Rename the city of Pune as Sambhaji Maharaj Nagar
Social24Network
निवडणुकीच्या तोंडावरच औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर व्हावे या चर्चेला जाणिवपूर्वक सुरूवात केली जाते. अशी मागणी करणारे व लव्ह संभाजीनगर असा संदेश देणारे समाजा-समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. छत्रपती संभाजी महारांची पुण्यात समाधी आहे. हा परिसर संभाजी राजांच्या इतिहासाशी निगडीत आहे. त्यामुळे पुणे शहराचे नामांतर संभाजी नगर असे करण्यात यावे, अशी मागणी रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी केली आहे.
निळे प्रतिक बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेच्या पुरस्कार वितरण सोहळयात ते बोलत होते. निळे प्रतीक बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रातील ५० मान्यवरांना समाजभूषण पुरस्कार वितरणाचा भव्य सोहळा मौलाना आझाद संशोधन सभागृहात बुधवारी दिनांक १४ जानेवारी रोजी पार पडला. या सोहळयाचे उद्घाटन आनंदराज आंबेडकर यांचे हस्ते झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त प्राचार्य डॉ. आर. के. क्षीरसागर हे होते. प्रा. डॉ.ऋषीकेश कांबळे हे प्रमुख वक्ते व प्रमुख अतिथी म्हणून एम.डी.जीवने, अँड. बी. एच गायकवाड, इंजिनियर राजधर दांडगे, यांची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना आनंदराज आंबेडकर म्हणाले की, संभाजीनगर हे नाव पुणे शहराला दिले जावे, ही आमची मागणी आहे. पुणे परिसरातच छत्रपती संभाजी महाराज यांची वढू बुद्रुक येथे समाधी आहे. हा परिसर संभाजी राजांच्या इतिहासाशी निगडीत असल्याने आम्हाला पुणे शहराचे नामांतर संभाजीनगर असे हवे आहे, असे आनंदराज यांनी स्पष्ट केले. औरंगाबाद शहराला संभाजीनगर हे नांव दिले जावे, ही मागणी निवडणुकीच्या तोंडावरच का होते, याबद्दलही त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हा नामविस्तार देखील आम्हाला मान्य नाही. आम्हाला या विद्यापिठाला केवळ बाबासाहेबांचे नाव हवे आहे. यासाठी आमचा लढा संपलेला नाही, संपणार नाही, असा इशाराही आनंदराज यांनी दिला. आपल्या आंबेडकरी समाजाने व चळवळीने दिपस्तंभ म्हणून उभे राहिले पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले. आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या ओबीसींना स्वतःच्या शूद्रत्वाचा राग का येत नाही, असा ही सवाल त्यांनी उपस्थित केला निळे प्रतीक संस्थेची वाटचाल उल्लेखनीय असल्याचे गौरवोद्गार ही त्यांनी काढले.
या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. डॉ. ऋषिकेश कांबळे यांनी ही निळे प्रतीक च्या वाटचालीची मुक्तकंठाने प्रशंसा केली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची व नेतृत्वाची महती वर्णन करतांना डॉ. कांबळे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे या देशाचा प्राणवायू आहेत. त्यांचे नांव एका विद्यापिठास देण्यासाठी १७ वर्ष संघर्ष करावा लागला व हे जगातील एकमेव उदाहरण आहे. नामांतर लढ्यातील १७ शहिदांना आपण आवर्जून अभिवादन केले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. नामांतर हा मर्यादित हेतू असणारा विषय नव्हता, यामागे व्यापक प्रेरणा होती, असेही त्यांनी स्पष्ट केले. नामांतर लढा हा सामाजिक मान्यते संदर्भातील लढा होता, ही बाब त्यांनी अधोरेखित केली. नामांतर लढ्याच्या नोंदी पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत, याबद्दल ऋषीकेश कांबळे यांनी खंत व्यक्त केली.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य आर. के. क्षिरसागर यांनी सांगितले की, आंबेडकरी समाजाने सत्तेचे स्वप्न पाहिले पाहिजे. हे स्वप्न पाहात असतांना नैतिकता जपण्यावर भर दिला पाहिजे. निळे प्रतीक ने व्यापक चळवळीच्या दिशेने वाटचाल करावी. अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केले. पुरस्कार वितरण सोहळयाचे संयोजक व संपादक रतनकुमार साळवे यांनी आपल्या गेल्या ११ वर्षाच्या वाटचालीवर भाष्य केले. जेष्ठ विचारवंत, समीक्षक प्रा. डॉ. ऋषिकेश कांबळे यांच्या मार्गदर्शनाचा उल्लेख त्यानी आपल्या प्रास्ताविक भाषणात केला.
प्रारंभी निळे प्रतीक बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष रतनकुमार साळवे यांनी व त्यांच्या सहकार्यांनी रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांचे शाही थाटात स्वागत केले. आजच्या या पुरस्कार वितरण सोहळयात जेष्ठ नेते अँड. बी. एच. गायकवाड यांचेसह ५० जणांना समाजभूषण पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमास वकील, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आदी विविध स्तरातील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचलन पंकज शिंदे यांनी व आभार प्रदर्शन राजघर दांडगे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी कारण्यासाठी राहुल गवळी, सागर साळवे, टिनू साळवे, राजेंद्र हिवरे, दीप पवार यांनी परिश्रम घेतले.


0 टिप्पण्या