ओबीसींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आंबेडकरवाद्यांनी मोठ्या भावाची भुमिका घ्यावी ; शब्बीर अन्सारी

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

ओबीसींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आंबेडकरवाद्यांनी मोठ्या भावाची भुमिका घ्यावी ; शब्बीर अन्सारी

प्रा. अविनाश डोळस प्रतिष्ठान आयोजित ओबीसी मेळावा व चिंतन शिबीर संपन्न




औरंगाबाद/प्रतिनिधी - राज्यकर्त्यांनी ओबीसींचा केवळ मतांसाठी वापर केला परंतु त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. मंडल आयोग, ओबीसीची जातिनिहाय जनगणना, ओबीसी आरक्षणासाठी आणि ओबीसींच्या प्रश्नांवर आंबेडकरवादी सातत्याने रस्त्यावर उतरला असल्याचा इतिहास आहे. ओबीसी वर्गाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आंबेडकरवाद्यांनी मोठ्या भावाची भुमिका घेतल्यास महाराष्ट्रासह देशाचे राजकारण बदलल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन ऑल इंडिया मुस्लीम ओबीसी ऑर्गनाझशनचे प्रमुख शब्बीर अन्सारी यांनी केले. ते प्रा. अविनाश डोळस प्रतिष्ठानच्या वतीने आज दि. 11 डिसेंबर रोजी प्रा. अविनाश डोळस यांच्या जयंती निमित्त ओबीसी समाजासमोर आव्हाने या विषयावर वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या सभागृहात ओबीसी मेळावा व चिंतन शिबीरातुन बोलत होते.  

‘ओबीसी समाजाची जातिनिहाय जनगणना: समस्या व उपाय’ या पहिल्या सत्राच्या अध्यक्षस्थानी वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव नितीन राठोड हे होते. तर वक्ते म्हणुन सत्यशोधक समाज प्रतिष्ठानचे के. ई. हरिदास, भारतीय पिछडा ओबीसी शोषित संघटनेचे नेते सुदाम चिंचाणे, प्रा. अविनाश डोळस प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजय मून उपस्थित होते. तर ‘मंडल आयोग अंमलबजावणी: स्थिती व वस्तुस्थिती’ या विषयावर आयोजित दुस-या सत्राच्या अध्यक्षस्थानी ऑल इंडिया मुस्लीम ओबीसी ऑर्गनाझशनचे प्रमुख शब्बीर अन्सारी हे होते तर वक्ते म्हणुन ज्येष्ठ पत्रकार स. सो. खंडाळकर, बारा बलुतेदार महासंघाचे कल्याण दळे, प्रा. प्रकाश सिरसाट आदी उपस्थित होते. 

ज्येष्ठ पत्रकार स. सो. खंडाळकर बोलतांना म्हणाले की, राज्यकर्ते संवेदनशील आणि संविधानशील नाहीत. त्यामुळे त्यांना जनतेच्या प्रश्नांशी कनवळा नाही. बोगस ओबीसींमुळे जो ख-या अर्थाने ओबीसींमधील वंचित घटक आहे त्यांना न्याय मिळत नाही. परंपरावादी ओबीसीला परिवर्तनवादी ओबीसी करण्याचे मोठे आव्हान आपल्यासमोर आहे. के. ई. हरिदास बोलतांना म्हणाले की, ओबीसींना केवळ सत्तेपुरते जागे न करता व्यवस्था परिवर्तनासाठी जागे करण्याची गरज आहे. तर सुदाम चिंचाणे बोलतांना म्हणाले की, कॉंग्रेस आणि भाजपा ओबीसींसाठी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मंडल आयोग, जनगणना, आरक्षण याला दोन्ही पक्षांनी विरोध केला आहे. घटनेला बायपास करण्याचे काम थांबविण्याची ताकद केवळ ओबीसींमध्ये आहे त्यासाठी त्याला जागे करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. 

  

डॉ. संजय मून आणि डॉ. प्रकाश सिरसाट यांनी प्रास्ताविक केले. दोन्ही सत्रांचे सूत्रसंचालन प्रा. भारत सिरसाट यांनी केले तर आभार अमरदीप वानखडे यांनी केले. या चिंतन शिबीराला शहरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या