संघर्षाचे नांव डॉ. बाबासाहेब आंबेडकर! - भन्ते अश्वजित, औरंगाबाद

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

संघर्षाचे नांव डॉ. बाबासाहेब आंबेडकर! - भन्ते अश्वजित, औरंगाबाद

 संघर्षाचे नांव डॉ. बाबासाहेब आंबेडकर! - 

भन्ते अश्वजित, औरंगाबाद



           या संपूर्ण भूमीवर लोकशाहीसाठी ख्याती पावलेला देश म्हणजे भारत होय आणि भारत घडविण्यासाठी जन्म घेणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे भारतीय समाज जीवनाचे एक अविभाज्य अंग होय. ज्या पद्धतीने या भारताने त्यांना घटना लिहिण्याची जबाबदारी दिली होती. त्याच पद्धीतने हिंदू धर्मग्रंथांची व्यवस्थित मांडणी करण्याचे कार्य त्यांच्यावर सोपवले असते, तर या जगात आणखी एक इतिहास घडला असता. हिंदू कोडबिल हे त्यातील एक उदाहरण आहे. पावलोपावली संघर्षाचे नाव म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, त्यांना हिंदू व्यवस्थेने किती नाडले. अपमानित केले. हीन पद्धतीने वागवले. तरीही त्यांच्या मनात हिंदू धर्माविषयी कोणतीही द्वेषाची भावना नव्हती, त्यांनी अस्पृश्यांसाठी जे जे लढे दिले, त्यातून हिंदू धर्माचेही अनेक लाभ झाले. फक्त ते वर्णव्यवस्थेच्या विळख्यात असल्याने त्याचे समर्थन करू शकले नाहीत. मदत करणे तर दूरच राहिले. 


             रोहिणी नदीच्या पाण्यावरून होणारा संघर्ष टाळण्यासाठी सिद्धार्थ गौतमांनी गृहत्याग केला. पाण्यासाठी उन्हातान्हात अस्पृश्यांची होत असलेली वणवण पाहून आपला पाण्याचा हौद खुला करणारे राष्ट्रपिता फुले यांच्या कार्याच्या पावलांवर पाऊल ठेवीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २० मार्च १९२७ रोजीपाण्यासाठी महाडचा सत्याग्रह करून आपले शिष्यत्व सिद्ध केले आणि आपल्या गुरूंना गुरुदक्षिणाही दिली. त्या सत्याग्रहाने पाणी हे नैसिर्गक असते. त्यावर आपलाच नव्हे, तर आपल्या देवांचासुद्धा खरा अधिकार नाही, हे ब्राम्हण जातीला समजले. हा सत्याग्रह जरी हक्काची लढाई होती, तरीसुद्धा हिंदू व्यवस्थेच्या दुसऱ्या पिढीला आपली पहिली व त्याअगोदर झलेल्या पिढ्या किती तुच्छ होत्या, हे समजायला पुरेसा ठरला. डॉ. बाबासाहेबांनी हा सत्याग्रह केलाच नसता, तर पाणी हे निसर्गाची देण आहे, त्यावर जगात कोणाचाही मालकी हक्क नसतो. ही सरळ बाब त्यांना केव्हाही कळली नसती आणि चंद्रावर पोहोचलेल्या जगालासुद्धा हे राष्ट्र भिकारडे वाटले असते. त्याच महाड मुक्कामी मनुस्मृतीचे दहन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अन्यायाच्या ताकदीचा खरा जोर दाखवला. मनू हा हिंदू धर्माचा खांब आहे. असा त्यांचा एक ग्रह बनला होता. 


                  डॉ. बाबासाहेबांनी या मनुचे व्यक्तिमत्व जगासमोर मांडताच मनू हा विष वाटू लागला. मनुमुळे हिंदू व्यवस्थेचे व पर्यायाने या राष्ट्राचे वाटोळे झाले होते. माणसाला काळीमा ठरलेला मनु फक्त ब्राम्हण खांद्यावर घेऊन नाचत होता. या कलंकित मनूला गाडल्यानंतर या देशात त्या विचाराचा दुसरा मनू तयार व्हायला हिंदू धर्मात ताकद शिल्लक राहिली नाही. घटनेच्या कलमात अशा विक्षिप्त विचारांचे डॉ. बाबासाहेबांनी कायद्याने हातपाय कायमचे बांधून टाकले. ते त्यांनी तसे केले नसते, तर मनू हे पाप हिंदू धर्माच्या आधुनिक पिढीच्या अंगवळणी राहिले असते. त्याने इतरांचा सोडाच, पण स्वत:चा सुद्धा उत्कर्ष झाला नसता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २ मार्च १९३० पासून नाशिकमध्ये काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह सुरू केला. हा लढा हिंदू धर्मात आम्हाला उच्च स्थान मिळावे, यासाठीचा नव्हता, तर आपल्या हक्कासाठी प्रतिपक्षांशी झुंजत राहण्याची प्रवृत्ती निर्माण व्हावी, यासाठी होता. खरे तर काळारामाचे दर्शन घेऊन जीवन मंगलमय होईल किंवा चिरंजीवी होईल, अशी शंका सुद्धा डॉ. बाबासाहेबांना शिवली नाही. हा लढा जरी अस्पृश्यासाठी लढला गेला होता, तरी त्याचा खरा फायदा हिंदू व्यवस्थेला झाला, तो असा डॉ. बाबासाहेबांमुळे देव व त्या शब्दाचा नेमका अर्थ त्यांना समजला. 


              देव हा सद्गुणांचा समुच्चय म्हटल्यास देव एकाचे दर्शन नाकारणारा व दुसऱ्याचे स्वीकारणारा असूच शकत नाही. त्यामुळे एकंदर ब्राम्हणांना कळले की, आपल्या पूर्वजांनी नेमकी काहीतरी लबाडी केलेली आहे, म्हणून काळाराम मंदिराचा लढा हिंदू व्यवस्थेला प्रामुख्याने ब्राम्हणांना ब्रम्हांडाची सत्य असत्यता शोधायला लावणारा ठरला. त्यातून हिंदू धर्माचे कल्याणच होत गेले, हिंदू व्यवस्थेने तमाम स्त्री जातीला हीन दर्जाची वागणूक देऊन तिला चूल आणि मूलपर्यंतच मर्यादित ठेवले. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेद्वारे तिला त्या गुलामीतून एकदम बाहेर काढले म्हणून आज असे कोणतेही क्षेत्र शिल्लक राहिले नाही की, ज्यात ती पुरुषांबरोबर दिसत नाही. "राज्यघटनेमुळेच मी या देशाची राष्ट्रपती होऊ शकले!" असे उद्गार प्रतिभाताई पाटील यांनी आपल्या अभिभाषणात काढले होते. इंदिरा गांधी प्रधानमंत्री झाल्या त्या घटनेमुळेच, मोठ्या माणसांच्या पोटी जन्म घेऊन मोठा माणूस होणे, ही एक साध्य बाब आहे. परंतु अतिसामान्य माणसाच्या पोटी जन्म घेऊन राष्ट्रपदी पदापर्यंत पोहोचता येते, हे भारातीय राज्यघटनेने के. आर.नारायणन यांच्या रुपात दाखवून दिले, सन १९३० साली लंडन येथे लोकांनी लोकांसाठी'चालवलेले राज्य असा त्यांनी लोकशाहीचा अर्थ जगाला सांगितला होता. संपूर्ण सूत्रे लोकांच्या हाती देऊन भारत घडविणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक चित्रकार, कामगार, मालक, उद्योगधंदे, कारखाने, आर्थिक व्यवस्था, समाजकारण, राजकारण आणि सामाजिक स्वातंत्र्य अशा प्रत्येक भोवती त्यांनी कायद्याचे गुंडाळे घातले. त्यांचा मनू आपोआपच हद्दपार झाला आणि सर्व जातीधर्म येथे सलोख्याने व निभयपणे नांदू लागले. 


            पाकिस्तानच्या फाळणीवेळेस गांधींची मुस्लिम लीग सोबत चाललेली तडजोड हिंदू महासभेला मान्य नव्हती. हिंदू महासभेचे अध्यक्ष. बॅ. सावरकरांचे मत होते की, या देशात मुसलमानांना रहावयाचे असेल, तर त्यांनी हिंदूंशी जुळवून घ्यावे लागेल. याचा अर्थ मुस्लिम कटपुतळीच ठरत होते, ही व्याख्या डॉ. बाबासाहेबांच्या पचनी पडली नाही. कारण सावरकरांच्या भूमिकेप्रमाणे मुसलमान इथे राहिले, तर नुसतेच मात्र समजा त्यांनी हिंदूंच्या मतानुसार राहणे पसंतच केले असले, तर भविष्यकाळात इथे किती हिंदू व मुसलमानांचा बळी गेला असता, त्याची मोजदाद करता आली नसती. अशावेळी हिंदू महासभेला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार फायद्याचे ठरले. त्यावेळी नाही मात्र आज तरी महासभेने त्या विद्वानाचा फोटो आपल्या कचेरीत लावणे गरजेचे होते. निदान एक राष्ट्रीय नेता म्हणून तरी, भारतातील दीनदुबळ्यांच्या व्यथा व वेदनांना कारण ठरलेल्या व्यवस्थेला जेव्हा धक्का द्यायला डॉ. बाबासाहेब आंबेडकर बाहेर पडले. तेव्हा गांधीवादाला सुरुवात झाली. 


        डॉ. बाबासाहेबांनी चालू केलेल्या कार्याचा गांधींना अखेरपर्यंत हेवा वाटला. मात्र त्यासाठी करावयाच्या उपाययोजनेच्या ठिकाणी गांधींचे घोडे नेमके रस्त्यात आडवे येत होते. गांधी एकीकडे हरिजनांचे पिता होऊ पाहत होते. तर दुसरीकडे त्यांना हिंदूंची काळजी होती. ब्रिटीश सरकारने दलितांसाठी स्वतंत्र मतदार संघ जाहीर केला की, लगेच गांधी पुण्यात उपोषणाला बसले. ब्रिटीशांनी त्यावेळी अलिप्त धोरण स्वीकारले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांकडे अखंड जगाचे लक्ष लागले. सन १९३२ ला अवघा भारत देश हादरून गेला होता. ज्या हीन, दीन, दुबळ्या, शोषित, पीडित, भारतीय घटकांसाठी आयुष्यभर लढा दिला, त्या आंबेडकरांना येथे मात्र एक पाऊल मागे जावे लागेल. २५ सप्टेंबर १९३२ रोजी पुणे करारावर सही करून त्यांनी ग्रांधींचे प्राण वाचवले. या इतिहासानं मात्र त्यांची छाती अभिमानाने दाटून येते, हे नाकारता येत नाही. डॉ. बाबासाहेबांनी गांधींचे प्राण वाचवले खरे, मात्र एका ब्राम्हणाने त्या पितामहाला गोळ्या घालून ठार मारले आणि हिंदू संस्कृतीचे जगाला नव्याने दर्शन घडवले, डॉ. बाबासाहेब मात्र गांधी हत्येने दुःखी झाले.

           

भन्ते अश्वजित
सदधम्म बुद्धविहार,आरती नगर,औरंगाबाद.
मो.नं. :- ९६७३२९२२९७

टिप्पणी पोस्ट करा

16 टिप्पण्या

Unknown म्हणाले…
बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी खुपचं सुंदर अभ्यासपूर्ण लेख लिहिला आहे.लेख खुप आवडला .भंते असेच लिहित रहा.अशा अभ्यासु भंतेची बाबासाहेबांच्या मिशन साठी आवश्यकता आहे.
अनामित म्हणाले…
छान... परंतु आजही आपला समाज खऱ्याआंबेडकरी विचारांपासून वंचित आहे.आणि लोकांना त्यांच्या कार्याची जाणीव ही नाही.
sujay म्हणाले…
लेख खूप छान आहे
अनामित म्हणाले…
छान मांडणी केलात आचार्य. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या समाजातील इतके केलेले असून सुद्धा अनेक जणांना त्याची जाणीव नाही. आज ही आपला समाज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या खऱ्या विचारांपासून वंचित आहे.
अनामित म्हणाले…
छान मांडणी केलात आचार्य. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या समाजातील इतके केलेले असून सुद्धा अनेक जणांना त्याची जाणीव नाही. आज ही आपला समाज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या खऱ्या विचारांपासून वंचित आहे.
अनामित म्हणाले…
छान मांडणी केलात आचार्य. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या समाजातील इतके केलेले असून सुद्धा अनेक जणांना त्याची जाणीव नाही. आज ही आपला समाज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या खऱ्या विचारांपासून वंचित आहे.
Unknown म्हणाले…
अप्रतीम व कणखर लिखाण.
Unknown म्हणाले…
वंदामी भंतेजी!
आपले लेख अत्यंत प्रखर व फुले-आंबेडकर चळवळीत कार्यकर्त्या साठी बहुमोल मार्गदर्शन करतात. यातून आम्हाला स्फूर्ती तर मिळतेच तसेच ईतिहास ची सुद्धा माहिती होते. आपली लेखणी अशीच तळपत राहो.
Learn Something New म्हणाले…
खूप महत्वपूर्ण माहिती समाजासमोर ठेवण्यासाठी साधुवाद भन्तेजी
Vishal Manohar म्हणाले…
Vandami Bhante _/\_

Simple to understand to everyone.

Jai Bhim ��
Smita Info (Nikki) म्हणाले…
तुमचे सर्व लेखांमध्ये खुप काही शिकायला मिळते. .👌👌
Unknown म्हणाले…
🙏
वंदामी भन्ते..!
"संघर्षाचे नांव डॉ. बाबासाहेब आंबेडकर!"
या लेखातून खुप काही शिकवण मिळाली...,
"ऐसान भीम जी के हम इनसान बन गए।"
जन्मजात संघर्ष करत आलेल्या जमातीत जन्म घेऊन "महामानव" होणं म्हणजे या ब्रम्हांडात असलेल्या संपुर्ण 'सजीवाना' मुजरा करायला भाग पाडणे..!
माझ्या सारख्या अस्पृश्य जातीत जन्मलेल्या बांधवांना या चातुर्वर्णीय समाजात वावरत असताना सुखकारक जिवण जगता यावे म्हणून "डॉ.बाबासाहेबआंबेडकरानी" पावलो~पावली संघर्ष करून हे 'अनमोल जिवण' आम्हाला फुकट दिल...! हे अनंत उपकार
"भारतीय राज्यघटनेच्या" माध्यमातून सदैव आपल्या सोबत आहेत ..,
हि पैसा,गाडी~घोडी, साडी,बंगला टिकवण्यासाठी "भारतीय संविधान" असणं गरजेचं आहे करिता संघर्ष करावा लागला तरी चालेल..,
तेव्हा खरी डॉ.बाबासाहेब आबंडकरांची संघर्षाची धुरा आपण सांभाळत आहो हे म्हणणे वावगे ठरणार नाही..!
..🖊️सुरेंद्र वानखेडे (बौध्दाचार्य)
Unknown म्हणाले…
🙏
वंदामी भन्ते..!
"संघर्षाचे नांव डॉ. बाबासाहेब आंबेडकर!"
या लेखातून खुप काही शिकवण मिळाली...,
"ऐसान भीम जी के हम इनसान बन गए।"
जन्मजात संघर्ष करत आलेल्या जमातीत जन्म घेऊन "महामानव" होणं म्हणजे या ब्रम्हांडात असलेल्या संपुर्ण 'सजीवाना' मुजरा करायला भाग पाडणे..!
माझ्या सारख्या अस्पृश्य जातीत जन्मलेल्या बांधवांना या चातुर्वर्णीय समाजात वावरत असताना सुखकारक जिवण जगता यावे म्हणून "डॉ.बाबासाहेबआंबेडकरानी" पावलो~पावली संघर्ष करून हे 'अनमोल जिवण' आम्हाला फुकट दिल...! हे अनंत उपकार
"भारतीय राज्यघटनेच्या" माध्यमातून सदैव आपल्या सोबत आहेत ..,
हि पैसा,गाडी~घोडी, साडी,बंगला टिकवण्यासाठी "भारतीय संविधान" असणं गरजेचं आहे करिता संघर्ष करावा लागला तरी चालेल..,
तेव्हा खरी डॉ.बाबासाहेब आबंडकरांची संघर्षाची धुरा आपण सांभाळत आहो हे म्हणणे वावगे ठरणार नाही..!
..🖊️सुरेंद्र वानखेडे (बौध्दाचार्य)