Social24Network
बाळापूर/प्रतिनिधी :- बाळापूर शहराला ऐतिहासिक पार्शवभूमी आहे. संपूर्ण व-हाडामध्ये बाळापूर शहराची ख्याती होती. परंतु इतिहास लिहिणारा हा विशिष्ट वर्ग असल्याने सोयीचा इतिहास लिहिला गेला आहे. जनतेपर्यंत खरा इतिहास पोहोचण्यासाठी इतिहासाची पुनर्मांडणी करणे अत्यंत महत्वाचे असून बाळापूर शहराचा खरा इतिहास जागतिक पातळीवर पोहोचविण्यासाठी बाळापूर नगर परिषदेने पुढाकार घ्यावा आणि स्व:खर्चाने प्रसिद्ध करावा, असे प्रतिपादन संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या बोर्ड ऑफ स्टडीज सेंटरचे अध्यक्ष प्रा. डॉ. संतोष बनसोड यांनी केले.
ते काल (दि. ८ जानेवारी) रोजी बाळापूर येथे आयोजित डॉ. श्याम देवकर लिखित "बाळापूर शहरातील ऐतिहासिक वास्तूंचा अभ्यास" या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यातून बोलत होते. हे संशोधन डॉ. देवकर यांनी प्रा. डॉ. वसंत डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केले आहे. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ इतिहास संशोधक, शिक्षणतज्ञ तथा साहित्यिक प्रा. डॉ. अशोक राणा, ज्येष्ठ विधिज्ञ ऍड. संतोष राहाटे, अमरावती विद्यापीठाचे पर्शियन ऍड अरेबिक बोर्ड स्टडीजचे अध्यक्ष प्रा. डॉ. अंजुम ताजी, एस. आर. मोहता महिला महाविद्यालयाचे इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ. वसंत डोंगरे, तलहा नक्षबंदी, श्रीकृष्ण धनोकार, मोतीलाल डोळसकर, नगरसेवक मो. अक्रम, खामगाव येथील गटशिक्षणाधिकारी गजानन गायकवाड, ज्येष्ठ साहित्यिक रमेश डोंगरे, जाहीर हुसेन आदी उपस्थित होते.
यावेळी अशोक राणा बोलतांना म्हणाले की, बाळापूर शहरामध्ये सुफी संत, जैन धर्माचे प्रचारक, हिंदू, पारसी, बौद्ध धर्माचे प्रसारक यांनी केलेल्या समाजप्रबोधनाचे फलित म्हणजे आज बाळापूर शहरात धर्माच्या नावाने विवाद होत नाही, हा इतिहास आहे. आणि हा इतिहास आपण टिकवला पाहिजे कारण तेव्हाच इतिहासाचा अभ्यास समाज घडविण्यासाठी होईल.
डॉ. अंजुम ताजी बोलतांना म्हणाले की, बाळापूर शहरात १२ मोहल्ले होते, त्यावरून बाळापूर हे नाव या शहराला पडले आहे. अनेक ऐतिहासिक वास्तू या शहरात आहेत. त्याचा अभ्यास व्हावा, त्याचे संशोधन व्हावे आणि लोकांपर्यंत हा इतिहास पोहोचावा यासाठी अशा प्रकारच्या पुस्तकांची निर्मिती होणे गरजेचे आहे.
प्रा. डॉ. वसंत डोंगरे प्रस्ताविकामध्ये म्हणाले की, इ. स. १७२० पासून बाळापूरचा सांस्कृतिक इतिहास बदलला आहे, वास्तूंचा अभ्यास हे पुरातत्वीय संकल्पनेशी जुळलेला असला तरी हा वास्तू बांधताना हजारो कामगारांनी परिश्रम केल्याने सबाल्टर्न स्कुलशी जुळणारा आहे.
प्रा. डॉ. देवकर बोलतांना म्हणाले की, बाळापूरचा इतिहास दुर्लक्षीत आहे. त्यावर अधिक संशोधन करणे गरजेचे आहे. व-हाडाचा अज्ञात इतिहास समोर आल्यास इतिहासाची नवी परीमाणे निर्माण होतील.
यावेळी नगरसेवक मो. अक्रम खान यांनी नगर परिषद येत्या काळात निश्चित अशा प्रकारच्या उपक्रमांना चालना देण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले आहे.
श्रीराम मंगल भवन बाळापूर येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरविंद शिंगाडे यांनी केले तर आभार अमरदीप वानखडे यांनी मानले. यावेळी डॉ. किशोर वानखडे, विवेक चांदूरकर, मधुकर निमकरदे, नितीन राहाटे, गोपाल पाटील, सौ. प्रीती राहाटे, सौ. तेजस्विनी राहाटे आदींसह बाळापूर शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


0 टिप्पण्या