Social24Network
राज्य सरकारने शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नाव महान व्यक्तींच्या यादीमध्ये टाकले आहे. यामुळे ऑल इंडिया पॅंथर सेना आक्रमक झाली असुन ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी यासंदर्भात निषेध व्यक्त केला आहे. महान व्यक्तीचं मापदंड म्हणजे आपली सत्ता मनमानी कारभार अशी टीका त्यांनी यावेळी केली आहे.
भारतीय दलित पॅंथरचे संस्थापक नामदेव ढसाळ यांच्या काल झालेल्या स्मृतिदिनानिमित्त ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी राज्य सरकारकडे मागणी केली आहे की, स्वकर्तुत्वाने ज्यांनी आपली ओळख बनविली असे दलित चळवळ आक्रमकपणे निर्माण करणारे, बंडखोर योद्धा, प्रसिद्ध साहित्यिक, कवी, निडर नेता अशी बहुआयामी व्यक्तीमत्व असलेल्या पॅंथर नामदेव ढसाळ यांची महान व्यक्तींच्या यादीमध्ये समावेश करावा.
नामदेव ढसाळ यांना मिळालेले पुरस्कार महाराष्ट्र राज्य पुरस्कार - (गोलपीठा) १९७२, सोव्हिएत लॅंड नेहरू पुरस्कार - १९७५-७६, महाराष्ट्र राज्य कवी केशवसुत पुरस्कार - १९८३, पद्मश्री पुरस्कार - १९९९, बहिणाबाई चौधरी पुरस्कार पद्मश्री सहकार महर्षी विखे पाटिल साहित्य पुरस्कार, साहित्य अकादमी स्वर्णजयंती: जीवनगौरव पुरस्कार - २००५ गंगाधर गाडगीळ साहित्य पुरस्कार - २००६, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार, बुद्ध रोहिदास विचार गौरव - इ.स. २००९
नामदेव ढसाळ यांच्या साहित्यकृती कविता संग्रह - आमच्या इतिहासातील एक अपरिहार्य पात्र : प्रियदर्शनी (१९७६), खेळ (१९८३), गोलपीठा (१९७२) तुझे बोट धरून चाललो आहे मी, तुही इयत्ता कंची (१९८१), मी मारले सूर्याच्या रथाचे सात घोडे, मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलवले (१९७५), या सत्तेत जीव रमत नाही (१९९५), मी भयंकराच्या दरवाजात उभा आहे (निवडक कवितांचा संग्रह) गांडू बगीचा, निर्वाणा अगोदरची पीडा इत्यादी कविता संग्रह प्रकाशित आहेत. तर सर्व काही समष्टीसाठी, बुद्ध धर्म: काही शेष प्रश्न, आंबेडकरी चळवळ, आंधळे शतक, दलित पॅंथर- एक संघर्ष (हे पुस्तक नामदेव ढसाळ यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पहिल्या मासिक स्मृतिदिनी, म्हणजे १५ फेब्रुवारी २०१४ रोजी प्रकाशित झाले.) हे चिंतनपर लेखन त्यांचे प्रसिद्ध आहे. निगेटिव्ह स्पेस, हाडकी हाडवळा, उजेडाची काळी दुनिया इ. कादंब-या त्यांच्या प्रसिद्ध आहेत. अंधार यात्रा हे नाटकही त्यांचे प्रसिद्ध आहे.
नामदेव ढसाळ हे महाराष्ट्रातील एका गरीब कुटुंबातील भीमसैनिक होते. त्यांना कोणतीही राजकीय पाश्र्वभूमी नव्हती. कार्यकर्ता ते दलित पॅंथरचे संस्थापक त्यांच्या लेखणीने आणि संघर्षाने देशात आधुनिक क्रांती केली आहे. त्यामुळे त्यांच्या नावाचा समावेश तात्काळ महान व्यक्तींच्या यादीमध्ये करण्यात यावा, अशी मागणी यावेळी दीपक केदार यांनी राज्यसरकारकडे केली आहे.


0 टिप्पण्या