गेले. त्यात वाढीव वीजबील नावाचं अजगर पुढे उभा राहिलं आहे. महाविकास आघाडीचे हे सरकार आधी धीर देईल म्हणुन दिवस मारुन नेले आणि आता अचानकपणे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी अंग काढुन वीजबील वसुलीचे आदेश दिले. यामुळे महाराष्ट्रातील जनतेमध्ये संताप आहे. आजवर जैविक कोरोनाशी झुंज दिली आता सरकारी दमनशाही कोरोनाशी जनतेला झुंज द्यावी लागणार आहे. ऑल इंडिया पँथर सेना ऊर्जामंत्री नितीन राऊन यांना जाहिर आवाहन करते की, ज्या पध्दतीने शपथ वेळी जयभीम म्हणत शपथ घेतली. जयभीम घोषणेला जागा आणि अनुसूचित जाती जमाती मागासवर्गीय, भुमीहीन मजुर, बांधकाम कामगार मजुर यांचे १०० टक्के वीजबील माफ करा. तो आज मरण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे, त्याच वीजबील माफ करुन त्याला धीर द्या!
वीजबील वसुलीचा नियम बदलण्याची गरज आहे. ऑनलाईन वीजबील भरत असतांना ज्यांना जेवढं भरायचं तेवढं भरण्याची सोई उपलब्ध करुन दिली पाहिजे. जेणेकरुन वीजबील भरणारे स्वत: टप्प्या टप्याने वीजबील भरत जातील. अचानक अव्वाची सव्वा वीजबील भरणे आज शक्य नाही याचं भान सुध्दा महावितरणने ठेवले पाहिजे. हुकूमशाही अवलंबली तर जनतेचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. सरकारने गरीबांचा मागासवर्गीयांचा विचार करावा, गरीबांच्या गळ्याचा फाश होवु नये!


0 टिप्पण्या