Social24Network
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकरांनी वनमंत्री संजय राठोड प्रकरणी पोलिसांवर दबाव असल्याची शंका व्यक्त केली आहे. अधिका-यांनी राजकारण्यांच्या दबावाला बळी पडु नये अन्यथा त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये अॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत की, अधिका-यांनी राज्यकारण्यांच्या दबावाला बळी पडुन कोणत्याही असंविधानीक कृत्यांमध्ये सहभागी होउ नये. पुजा चव्हाण या तरूणीच्या आत्महत्येप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. ही आत्महत्या नसून हत्या असल्याचं बोललं जात आहे. परंतु सरकार राठोड यांना पाठिशी घालण्याचे काम करीत आहे, सरकारने याप्रकरणी अजुनही कोणतीही कारवाई केली नसल्याने पोलीस अधिका-यांवर सरकारद्वारे दबाव आणल्या जात असल्याची शंका अॅड. प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केली आहे.
पुढे बोलतांना अॅड. आंबेडकर म्हणाले की, सुप्रीम कोर्टाने एक महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, जर अधिका-यांवर असंविधानीक काम करण्यासाठी दबाव येत असेल तर त्यांनी ते लिखित स्वरूपात घ्यावे, अन्यथा झालेल्या असंविधानीक कामामध्ये अधिका-यांना जबाबदार धरण्यात येईल. त्यामुळे अधिका-यांनी राजकारण्यांच्या मदतीने असंविधानिक कामामध्ये पडु नये. कोणतेही सरकार केवळ पाच वर्ष सत्तेमध्ये आहे त्यानंतर दुसरे सरकार स्थापन होईल. त्यामुळे अधिका-यांनी कुठल्याही राजकीय दबावाला बळी पडु नये. अन्यथा दुस-या आलेल्या सरकारमध्ये त्यांची कोंडी झाल्याशिवाय राहणार नाही.
महाराष्ट्रामध्ये मराठा विरूद्ध दलित, मराठा विरूद्ध आदिवासी, मराठा विरूद्ध ओबीसी असा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात होता. हा वाद मिटविण्यासाठी माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांच्या पुढाकाराने पुण्यात एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ज्या हेतुने ही परिषद आयोजित केली होती, तो हेतु या परिषदेनंतर साध्य झाला आहे. या परिषदेनंतर मी स्वतः ही परिषद इथेच बरखास्त झाली असे जाहिर केले होते. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या एल्गार परिषदेशी माझा संबंध नाही, असा दावा अॅड. प्रकाश आंबेडकरांनी यावेळी केला आहे.


0 टिप्पण्या