कामगार नेते सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

कामगार नेते सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर

(सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आंबेडकरी अभ्यासक अमरदीप वानखडे यांचा लेख)

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चिरंजीव आमदार भैयासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली बाबासाहेबांच्या ध्येय मार्गाने कामगारांचे भवितव्य उज्वल होत आहे’ असे गौरोद्गार दी बॉम्बे म्युनिसिपल कामगार संघाचे सरचिटणीस भातनकर यांनी काढले होते. कामगारांना महागाई भत्त्यामध्ये 10 रूपये वाढ मिळावी अशी मागणी कामगार संघटनेने केली होती. परंतु तत्कालीन सरकारने ही मागणी धुडकावून लावली होती. तेव्हा आमदार असतांना भैयासाहेब आंबेडकरांनी सभागृहात शासनावर दबाव आणत या लढयाला विजयी केले. आणि कामगारांना त्यांचा हक्क मिळाला. या विजयाचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आणि भैयासाहेबांचा सत्कार करण्यासाठी मुंबईच्या आंबेडकर हॉलमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या विजयोत्सवानिमित्त बोलतांना भय्यासाहेब म्हणाले होते की, ‘आज कामगारांच्या महत्त्वाच्या मागणीबद्दल न्याय मिळाला आहे. या यशाचे खरे मानकरी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायीच आहेत. आपण आपली कामगार संघटना ही मजबूत ठेवावी. या संघटनेत मी जातीने लक्ष घालून कामगारांच्या समस्या सोडविण.’ असे आश्वासन त्यांनी हजारो कामगारांना दिले होते. नुसत्या आश्वासनावर ते राहिले नाहीत तर त्यांनी आपल्या कारकिर्दीत कामगारांच्या विविध समस्यांवर शासनाशी झगडा करून त्यांना न्याय मिळवून दिला. परंतु हा कामगार नेता मात्र कायम पडद्याआड राहिला. आज भय्यासाहेब आंबेडकर यांची जयंती त्यानिमित्त त्यांनी कामगार विषयक केलेल्या कार्याची आठवण व्हावी करीत हा लेख प्रपंच.

       डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण झाल्यानंतर त्यांचे कार्य तसेच अखंडीतणे भैयासाहेबांनी चालविले होते. अनेक चळवळी त्यांनी उभारल्या, आंदोलने केली. आणि त्यामध्ये यशही मिळवले; परंतु गटबाजीच्या राजकारणाने त्यांना प्रत्येकवेळी मनस्ताप सहन करावा लागला. तरिही भैयासाहेब डगमगले नाहीत बाबासाहेबांनंतर संपुर्ण आंबेडकरी चळवळीची धुरा त्यांनी आपल्या खांद्यावर घेवून बौध्दांच्या सवलती, शेतकरी, शेतमजूर, भूमिहीन, भारत संरक्षण कायदा, खार जमिनी, विद्यापीठ, दूध वितरण, मागासवर्गीयांचे नोक-यांतील आरक्षण, अंदाज पत्रकातील तरतुदी, माध्यमिक शाळांचे प्रश्न, गोवा मुक्ती आंदोलन, एसटी महामंडळ, जनतेच्या आरोग्याचा प्रश्न, दारूबंदी अशा एकनाअनेक लढयामध्ये अग्रभागी राहुन बाबासाहेबांच्या कार्याला गती आणली होती.

भैयासाहेब आणि कामगारांचा संबंध बाबासाहेबांच्या हयातीतच आला होता. त्यामुळे बाबासाहेबांची कामगारांविषयी असलेली तळमळ त्यांनी जवळून पाहिली होती. कामगारांप्रती त्यांची एकप्रकारे नाळ जुळली होती. कामगारांच्या विविध प्रश्नांबाबत भूमिका घेवून सरकारवर जोरदार हल्ला करत होते. कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ते सतत लढत राहिले. म्हणूनच ते कामगारांचे मास लिडर होते. आमदार उद्धवराव पाटील एका ठिकाणी म्हणतात की, ‘ भैयासाहेबांचा विधानपरिषदेत झालेला विजय हा भैयासाहेबांचा विजय नसून उभ्या महाराष्ट्रातील कामगार, श्रमजिवी जनतेचा आहे.’ या उद्धवराव पाटलांच्या विधानावरून भैयासाहेबांचे कामगारांप्रती असलेले कार्य अधिरेखीत होते. 

1960 च्या दरम्यान मराठी माणसांना कंपन्यामध्ये घेण्याबाबत कारखानदारांनी उदासिनता दाखविली होती. तेव्हा ‘मराठी कामगारांच्या’ मुद्यावरून भैयासाहेबांनी शासनाला चांगलेच धारेवर धरले. ‘‘कॉग्रेस सरकार हे मालकांचे धार्जिणे असल्यामुळे मराठी कामगारांना नव्या कामधंद्यात समावून घेणे त्यांना आवश्यक वाटत नाही.’’ असा सवाल करून त्यांनी सरकारला वेठीस धरून मराठी कामगाराच्या हिताचा निर्णय घ्यावयास भाग पाडले होते. यासंदर्भाने त्यांनी केलेल्या अर्थसंकल्पीय भाषणात ते म्हणाले होते की, महाराष्ट्र सरकार उद्योगधंद्यांच्या वाढीबाबत फार प्रगतीशिल आहे असे म्हटले जाते आणि मलाही तसे वाटते. आपल्या राज्यात कारखानदारी वाढावी म्हणून कारखान्यांना लागणारी वीज, पाणी व इतर सवलती सरकार देत असते. पण महाराष्ट्र सरकार या कारखानदारांना सर्व प्रकारची मदत देत असतांना माझ्या मनात एक गोष्ट खटकते ती ही की, या कारखान्यात महाराष्ट्रीयन लोकांना नोक-या का दिल्या जात नाहीत? ह्या कारखान्यांत इतर राज्यातीलच लोकच जास्त प्रमाणात दिसून येतात. ज्याअर्थी सरकार कारखान्यात सर्व प्रकारची मदत देते, त्याअर्थी महाराष्ट्र राज्यात बेकारी दिवसेंदिवस वाढत असल्याने महाराष्ट्र सरकारमध्ये या कारखानदारांना अशी अट घातली पाहिजे की, त्यांनी आपल्या कारखान्यात 75 टक्के नोकर महाराष्ट्रीयन घेतले पाहिजे. असे झाले नाही. तर महाराष्ट्राची पिछेहाट होईल.’’ हा इशारा त्यांनी त्यावेळी दिला होता. याच दरम्यानच्या दशकात गिरणी मालक कामगारांच्या हिताविरूध्द उभा राहिला असतांना गिरणी कामगारांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली होती. गिरण्या बंद असल्यामुळे अनेक कामगार बेरोजगार झाले होते. अशा वेळी भय्यासाहेब आंबेडकरांनी विधानपरिषदेत तात्कालीन कामगार मंत्री नरेंद्र तिडके यांच्यावर प्रश्नांचा भडिमार करून गिरणी कामगारांना न्याय मिळवून दिला होता.

भयासाहेब आंबेडकर कामगारांचे तारणहार होते. कामगारांच्या विविध प्रष्नाबाबत ते फार दक्ष होते. कामगारांवर होणा-या अन्याय अत्याचाराच्या विरोधात त्यांनी प्रखर भूमिका घेत मुंबईत चतुर्थश्रेणी कामगारांच्या विविध प्रश्नावर लढा उभारून त्यांच्या प्रश्नाला वाचा फोडली. विधान परिषदेत आमदार निवडून गेल्यानंतर त्यांनी विधान परिषदेच्या विविध समित्यांवर केलेले कार्य गौरवास्पद आणि वैशिष्टयपूर्ण असे होते. त्यांनी सांसदीय आणि लोकशाही दृष्टीने केलेल्या कार्याची दखल घेवून महाराष्ट्र सरकारने ‘जे पी’ चा किताब देऊन त्यांचा सन्मान केला होता. भैयासाहेबांनी आयुष्यभर आंबेडकरी चळवळीचे भार आपल्या खांद्यावर घेवून भारतीय रिपब्लिकन पक्ष, भारतीय बौद्ध महासभा ज्या वेगाने वाढविली होती त्याच वेगाने बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या कामगार संघटनेला त्यांनी उभारी आणली होती. भैयासाहेब यांना एकाच वेळी अनेक भूमिका पार पाडाव्या लागत होत्या. भैयासाहेब एका ठिकाणी कार्यकर्ता म्हणून रस्त्यावरची लढाई लढत होते तर दुसरीकडे लोकप्रतिनिधी म्हणून विधानभवनात लढत होते. आणि या दोन्ही लढाईंमध्ये त्यांना दुस-यांपेक्षा आपल्यांशी जास्त सामना करावा लागला. गटबाजीच्या राजकारणामुळे त्यांना प्रचंड मनस्तापही सहन करावा लागला. परंतु भैयासाहेब हे महासूर्याचे वारसदार होते. ते रक्ताचे आणि विचाराचेही.

अमरदीप शामराव वानखडे
मो. ९५९५८९२५४२

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या