नागपूर
टीम सोशल नेटवर्क
टीम सोशल नेटवर्क
देशभरात लोकसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले असतांना महाराष्ट्रातील वंचित समाज एकत्र करून लोकशाहीचे सामाजिकीकरण करण्याच्या प्रक्रियेसाठी ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या "वंचित बहुजन आघाडी"च्या प्रचारार्थ "सम्यक विद्यार्थी आंदोलन" राज्यभर मैदानात उतरली असून सद्या प्रदेशाध्यक्ष महेश भारतीय विदर्भ दौ-यावर जोरदार फिल्डिंग लावत असल्याचे दिसत आहे.
गेल्या वर्षी भंडारा-गोंदिया लोकसभेच्या पोटनिवडणुकीची जबाबदारी भारिप बहुजन महासंघाने महेश भारतीय यांच्यावर सोपवली होती. त्यामुळे त्यांनी भंडारा-गोंदियासह पूर्व विदर्भात कार्यकर्त्यांनी मोठी फळी उभी करण्यात यश मिळवले होते. त्याचा पक्षाला मोठा फायदाही झाला होता. त्यामुळे भारतीय यांनी राज्यात आखलेल्या दौ-यामध्ये पूर्व विदर्भापासून सुरुवात केली असल्याचं बोललं जात आहे.
एकीकडे वंचित बहुजन आघाडी, भारिप बहुजन महासंघ, एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये सहभागी असलेल्या पक्ष संघटनांनी राज्यभरातील लोकसभा मतदार संघामध्ये जोरदार कॅम्पनिंग सुरु केली असतांनाच आता "सम्यक"ने प्रचारात घेतलेली उडी याबरोबरच महेश भारतीय यांचा निवडणूक प्रक्रियेतील दांडगा अनुभव निश्चितच वंचित बहुजन आघाडीला फायद्याचा ठरेल, असे राजकीय अभ्यासकांनी वर्तविले आहे.
सद्या भारतीय राज्यभरात दौ-यावर असून उमेदवारांच्या भेटीपासून बूथबांधणीपर्यंत, कार्यकर्त्यांपासून पुढा-यांपर्यंत, ग्रामीण भागापासून शहरापर्यंत बैठका घेत आहेत. त्यामुळे सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उत्साहपूर्वक कामाला लागले असल्याचे दिसून येत आहे.
0 टिप्पण्या