Jayatarao Patil brought out the racist face of the NCP
Social24Network
महापुरूषांच्या नावाने सत्ता मिळवायची आणि सत्तेत आल्यानंतर त्याच विचारधारेवर चालणा-यांना मातीत गाळायचे हा अजेंडा राष्ट्रवादी काॅंग्रेसचा राहीलेला आहे. वंचित बहुजन समूहाला शरद पवारांनी कायम सत्तेपासून दुर ठेवले आहे. त्यांच्यावर अन्याय-अत्याचार केले आहेत. आज तेच शरद पवार महापुरूषांच्या पंगतीमध्ये बसण्यासाठी हपापले आहेत. पवारांनी महापुरूषांच्या विचारधारेवर चालण्याचे ढोंग करून राजकारण केले तेच शरद पवार आता महापुरूषांच्या पंगतीत बसण्यासाठी धडपड करीत आहेत. त्याची सुरूवात त्यांनी जयंत पाटलांच्या आडून केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसचा जातीयवादी चेहरा संपूर्ण महाराष्ट्रासमोर उघडा पडला आहे. महापुरूषांचा अशाप्रकारचा अवमान फुले-शाहु-आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात खपवून घेतल्या जाणार नाही अशी घाणाघाती टीका ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष पॅंथर दीपक केदार यांनी केली आहे.
दरम्यान राष्ट्रवादी नेते जयंत पाटील यांनी शरद पवारांच्या वाढदिवसादिनी शुभेच्छा देतांना ट्विट केले होते की, हा महाराष्ट्र ज्यांच्यामुळे घडला, वाढला, समृद्ध झाला, सुजलाम्-सुफलाम झाला अशा निवडक लोकांची नावं काढली तर त्यात अर्थात छत्रपती शिवाजी महाराज येतात. फुले-शाहु-आंबेडकर, कर्मवीर पाटील, यशवंतराव चव्हाण यांचे स्थान आहे. आज त्या पंगतीत आपले नेते शरद पवार साहेबसुद्धा आहेत. जयंत पाटील यांच्या या ट्विटमुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले असून ही लग्नाची पंगत नाही तर महापुरूषांची पंगत आहे असा टोला पॅंथर दीपक केदार यांनी लगावला आहे.
यासदंर्भात सोशल 24 नेटवर्कशी बोलतांना केदार म्हणाले की, फुले, शाहू, आंबेडकरांच्या पंगतीत कुणीही बसू शकत नाही. नरेंद्र मोदीचा फोटो शिवाजी महाराजांच्या अर्ध्या चेहऱ्याला लावला जातो. मला महापुरुष म्हणा ही आता आधुनिक फॅशन सुरू झाली आहे. ज्यांनी जाती कर्मठ करत घराणेशाही बळकट करून सत्ता लाटली, सत्तेची पंगत 169 कुटुंबापुरती मर्यादित करून ठेवली, ज्यांना फुल्यांनी सुरू केलेल्या शाळा टिकवता आल्या नाही, बाबासाहेबांचे नाव विद्यापीठाला देण्यासाठी 17 वर्ष संघर्ष करायला भाग पाडले, खैरलांजी घडवून आणली, त्यांना आता महापुरूषांच्या पंगतीमध्ये बसण्याची घाई झाली आहे. जयंत पाटलांचे पंगतीचे गणित फुले-शाहु-आंबेडकरी चळवळ चालविणा-यांना मान्य आहे का? असा संतप्त सवाल पॅंथर दीपक केदार यांनी केला आहे.


0 टिप्पण्या