१९ व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे थाटत उद्घाटन
छत्रपती संभाजीनगर (मलिकअंबर साहित्य नगर) : देशात समता विरुद्ध विषमता असा संघर्ष प्रचीण काळापासून सुरू आहे. आजही सामान्यांना सर्व प्रकारचे स्वातंत्र्य, सन्मानाने जगण्याचा हक्क देणारे संविधान बदलण्यासाठी विषमतावादी आणि मनुस्मृती समर्थक प्रयत्नशील आहेत. त्यासाठी राजकीय सत्ता, धार्मिक सत्ता, साहित्य आणि संस्कृती याचा वापर करीत आहेत. त्यामुळे संविधानाला बाजुला ठेवणाऱ्या हुकूमशाहीविरुद्ध संविधानाच्या चौकटीत राहून सर्वच क्षेत्रात उलगुलान म्हणजे उठाव केला पाहिजे, असे आवाहन मराठीतील लोकसाहित्य, संस्कृती व प्राच्यविद्या अभ्यासक, इतिहास संशोधक, भाषा तज्ञ, विचारवंत डॉ.अशोक राणा यांनी केले. ते १९ व्या अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलनालात अध्यक्ष म्हणून बोलत होते.
१९ वे अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलनाला आमखास मैदानावरील मलिअंबर साहित्य नगरीत शुक्रवारी सायंकाळी जागतिक कीर्तीचे प्रबोधनात्मक नाटक शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला नाटकाने सुरुवात झाली आहे. तर शनिवारी (दि.२२) सकाळी मुनूवादी विचारधारचे साखळदंड आणि कुलपाने बंदीत भारतमातेला संविधानरुपी चाविने उघडून संमेलनाचे औपचारिकरित्या उद्घाटन ख्यातनाम आंबेडकरवादी हिंदी साहित्यिक, समीक्षक, अनुवादक, विचारवंत कंवल भारती (दिल्ली) यांच्या हस्ते झाले. यावेळी विचारमंचावर संमेलनाध्यक्ष अशोक राणा, प्रख्यात ग्रामीण साहित्यिक व पूर्वाध्यक्ष डॉ. वासुदेव मुलाटे, कवयित्री प्रा. प्रतिभा अहिरे, प्रा.प्रल्हाद लुलेकर, प्रख्यात उर्दू साहित्यिक नुरूल हसनैन, सूर्यकांताताई गाडे, शैला राणा, श्याम पाटील यांची उपस्थिती होती. आपल्या अध्यक्षीय भाषणात अशोक राणा यांनी सांगितले की, विद्रोही साहित्य संमेलन ज्या भागात होत आहे. त्याला मोठा ऐतिहासीक वारसा असून या भागात सातवाहनांचे राज्य होते. मातृसत्ताक आणि लोककल्याणकारी सातवाहनांनी विद्या आणि कलेला प्रोत्साहन दिल्याने या भागात बौद्ध लेण्यांची निर्मिती झाल्याचे सांगितले. राणा यांनी सातवाहण काळात निर्माण झालेले साहित्य, त्याचा उदय, त्याचा विकास, भाषेचा विकास, भाषेतील बदल याची सविस्तर मांडणी केली. भारतातील प्राचीन संस्कृती, सरस्वती नदीचा शोध, सापडलेले सत्य यावर प्रकाश टाकला. मिथकांच्या माध्यमातून वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तर समृद्ध सिंधू संस्कृतीला वैदीक संस्कृती ठरविण्याचा प्रयत्न विविध माध्यमातून केला जात असल्याचा आरोप राणा यांनी केला. मराठी भाषेचा उगम आणि विकास याचे सविस्तर विवेचन करीत वेगवेगळ्या भागात बोलल्या जाणाऱ्या बोली भाषेमुळे मराठी भाषा समृद्ध झाली असताना सदाशीव पेठेत बोलल्या जाणाऱ्या मराठी भाषेला प्रमाणभाषा ठरवून ती सर्वांवर लादण्याचा प्रयत्न केला जात आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याचा आनंद आहे. परंतु त्यामध्ये बोलीभाषेला काय स्थान, आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. डॉ. अशोक राणा यांनी देशाच्या सद्यस्थितीवर सूचक भाष्य केले. द्वेष-मत्सर हे शत्रू आपणापुढे उभे ठाकले आहेत. दुर्दैवाने तीच आजची राजकीय संस्कृती झाली आहे. धार्मिक उन्माद म्हणजेच आपला धर्म आहे, अशी काहींची समजूत झाली आहे. त्यासाठी ते दैवतांचा गैरवापर करण्यासही मागे-पुढे पाहत नाहीत. त्यांना संविधान खुळखुळा वाटू लागला आहे. संविधानाचा वापर सोयीनुसार करण्याची परंपरा ते रुजवत आहेत. संविधानाचे मंदिर बांधण्याची घोषणा झाली असून, नंतर पूजा व आरती सुरू होण्यास वेळ लागणार नाही. लोकशाहीचा तिसरा स्तंभ असलेली न्यायव्यवस्था सत्ताधाऱ्यांची बटिक बनली आहे. सत्ताधीशांना अनुकूल न्याय देईल त्याला सर्वोच्चपदी सन्मानित केले जात आहे. त्यामुळे सत्याचा विजय होण्याची भाषा कुणी बोलत नाही. 'सत्यमेव जयते' या वाक्याला अर्थ राहिला नसल्याचे कदाचित राज्यकर्त्यांना वाटले असल्याने त्यांनी न्यायालयात वापरले जाणारे हे ब्रीदवाक्य काढले आहे. त्याजागी 'यतो धर्मस्ततो जय:' हे नवे ब्रीदवाक्य न्यायालयात वापरण्याचे आदेश दिले आहेत, अशी टीका डॉ. राणा यांनी केली. आज देशात धार्मिक उन्माद वाढला आहे. राजकारणाच्या सोयीसाठी धर्माचा बेधुंद वापर केला जात असल्यामुळे धार्मिक संघर्षाची शक्यता निर्माण झाली आहे. संविधानीक मूल्य बाजुला ठेवून हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न करणाऱ्याविरुद्ध सर्व क्षेत्रात उलगुलान म्हणजे उठाव केला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. आपल्या उद्घाटकीय भाषणात कंवल भारती यांनी भारतातील प्राचीन काळापासून सुरू असलेल्या संघर्षावर प्रकाश टाकला. वेगवेगळ्या काळात विषमतेच्या विरोधात समतावादी विचारकांनी उठाव केल्याचे विविध उदाहरणे देत विवेचन केले. मध्ययुगीन काळात भक्ती आंदोलनाने ब्राम्हणी वर्चस्व झुरून समतावादी विचारांना सर्वदूर पोहोचविले. विद्रोही साहित्य संमेलन समतावादी मूल्यांबाबत जागरुकता वाढवत आहे. एवढ्या वर्षांत दलित, आदिवासी, अल्पसंख्याक यांचा हक्कासाठीचा संघर्ष संपला नाही. या हक्कासाठी लेखकाला बोलावे आणि लिहावे लागेल, विशेष म्हणजे आधी मौन तोडावे लागेल, असे आवाहन कंवल भारती यांनी केले. संमेलनाचे संचलन प्रा. किशोर सिरसाठ तर आभार प्रदर्शन ॲड. वैशाली डोळस यांनी केले. यावेळी स्वगताध्यक्ष इंजि. सतीष चकोर, मुख्यनिमंत्रक ॲड.धनंजय बोर्डे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
संमेलनाच्या यशस्वीतेसाठी राज्यसंघटक किशोर ढमाले, स्वागताध्यक्ष इंजि. सतीश चकोर व मुख्यनिमंत्रक ॲड.धनंजय बोर्डे, कार्याध्यक्ष खलील अहमद, खजीनदार ॲड.के.ई.हरिदास, अनिलकुमार बस्ते, भाऊसाहेब जाधव, समन्वयक प्रा.भारत सिरसाठ, ॲड.वैशाली डोळस, अनंत भवरे, डॉ.धोंडोपंत मानवतकर, वजीर शेख, जितेंद्र भवरे, मधुकर खिल्लारे, सविताताई अभ्यंकर, डॉ विनय हतोले, रामदास अभ्यंकर, भीमराव गाडेकर, वैभव सोनवणे, सुधाकर निसर्ग, कबीर बोर्डे, रतनकुमार साळवे, अमरदीप वानखडे, सागर भवते प्रयत्न करीत आहेत.
-----------------------------
विद्रोहीला भीऊनच दिल्ली गाठली
मागील पाच वर्षे विद्रोही साहित्य संमेलनाने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला रास्त उत्तर दिले. अंमळनेरच्या संमेलनानंतर ते विद्रोही संमेलनाला घाबरुन दिल्लीला गेले आहेत. विषमतावादी मूल्याला प्रेरणा देणाऱ्या साहित्याला आमचा विरोध आहे. संमेलनाध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांचा फोटो जाहिरातीतून वगळणे किंवा नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द करणे हा त्यांच्या साहित्य संस्कृतीचा व्यवहार आहे.
प्रा. प्रतिमा परदेशी, अध्यक्ष, विद्रोही सांस्कृतिक चळवळ
-----------------------
विद्रोही साहित्य संमेलन विचारांचा प्रसार करणारे आहे. दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी देशाचा अख्खा कारभार पणाला लावत आहेत. एकीकडे पैसा आणि दुसरीकडे विचार हाच या दोन संमेलनातील फरक आहे.
-डॉ. वासुदेव मुलाटे, मावळते संमेलनाध्यक्ष
---------------------------
सांस्कृतिक वाचारधारा यात्राने वेधले लक्ष
सकाळी नऊ वाजता औरंगपुरा येथील महात्मा जोतिबा फुले सवित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सांस्कृतिक वाचारधारा यात्रेला सुरुवात करण्यात आली. या यात्रेमध्ये आदिवासी, भटके त्यांचे पारंपरिक वाद्य घेऊन सहभागी झाले होते. आदिवासी नृत्य, संगीत यांच्या तालावर विद्रोहीच्या संयोजकांनीही ठेका धरला. तर विद्यार्थीनींनी लेझीम सादर केला. चित्ररथात संविधाची प्रतीकृती ठेवण्यात आली होती. राजमाता जिजाऊ आणि बाल शिवाजी यांचा सजीव देखावाही होता. औरंगपुऱ्यातून निघालेला विचारधारा यात्रा बुढीलेन मार्गे आमखास मैदानापर्यंत काढण्यात आली.
महात्मा फुलेच्या अखंडाने सुरुवात
यावेळी महात्मा फुले कृत सत्याचा अखड गायन शितल गावीत (नंदूरबार) यांनी तर पावरी वादन अमृत भील आणि सहकारी यांनी केले. नरेंदर राठोड संत कबिराच्या दोह्याचे गायन केले तर विद्रोही संमेलनगीत डॉ. गणेश चंदनशीवे (मुंबई) सादर केले.
चित्र कवितांचा विद्रोह.....
या साहित्य नगरीत पितळखोरा कलादालनात प्रसिद्ध चित्रकार राजानंद सुरडकर यांच्या चित्र कवितांचे चित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. चित्र आणि कवितातून विद्रोह अभिव्यक्त करण्यात आला आहे. राजानंद सुरडकर यांनी विविध शहरांमध्ये कलादालनातून चित्र प्रदर्शने भरवली आहेत. मानवी शोषणाच्या विरोधात चित्रांतून आवाज उठवला आहे. या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध चित्रकार प्रा. अप्पासाहेब काटे, संमेलनाध्यक्ष डॉ अशोक राणा, उदघाटक कंवल भारती, विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या राज्याध्यक्षा प्रा. प्रतिमा परदेशी, किशोर ढमाले, कवयित्री प्रा प्रतिभा अहिरे यांच्या उपस्थितीत झाले.




0 टिप्पण्या