टीम सोशल नेटवर्क
मुंबई
संघटनात्मक बांधणीसाठी आणि विद्यार्थ्यांच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष महेश भारतीय यांनी नुकताच विदर्भ दौरा जाहीर केला होता. परंतु या दौ-यावर बुलढाणा पोलिसांकडून सम्यकचे जिल्हाध्यक्ष प्रविण विरघट यांना वारंवार विचारणा केली जात असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे सरकार पोलिसांच्या आडून लोकशाहीची गळचेपी करत असल्याचा आरोप महेश भारतीय यांनी केला आहे.
या संदर्भात सम्यक विद्यार्थी आंदोलन बुलढाणा जिल्हाध्यक्ष प्रविण विरघट यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी संपर्क साधला असता ते म्हणाले की, भारतीय सरांचे गेल्या वर्षभरापासून संघटनात्मक बांधणीकरिता राज्यभरात दौरे सुरु आहेत. विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांबाबत संवाद साधण्याचे काम ते करीत आहेत. आजपर्यंत आम्ही बुलढाणा जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर लोकशाही मार्गाने आंदोलने केली आहेत, त्यांना न्याय मिळवून दिला आहे. आज २० मार्च ही तारीख असून ९० वर्षांपूर्वी मानवमुक्तीचा लढा बाबासाहेबांनी यशस्वी केला होता. समतामूलक समाजाच्या निर्मितीसाठीचा तो लढा होता. भारतीय सर सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या माध्यमातून संविधानिक हक्कांसाठी लढा उभारत असतांना याच दिवशी त्यांच्या दौ-याबाबत शासंक असलेल्या सरकारने आमच्यावर पोलिसांकरवी दबाव आणण्याचे काम केले आहे. याचा आम्ही जाहीर निषेध करतो. पोलीस विभागाकडून चार-चार वेळा फोन करून नाहक विचारणा होत असल्याचा आरोपही यावेळी विरघट यांनी केला आहे.
सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष महेश भारतीय हे दिनांक २२ मार्च पासून २ एप्रिल पर्यंत विदर्भाच्या दौऱ्यावर असून त्यासंबंधीचे त्यांचे कार्यक्रम त्यांनी नुकतेच जाहीर केले होते. त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यात त्यांचा ३० मार्च रोजी दौरा होणार होता त्यामध्ये ते विद्यार्थ्यांशी संवाद साधनार होते. परंतु सम्यकचे जिल्हाध्यक्ष प्रविण विरघट यांच्यावर येत असलेला पोलिसांचा दबाव लक्षात घेत हा दौरा पूर्ण होईल का? असे आमच्या प्रतिनिधीने महेश भारतीय याना विचारले असता भारतीय म्हणाले की, पोलिसांच्या आडून सरकार जाणीवपूर्वक वंचितांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे परंतु अशा पोकळ धमक्यांना आम्ही घाबरत नसून आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे वारसदार आहोत काहीही झालं तरी दौरा रद्द होणार नाही. अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
या घटनेमुळे बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली असून सद्यस्थितीत सरकार पोलिसांमार्फत खरंच दबाव निर्माण केला जात आहे का? अशा चर्चांना जिल्ह्यामध्ये ऊत आला आहे.
0 टिप्पण्या