मुंबई (प्रतिनिधी) - शासनाच्या शिक्षण विषयक धोरणाचा निषेध म्हणून सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने येत्या १६ जानेवारी रोजी राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चे काढण्यात येत असून सर्व जिल्हाकमिटयांनी कायद्याच्या चौकटीत राहून मोर्चे यशस्वी करावेत असे आवाहन सम्यक विद्यार्थी आंदोनलाचे प्रदेश अध्यक्ष महेश भारतीय यांनी केले आहे.
यासंदर्भात सम्यकचे प्रदेश महासचिव प्रा प्रकाश इंगळे, अक्षय गुजर यांनी अधिक माहिती देताना म्हणाले की, कधी नव्हे एवढे मोठे संकट विद्यार्थ्यांच्या समोर उभे ठाकलं आहे. पटसंख्येच्या अभावी ३,८०० मराठी शाळा बंद करण्याचा घाट घातला आहे. १५ ते ३० पटसंख्या असलेल्या शाळा समायोजनाच्या आणि गुणवत्तेच्या नावाखाली एक करून ६,००० शिक्षक बेरोजगार करण्याचे धोरण महाराष्ट्र शासनाने आखले आहे. आंतरराष्ट्रीय मानकांनुसार २० ते २५ विद्यार्थी एका वर्गात असावेत म्हणजे गुणवत्ता सांभाळली जाते असा आंतरराष्ट्रीय दंडक आहे पण भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार हे दोघेही मिळून पालक आणि विद्यार्थ्यांची फसवणूक करीत आहेत. १३०० मराठी शाळा दोन वर्षांत महाराष्ट्र शासनाने अगोदरच बंद केल्या आहेत.
शासनाच्या या भूमिके विरोधात सम्यक विद्यार्थी आंदोलन राज्यभरात १६ जानेवारीला कलेक्टर कार्यालयावर मोर्चे काढून पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना जिल्हा कलेक्टरच्या मार्फत निवेदन पाठविण्यात येणार असल्याचे सम्यक विद्यार्थी आंदोलन मीडिया सेल प्रमुख अमरदीप वानखडे यांनी कळविले आहे.
0 टिप्पण्या