उल्हासनगर (प्रतिनिधी)- दोनवेळा नगरसेवकपद भूषवणारे अंबरनाथचे माजी नगरसेवक तसेच रिपब्लिकन चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते धनंजय सुर्वे यांनी अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघात प्रवेश केला आहे. त्यामुळे भारीपचा एकही नगरसेवक नसलेल्या अंबरनाथच्या राजकारणाला अनपेक्षित कलाटणी मिळाली असून येणाऱ्या नगरपरिषदेच्या निवडणुकीत भारीपचे खाते उघडण्याची आणि विधानसभेत तगड्या आव्हानाची शक्यता निर्माण झाली आहे.
उल्हासनगरात राहणारे भारिप बहूजन महासंघाचे नेते सारंग थोरात यांच्या उपस्थितीत धनंजय सुर्वे यांनी भारिपमध्ये अधिकृत प्रवेश केला आहे. सुर्वे यांची अंबरनाथ मधील लोकप्रियता, ते शिवाजी-फुले-शाहू-आंबेडकर या सामाजिक संघटनेच्या बांधिलकीतून राबवत असलेले कार्यक्रम पाहता सुर्वे यांची एंट्री ही पक्षासाठी गतिमान-बळकटी देणारी ठरणार असे स्पष्ट चित्र दिसू लागले आहे.
एकेकाळी ज्यांचा दबदबा होता ते रामदास आठवले गटाचे अंबरनाथ मधील सर्वेसर्वा नरेश गायकवाड यांच्या सोबत राहताना धनंजय सुर्वे यांचेही शहरात नावलौकिक झाले. सुर्वे प्रथम आठवले गटाचे नगरसेवक होते. मात्र नरेश गायकवाड यांची हत्या झाल्यावर सुर्वे यांनी श्याम गायकवाड यांच्या पक्षाकडून नगरसेवकपद भूषविले. मागच्या निवडणुकीत त्यांचा अल्पशा मतांनी पराभव झाल्यावर त्यांनी शिवाजी-फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारसरणीशी सहमत असणाऱ्यांसाठी सामाजिक संघटना स्थापन करून त्याद्वारे विविध कार्यक्रम राबवून पुन्हा राजकारणात दमदार एन्ट्री करणार, त्यासाठी 'वेट अँड वॉच'करण्याचे संकेत धनंजय सुर्वे यांनी दिले होते.
ज्या रीतीने भिमाकोरेगाव प्रकरणात दलित-बहुजनांचे कैवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी जो ठसा उमटवला आणि त्यामुळेच आंबेडकरी चळवळीतील विविध रिपब्लिकन गटांची अग्निपरीक्षा किंबहूना पिछेहाट सुरू झाली, ते पाहता एकेकाळी सर्वप्रथम रामदास आठवले यांच्या गटाचे नगरसेवक व खंदे समर्थक असणारे धनंजय सुर्वे यांनी भारिप बहूजन महासंघात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. राजकारणातील स्वच्छ प्रतिमा अशी ओळख निर्माण करणारे व भारिप बहूजन महासंघाला वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असणारे वास्तुविशारद सारंग थोरात यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र प्रदेश सम्यक विद्यार्थी आंदोलन परिषदचे अध्यक्ष महेश भारतीय, कार्यालयीन सचिव रतन बनसोडे, ठाणे जिल्ह्याचे सहनिरीक्षक सुरेंद्र बनसोडे, अंबरनाथचे माजी अध्यक्ष अविनाश गाडे यांच्या उपस्थितीत धनंजय सुर्वे यांनी भारिपमध्ये प्रवेश केला.
0 टिप्पण्या