सामना अग्रलेखातून उद्धव ठाकरे यांनी आजच्या मोर्चामागील भूमिका स्पष्ट केली आहे. 'छत्रपती शिवराय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले अशा महान दैवतांचा अपमान होत असताना मऱ्हाठी जनता गप्प बसेल काय? छे, छे! ही जनता शिवराय, डॉ. आंबेडकर, महात्मा फुले यांच्या जयजयकाराच्या बुलंद घोषणा देत महामोर्चात सामील होईल. शिवरायांचा महाराष्ट्र मेल्या आईचे दूध प्यायलेला नाही हे दाखविणारा आजचा महामोर्चा आहे,' असं 'सामना'त म्हटलं आहे.
'महाराष्ट्राशी उभा दावा मांडला'
'महाराष्ट्रप्रेमींचा मोर्चा का निघत आहे, हे राज्यातील बेकायदा-बेइमान सरकारने समजून घेतले पाहिजे. महाराष्ट्राला दिल्लीश्वरांच्या पायाशी गहाण टाकण्याच्या कारवाया उघडपणे सुरू आहेत. त्यामुळे महाराष्ट्राला दिल्लीच्या वाटेवरील पायपुसणे बनवणाऱ्या महाशक्तीविरोधातील लढाईचे हे रणशिंग आहे. साडेतीनशे-चारशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज परक्या शत्रूंबरोबर लढले. तो शत्रू म्हणजे मोगली महाशक्तीच होती. पण आजचे स्वतःला महाशक्ती म्हणवून घेणारे दिल्लीचे सत्ताधारी आणि त्यांचे महाराष्ट्रातील मांडलीक स्वकीय असूनही त्यांनी महाराष्ट्राशी उभा दावा मांडला आहे,' असा हल्लाबोलही उद्धव ठाकरेंकडून करण्यात आला आहे.दरम्यान, आज होत असलेल्या महाविकास आघाडीच्या या मोर्चाला जनतेकडून कसा प्रतिसाद मिळतो आणि या मोर्चाला सत्ताधाऱ्यांकडून कसं प्रत्युत्तर दिलं जातं, हे पाहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
0 टिप्पण्या