रमाई जयंती आणि रमाई मासिकाचा १५ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा.
एखाद्या पत्नीने आपल्या पतीच्या शिक्षणासाठी अहोरात्र मेहनत घेऊन, त्याग करून, अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगून संसाराचा गाडा चालवीत आपल्या पतीच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्याचे रमाई आणि बाबासाहेबांचे इतिहासात एकमेव उदाहरण आहे. रमाईच्या त्याग व जीवन संघर्षातूनच भीमराव बाबासाहेब झाले, असेही त्या यावेळी म्हणाल्या.
छत्रपती संभाजीनगर/प्रतिनिधी - बाबासाहेब म्हणाले होते की, कोणत्याही समाजाची उंची ही त्या समाजातील महिलांवरच मोजली जाते. हा विचार रमाई फाउंडेशनने जोपासून रमाई मासिकाच्या माध्यमातून महिलांना उभारी देण्याचे, बळ देण्याचे केवळ कामच केले नाही तर गेल्या १५ वर्षांमध्ये त्यामध्ये खंड न पडू देता अविरत हे मासिक चालविले ही आंबेडकरी महिला चळवळीसाठी गौरवाची बाब असून रमाई मासिक हा आंबेडकरी महिला चळवळीचा इतिहास आहे, असे प्रतिपादन बाबासाहेब आणि रमाईची नात रमा आंबेडकर-तेलतुंबडे यांनी केले.
त्या स्थानिक (०७ फेब्रुवारी रोजी) तापडिया नाट्य मंदिर येथे आयोजित रमाई जयंती व रमाई मासिकाच्या १५ वा वर्धापन दिन सोहळ्याच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी बोलत होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. संजय मुन हे होते. प्रमुख वक्ते म्हणून प्रसिध्द लेखिका सुषमा पाखरे (वर्धा), आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख दीपक कदम (नांदेड) उपस्थित होते. प्रमुख उपस्थिती म्हणून प्रा. प्रदीप रोडे, ऍड. धनंजय बोरडे, डॉ. अरुणा लोखंडे, ऍड. लता बामणे, ऍड. एस. आर. बोडदे, प्राचार्य सुनील वाकेकर आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकात बोलताना रमाई फाउंडेशनच्या अध्यक्षा तथा रमाई मासिकाच्या संपादक डॉ. रेखा मेश्राम म्हणल्या की, रमाई फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक उपक्रम आम्ही सातत्याने राबवित आहोत. रमाईच्या जयंतीची मूळ तारीख शोधून पाहिल्यांदा रमाईची सार्वजनिक जयंती व्यापक स्वरूपात आम्ही साजरी केली, आज महाराष्ट्रच नव्हे तर देश-विदेशात रमाईची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी होत आहे, याबाबत निश्चितच आनंद वाटतो. यापुढेही फाउंडेशनच्या वतीने अविरत कार्य करण्याचे डॉ. मेश्राम यांनी यावेळी जाहीर केले.
पुढे बोलतांना रमा आंबेडकर म्हणाल्या की, महिला आता स्वतःच्या बळावर उभ्या झाल्या पाहिजे. पंढरपूरला जायची रमाईची इच्छा होती. बाबासाहेबांनी नवं पंढरपूर उभं केलं परंतु ते पाहायला रमाई नव्हती. रमाईने आयुष्यभर दारिद्र्य, गरिबीचे जीवन जगले परंतु कधीही कुणापुढे हात पसरले नाही, स्वाभिमानी वृत्तीने जीवन जगले. ही स्वाभिमानी चळवळ जिवंत ठेवण्याची महिलांवर मोठी जबाबदारी आहे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. त्यांनतर दीपक कदम, सुषमा पाखरे व उपस्थित मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले.
यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मुली व महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
सूत्रसंचालन दैवशीला गवंदे यांनी केले तर ललिता खडसे यांनी आभार यांनी मानले. कार्यक्रमासाठी शोभा खाडे, बेबीनंदा पवार, जयश्री सरोदे, डॉ. प्रज्ञा साळवे, डॉ. वंदना पाटील, मंगल मुन, राजकन्या गोंडाणे, नेहा बनसोडे, डॉ. ललिता गिर्हे, रत्नकला बनसोड, गंगाबाई सुरडकर, संघमित्रा खंडाळकर, सरला सदावर्ते आदींसह रमाई फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.





0 टिप्पण्या