Bhaiyasaheb created an independent identity for Buddhists in India; Anandraj Ambedkar
Social24Network
डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर भारतीय बौद्ध महासभा, बौद्ध जन पंचायत समितीची जबाबदारी भैय्यासाहेबांनी आपल्या खांद्यावर घेवून बौद्धांच्या आरक्षणाचा लढा उभारला, देशभर धर्मांतराचे सोहळे घेतले, जागतीक पातळीवर बौद्धांचे प्रश्न मांडले त्यांच्या त्यागामुळे आज भारतातील बौद्धांची स्वतंत्र ओळख निर्माण असल्याचे प्रतिपादन रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी तथा डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर यांनी केले. ते मराठी साहित्य वार्ता आयोजित सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमातुन बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक, विचारवंत तथा आंबेडकरी इतिहासकार प्रा. प्रकाश जंजाळ हे होते तर प्रमुख वक्ते म्हणून सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. भारत सिरसाट उपस्थित होते.
यावेळी बोलतांना प्रा. भारत सिरसाट म्हणाले की, लोकनेते भैय्यासाहेब आंबेडकर यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ रक्ताचे आणि विचाराचे वारसदार म्हणून गतिमान केली. ज्या-ज्या वेळी समाज असुरक्षित होता त्या-त्या वेळी आंबेडकर पुढे आले ते बाबासाहेबांच्या रूपाने, भैय्यासाहेबांच्या रूपाने आणि आता प्रकाश आंबेडकर यांच्या रूपाने परंतु सुरक्षित झाल्यानंतर समाज रक्ताचे आणि विचाराचे वारसदार अशी समीक्षा करतो अशा दांभिक समीक्षकांना, विचारवंतांना समाजाने बाजूला सारले पाहिजे.
अध्यक्षीय समारोप करतांना प्रा. प्रकाश जंजाळ म्हणाले की, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आणि भैय्यासाहेब आंबेडकर यांचे संबंध चांगले नसल्याचा प्रचार-प्रसार काही दळभद्री लोकांनी केला आहे. पिता-पुत्रामध्ये वाद होत असतात, झाले ही पाहिजे. जर दोघांमध्ये टोकाचे वाद असते तर बाबासाहेबांनी जनता आणि प्रबुद्ध भारत वृत्तपत्राची जबाबदारी भैय्यासाहेबांकडुन काढून घेतली असती. बुद्धभूषण प्रेसचे काम त्यांच्याकडून काढून घेतले असते. तात्कालीन पुढा-यांनी स्वतःचे वर्चस्व टिकून राहावे यासाठी पिता-पुत्रामध्ये फुट दाखविण्याचा प्रयत्न केला असला तरी बाबासाहेब आणि भैय्यासाहेबांचे संबंध ममतेचे होते, मायेचे होते.
मराठी साहित्य वार्ताच्या युट्यूब चॅनलवर संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी साहित्य वार्ताचे संपादक अमरदीप वानखडे यांनी केले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.


0 टिप्पण्या