बौध्दांचा कायदा म्हणजे २२ प्रतिज्ञा !

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

बौध्दांचा कायदा म्हणजे २२ प्रतिज्ञा !

 बौध्दांचा कायदा म्हणजे २२ प्रतिज्ञा ! भन्ते अश्वजित



मानव जातीची दशा पाहून मानव धर्माच्या दिशेने मानव जातीला नेऊन मानव धर्माची दिक्षा देणारे मानवातील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या कोटयावधी लेकरांसाठी पावलोपावली संघर्ष झेलत या जगातील सर्वश्रेष्ठ आणि पवित्र असा बुध्द धम्म देऊन अखिल मानव जातीचा उध्दार केला. ज्यावेळी आम्हाला उच्चत्तम, श्रेष्ठतम् अशा बुध्द धम्माची दीक्षा दिली. त्याचवेळी त्यांनी आम्हाला २२ प्रतिज्ञासुध्दा दिल्या. २२ प्रतिज्ञा म्हणजे मानव जातीच्या जीवन जगण्याची आचारसंहिता होय ! २२ प्रतिज्ञा हा समाजक्रांतीचा कार्यक्रम आहे ! बौध्द धम्माचा सार म्हणजे २२ प्रतिज्ञा ! बौध्दिक स्वातंत्र्याचा जाहीरनामा म्हणजे २२ प्रतिज्ञा ! बौध्दांचा कायदा म्हणजे २२ प्रतिज्ञा ! असे असतांना सुध्दा आम्ही देवादिकांकडे का वळतो ? दहीहंडीमध्ये का सहभागी होतो? गणपती उत्सवात का म्हणून नाचतो ? दुर्गादेवीच्या दर्शनाला जाऊन तिथे दांडिया का म्हणून खेळतो ? आम्हाला बाबासाहेबांनी बौध्द धम्माची दीक्षा देऊन आणि २२ प्रतिज्ञा देऊन आज उणेपूरे ६३ वर्षे होत आहेत. तरीही आम्ही धम्माच्या शिकवणी विरूध्द का वागतो? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी बेईमानी का करतो? कधी कळणार आम्हाला २२ प्रतिज्ञांचे अर्थ? हे न समजणारे कोडे न जाणे समाजाला कोणत्या दिशेला घेऊन जात आहेत! याचसाठी केला होता काय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी उपाशी पोटी १८-१८ तास अभ्यास? याचसाठी जाळला होता काय त्यांनी आपला देह मेनबत्ती-सारखा ? याचसाठी दिली काय त्यांनी आपल्या स्वतःच्या चार लेकरांची आहुती? वेळेवर योग्य तो उपचार न मिळाल्याने वयाच्या ३ व्या वर्षी रमाईने देह याचसाठी त्यागला काय? मोठमोठया नोकऱ्यांना ठोकरून केवळ समाजासाठी झटणाऱ्या महामानवाने याचसाठी सर्व धर्म आणि पंथाचा अभ्यास करून आमच्या उन्नतीसाठी, हितासाठी, कल्याणासाठी, भल्यासाठी आणि रक्षणासाठी बुध्दधम्माची निवड केली होती काय? मती गुंग करणारे हे प्रश्न न जाणे कोणत्या उत्तराच्या शोधात आहेत?



बुध्दविहारात येण्यासाठी बौध्दांना माईकवरून बोलवावे लागते. एक नाही तर दोन-चार वेळा आवाहन करावे लागते. त्यावेळी कुठे थोडे बहुत लोक विहारात येतात. आणि तिकडे कुणी बोलवित नाही. कुणी विचारीत नाहीत तरी काही लोक बेशरम सारखे जातात. तिथल्या मंदीरातील देवाची, देविची पुजा करतात आणि त्यांच्यापुढे झुकून आपल्या लाचारीचा, गुलामीचा परिचय देतात. त्यावेळी मात्र "ते लोक" उघड आणि मनातल्या मनात हसतात आमच्या मानसिकतेवर ! जिथे काहीच मिळत नाही तिथे हे लोक गर्दी करतात आणि जिथे सर्व काही मिळून मानवाचा सर्वागिन विकास होतो तिथे मात्र फिरकत नाहीत. महाराष्ट्र शासनाने जाणिवपूर्वक रात्री उशिरापर्यंत लाऊडस्पिकर वाजविण्याची परवानगी देऊन बहुजन विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा पार चंदा मेंदा करून टाकला आहे.  गल्ली बोळात गणपती बसतात. त्या ठिकाणी सकाळच्या आरतीपासून तिथले मोठया आवाजाचे लाऊडस्पिकर सुरू होतात ते रात्री उशिरापर्यंत वस्त्या वस्त्यात गणपतीचे मंडप टाकले आहेत. काही ठिकाणी तर मेन रोडवरती टोलेजंग मंडप डांबरी सडक फोडून उभारले आहेत. कुठले मंडप शाळेजवळ आहेत, कुठले मंडप दवाखान्यासमोर आहेत, कुठले मंडप कार्यालयासमोर आहेत, कुठले मंडप सार्वजनिक ठिकाणी आहेत. कुठे कुठे तर घराघरात बसविल्या जातात त्यामुळे १० दिवस त्यांच्या लाऊड स्पिकरच्या गाण्यांचा नुसता धिंगाणा चालतो. बरं तिथे गाणेही धडाचे वाजविले जात नाहीत. अर्थहित आणि भेसूर आवाजाचे गाणी मोठमोठयाने वाजविले जातात की ज्याचा त्रास समाजातील सर्वच वयोगटातील लोकांना होतो, सर्व स्तरातील लोकांना होतो. नाच गाण्याशिवाय गणपती पुढे काहीच नसते.


ज्यांना हजारो वर्षे शिक्षणाचा मुळीच अधिकार नव्हता. त्या स्त्रियांना शिकविण्यासाठी समाजाचा. वर्ण-व्यवस्थेचा विरोध पत्करून वेळप्रसंगी मानहानी सहन करून कर्मठवाद्यांच्या शिव्या-शाप खाऊन खंबीरपणे शिक्षणाच्या बाजूने उभे राहुन तमाम स्त्री वर्गाचा उध्दार करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचे कष्ट वाया गेले असे वाटते. कारण गणपतीच्या दर्शनाच्या रांगेत ज्या सुशिक्षित बहुजन समाजाच्या स्त्रिया तासनतास ताटकळत उभ्या राहतात ते पाहुन तरी तसे वाटणे स्वाभाविक आहे. ज्या देव दर्शनाने, ज्या उपवासाने, ज्या जपाने आणि ज्या शारीरिक क्लेषाने कवडीचाही लाभ होत नाही. असे शिक्षणातून ज्या महिलांना, ज्या तरूण मुलींना समजले त्याच सुशिक्षित महिलांचा आणि मुलीबाळींचा त्यात जास्त प्रमाणात समावेश असल्याने आश्चर्य वाटून त्यांच्या शिक्षणाची कीव येते. याबाबतीत अशिक्षित महिला मात्र स्वाभिमानी असल्याचे ग्रामीण भागापासून शहरी भागांपर्यंत दिसून येते. आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर सुध्दा म्हणाले होते की, “मी दिलेला बुध्दाचा धम्म टिकवून ठेवण्याचे काम इमाने इतबारे जर कोणी केले असेल तर त्या ग्रामीण भागातील अशिक्षित महिला होत. आणि पुढेही त्याच महिला माझा धम्म टिकवून ठेवतील !" ही भविष्यवाणी बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची आहे हे इथे आम्ही लक्षात घेतले पाहिजे. आणि ग्रामीण भागापासून शहरी भागांपर्यंत प्रत्यक्ष पाहणी केली तर त्यांची भविष्यवाणी किती शतप्रतिशत खरी आहे याचा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही.

हे ही वाचा... डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे धम्म मिशन - भन्ते अश्वजीत, औरंगाबाद

सावित्रीमाईचा वारसा पढे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चालविला म्हणूनच त्यांना समस्त स्त्री वर्गाचे उध्दारक म्हणतात. त्यांच्या कायद्याचे त्यांना कवच असल्याने त्यांना स्त्रियांचे संरक्षक म्हणतात. पुरुषप्रधान संस्कृतीतील स्त्री वर्गाचे मुक्तीदाते म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नांव घेतले जाते. या देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी आपल्या अभिभाषणात कबूल केले की, केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच त्या देशाच्या सर्वोच्च स्थानी विराजमान होऊ शकल्या. आज कोणतेही क्षेत्र असे नाही की, जिथे महिलांचा शिरकाव नाही. ही सर्व देण फक्त त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचीच आहे. असे असतांना जीवंत आणि सत्य विचाराच्या महामानवाला आपला आदर्श न मानता काल्पनिक देवी-देवतांच्या प्रसादावर आणि होत नसलेल्या कृपेवर जास्त विश्वास टाकून महिलांनी आपल्या जीवनाचे मार्गक्रमण खालच्या दिशेने आणि अधोगतीच्या वाटेने का चालविले आहे हे समजण्यापलीकडे आहे. प्रकांड पंडित डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बुध्दवंदेनेतील एकच सरणात्तय गाथा २२ प्रतिज्ञामध्ये फार पध्दतशीरपणे बसवून ती गाथा अधिक सोप्या भाषेत समजावून सांगतिली आहे ती अशी :


नत्थि मे सरणं अय्यं, बुध्दो मे सरणं वरं

एतेन सच्च वज्जेनं, होतु में जगमंगलमं ।। १।।

नत्थि मे सरणं अय्यं, धम्मो मे सरणं वरं

एतेन सच्च वज्जेनं होतु में जय मंगलमं ।।२।।

नत्थि मे सरणं अय्यं, संघो मे सरणं वरं

एतेन सच्च वज्जेनं, होतु में जय मंगलमं ।।३।।


या गाथेचा विस्तृत अर्थ असा घेता येईल.



नत्थि म्हणजे नाही; मे म्हणजे माझा, माझे; सरणं म्हणजे शरणस्थान, अय्यं म्हणजे हा, ही, हे, अन्य; बुध्दो म्हणजे बुध्द; वरं म्हणजे श्रेष्ठ, उच्च ; एतेन म्हणजे याशिवाय, यापेक्षा; सच्चवज्जेनं म्हणजे सत्यवचन; होन्तु म्हणजे व्हावे ; जयमंगल म्हणजे कुशल मंगल, उध्दार, कल्याण, वरील तिनही गाथांचा अर्थ जवळपास सारखाच आहे त्याचे सरळ वाक्य बनविले, तर असे म्हणता येईल की, बुध्द, धम्म, संघाशिवाय मला अन्य आधार नाही, आसरा नाही, शरणस्थान नाही, तेच माझे उच्चतम, श्रेष्ठतम शरणस्थान आहे, श्रध्दास्थान आहे. त्यांच्याशिवाय मी माझ्या शरीराला कुणापुढेही झुकविणार नाही. (म्हणजे अन्य देवादिकांपुढे) किंवा मी बुध्द धम्म संघाशिवाय कोणापुढेही नतमस्तक होणार नाही. जर माझे हे म्हणणे सत्य असेल तरच त्या सत्य-वचनाने माझे जगमंगल होवो. याचा अर्थ इतका सरळ आणि स्पष्ट असतांना आम्ही इतर देविदेवतांसमोर का म्हणून झुकतो, वाकतो आणि नतमस्तक होतो? आम्ही आमचे घरी, विहारात किंवा धार्मिक कार्यक्रमाप्रसंगी म्हणतांना उच्च दर्जाचे म्हणतो, श्रेष्ठ दर्जाचे म्हणतो आणि बाहेर आल्यानंतर इतर देवादिकांना हात जोडून निच दर्जाचे काम करित असू तर आमचे जयमंगल कसे होईल ? याचाही विचार झाला पाहिजे ना? काही लोकांचे म्हणणे असे येते की, आम्हाला त्या लोकांसोबत रहावे लागते तेंव्हा त्यांचे सोबत मंदीरात जावेच लागते. किंवा ते आमचे वरचे अधिकारी असल्याने त्यांचे ऐकावेच लागते. हो ठिक आहे! पण स्वतःला त्यांच्याप्रमाणे झुकविणे किंवा मंदीरात गेल्यानंतर त्याच्या सारखी कृती करणे हे कितपत योग्य आहे? आणि मग आमच्या स्वाभिमानाचे काय ? तो कट्टर बौध्द धर्मिय आहे, आचरणशिल आहे, शीलवान आहे, नीतिवान आहे, ध्यैर्यवान आहे. त्याला आपल्या सोबत आपल्या मंदिरात नेणे योग्य नाही किंवा त्याला म्हणणे सुध्दा बरोबर नाही. तो त्याच्या धर्माचे आचरण करतो. त्याच्या नादाला लागायचे नाही. आपण आपल्या धर्माप्रमाणे करावे अशी भावना इतर धर्मीयांच्या मनात पैदा होईल असे आचरण करणे हाच त्यावरील एकमेव उपाय आहे. साधा शिपाई असणारा पण कट्टर बौध्दधर्मीयाला त्याचा क्लासवन अधिकारीही आपल्या घरातील धार्मिक कार्यक्रमासाठी अधिकारवाणीने बोलावू शकत नाही असे अनेक उदाहरणे पाहण्यात आली आहेत. आणि त्यालाच म्हणतात बौध्द धम्मातील जीवंत माणूस !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी खुप परिश्रम करून संघर्ष झेलत बुध्द, धम्म, संघासारखे आम्हाला सर्वश्रेष्ठ व मौल्यवान रत्न दिलेत मग आमच्याजवळ ओरिजनल सोने असतांना आम्ही पितळाकडे का आकर्षित व्हावे याचाही विचार झाला पाहिजे. म्हणून बाबासाहेबांच्या कष्टांना, त्यागाला आम्ही जाणले पाहिजे आणि त्यांनी जसे सांगितले तसेच वागले पाहिजे, जगले पाहिजे. तरच आमचे कल्याण होईल. भौतिक सुखाला खरे सुख म्हणता येणार नाही. कारण तो आभास आहे. बुध्द धम्म संघाप्रती नितांत श्रध्दा ठेवून धम्माच्या अधीन राहून २२ प्रतिज्ञांचे पालन करण्यातच खरी सुख शांती आहे. कोणत्याही देवीदेवतांजवळ कोणतीही मनोकामणा पुर्ण होत नाही आणि त्यांचा कोपसुध्दा होत नाही असे सर्वच्या सर्व शास्त्रांचा अभ्यास करून जगातील सर्वात विद्वान व्यक्तीने आम्हाला सांगितले अन ते बोधिसत्व होते. त्या बोधिसत्वाचे ज्यांनी ज्यांनी ऐकले त्यांचे त्यांचे कल्याण झाले, मंगल झाले. आणि ज्यांनी ऐकले नाही ते कुठचेच राहिले नाहीत याला इतिहास साक्षी आहे. शेवटी कसे जगावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. धम्माचे एक छोटेसे संदेशवाहक म्हणून सांगणे हे आमचे कर्तव्य आहे.

सर्वांचे मंगल होवो!



भन्ते अश्वजित

सदधम्म बुद्धविहार, आरती नगर,

पिसादेवी रोड, औरंगाबाद.

मो.नं. ९६७३२९२२९७

टिप्पणी पोस्ट करा

3 टिप्पण्या

Unknown म्हणाले…
कदा मि भन्ते
प . पु. बाबासाहेबानी जसे सांगितले तसे समाजाने वागले पाहिजे तसे जगले पाहिजे .
थोडक्यात बाबासाहेबांना फक्त न मानता जाणले पाहिजे
हा आपण दिलेला संदेश प्रत्येक बौद्ध असणाऱ्या व्यक्तिपर्यंत पोहचला पाहिजे '
बाबासाहेबांना मानणारे कोट्यवधी आहेत पण त्या ना जाणून त्याप्रमाणे आचरण करणाऱ्यांची वाणवा आहे .
म्हणून प्रत्येक वेळेला त्यांना बावीस प्रतिज्ञांची आठवण करून द्यावी लागते '
दिक्षा घेतलेल्या ना सुध्दा ही शोकांतिका आहे .
याचे कारण प्रशिक्षित भिक्खू संघाचा अभाव -
बाबासाहेबांच्या सेमिनरी निर्माण करण्यासाठी समाजाने केलेले
दूर्लक्ष .
समाजाला योग्य प्रकारे धम्मज्ञान देऊन त्यांच्याकडून आचरण करून घेणारे भिक्कूंची संख्या कमी आहे . बाबासाहेबाना अभिप्रेत असणारा धम समजून सांगणारे .
भन्ते आपणास मी अभिवादन करतो धन्यवाद देतो की
आपण हे कार्य खुप तळमळीने '
कष्टाने मैत्री आणि करुणेने
प्रत्यक्ष अथवा तंत्रज्ञानाच्या माध्यमाने करीत आहात .
मी आपला खुप खुप आभारी आहे .
जयभीम .
sujay म्हणाले…
खूप छान सोप्या पद्धतीने सांगीतले आहे.