2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर वंचित बहुजन आघाडी व एमआयएम पक्षाची युती डॉ. गफ्फार कादरी यांच्या प्रयत्नांमुळे झाली होती. परंतु विधानसभेपूर्वीच युती तुटल्यामुळे दोन्ही पक्षांचे मोठे नुकसान झाले होते. दोन्ही पक्षांची युती कायम राहावी म्हणुन दोन्ही पक्षाचे नेते, कार्यकर्ते आग्रही होते. परंतु युती होउ शकली नाही. याचा मोठा फटका वंचित बहुजन आघाडी पक्षाला त्यावेळी बसला होता.
औरंगाबाद/प्रतिनिधी - एमआयएम पक्षाचे नेते डॉ. गफ्फार कादरी यांनी काल औरंगाबाद येथे पत्रकार परिषद घेवून मोठा गौप्यस्फोट केला. त्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधान आले आहे. वंचित आणि एमआयएम पक्षाच्या युतीमध्ये महत्त्वाचे योगदान असलेले डॉ. कादरी यांनी 2019 च्या निवडणुकीचा दाखला देवून माजी खा. इम्तियाज जलील यांचा बुरखा फाडला आहे.
डॉ. कादरी यांनी कालच्या पत्रकार परिषदेमध्ये म्हटले आहे की, वंचित आणि एमआयएमच्या युतीमुळे इम्तियाज जलील खासदास होउ शकले. आपल्या शिफारशीवरूनच जलील यांना प्रदेशाध्यक्षपद देण्यात आले. मात्र त्यांनी अध्यक्षपदी विराजमान होताच प्रदेश कार्यकारिणी बरखास्त करून टाकली. जलील यांच्या हट्टी स्वभावामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी वंचितसोबतची युती तुटली. त्यामुळे दोन्ही पक्षांचे मोठे नुकसान झाले आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.
2019 च्या निवडणुकीमध्ये अॅड. प्रकाश आंबेडकर आणि बॅरि. असोसुद्दीन ओवेसी यांच्या नेतृत्वात वंचित बहुजन आघाडी व एमआयएम पक्षाने महाराष्ट्रात लोकसभेच्या सर्व जागेवर आपले उमेदवार उभे केले होते. या निवडणुकीत वंचित आणि एमआयएम पक्षाचा केवळ एक उमेदवार विजयी झाला असला तरी प्रचंड मताधिक्य मिळाले होते.
विधानसभेत ही युती कायम रहावी, अशी अनेकांची इच्छा होती परंतु तसे झाले नाही. यावेळी अॅड. प्रकाश आंबेडकर यांना व्हिलन ठरवून इम्तियाज जलील यांनी डाव साधला व विधानसभेमध्ये युती होउ दिली नाही. जलील हे वारंवार माध्यमांमध्ये अॅड. आंबेडकर यांच्यामुळे कशी युती तुटली? यावर अनेकानेक उदाहरणे देत होते. त्याला लोक मोठ्या प्रमाणात बळी पडले व सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मनामध्ये युती संदर्भांत प्रचंड नाराजी होती.
डॉ. कादरी यांच्या पत्रकार परिषदेनंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले असून माजी खा. इम्तियाज जलील यांचा खरा चेहरा समोर आला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
0 टिप्पण्या