हिंसेस ठार करण्या उपचार बुद्ध आहे, ही निर्विकार दुनिया करणार बुद्ध आहे... अकोल्यातील कविसंमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

हिंसेस ठार करण्या उपचार बुद्ध आहे, ही निर्विकार दुनिया करणार बुद्ध आहे... अकोल्यातील कविसंमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

अकोला/प्रतिनिधी -     

कवी मिलिंद इंगळे यांनी युद्ध नाकारून समतावादी विचार पेरणारा बुद्ध या जगाला तारक असल्याचा आशय कवितेतून मांडला.

महाकवी वामनदादा कर्डक बहुउद्देशीय संस्था, बाळापुर जि. अकोलाच्या वतिने स्थानिक अशोक वाटीका येथे (दि. १० सप्टेंबर) कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ट कवी भगवंत तायडे हे होते. 
कवी अमोल बी. सिरसाट यांच्या
 शोध तुझे तू नवीन रस्ते विषय संपला,
मला पाहिजे तसे जगू दे विषय संपला!
त्रुटीत होती अडकुन फाइल महिनोमहिने,
फक्त जरासे वजन ठेवले विषय संपला!
या गझलेने संपुर्ण सभागृह मंत्रमुग्ध झाले होते. 

ज्येष्ठ कवयित्री माया दामोदर कवीता सादरीकरण करतांना म्हणाल्या,

कसं आलं बाप्पा युगं
नाही जिव्हाळा कोणाले....
भाऊ असो की, बहिण
एक नाहीत राहले!
कवी बाळाभाऊ दाभाडे कविता सादर करतांना म्हणाले,

बुद्ध विहार मुक्तीसाठी, आवळा जरा हया मुठी
आवळा जरा हया मुठी, लढा तो चालला....
कवी पंजाबराव वर कविता सादरीकरण करतांना म्हणाले की,

लक्षणे बोधीसत्वा सारखी, ज्ञानपंडीत तो प्रज्ञावंत
नष्ट विषमतेला करणारा, बाबासाहेब खरे भाग्यवंत!
कवी प्रजानंद उपर्वट यांनी कविता सादर करतांन सांगितले की,

जिथे मानवतेचा समानतेचा सुटे सुगंधी वारा,
तो बुद्ध जगाला प्यारा, त्यांचा जगाला प्यारा
सामाजिक आशयाची कवीता सादर करतांना कवी अमरदीप वानखडे म्हणाले की,

बॉम्ब फुटले आधी आता फटाक्यांचा शिमगा आहे
वस्ती पेटली आधी आता पणतीचं सात्वन आहे,
केले कितीही पक्वांन तरीही पोटात मात्र उद्ध्वस्त भूक आहे...
आपल्या मायचं चित्रण देशाशी जोडणारी कविता सादर करतांना कवी प्रा. देवानंद पवार म्हणाले की,

माया मायचं चित्रंग मले भारत दिसते
तिचा उडता पदर मले तिरंगा वाटते,
तिच्या कपायाचं कुकु अशोक चकर वाटते
 तिचा चेहरा पाहुन भारत गरिब वाटते!
प्रेमाची कविता सादर करतांना डॉ. मनोहर घुगे म्हणाले की,

साक्षी आहेत आपल्या भेटीच्या वटवृक्षाच्या सावल्या दूर जाईपर्यंत आपण दोघेही त्या न्ह्याहाळत होतो,
सिसिरातील तो बेभान वारा,
ओढ्याची खळखळाट आणि पक्षाची किलबिलाट आठवते का तुला?
कवयित्री सुनिता इंगळे कविता सादर करतांना म्हणाल्या की,

येथे गुणी जनांचा हा धिक्कार होत आहे,
खोटया मानसांचा इथे सत्कार होत आहे!
कवयित्री योगिता वानखडे कविता सादर करतांना म्हणाल्या,

देशातील रंजल्या गांजल्यांच्या
हक्कासाठी अतोनात कष्ट साहुन,
म्हणुन बाबासाहेब तुम्हाला
देशाने सन्मानित केले भारतरत्न देउन!
कवयित्री वनिता गावंडे म्हणाल्या की,

ढग ढोलकी वाजोते 
मग पाऊस नाचते,
हिरवळिच्या वेशामधे 
कशी माऊली शोभते...
आदींसह या काव्यसंमेलनात कवी आत्माराम पळसपगा, उत्तमराव अरखराव, कैलास सुरवाडे, शिलवंत डोंगरे, देवानंद गवई, अरुण सिरसाट, बी. गोपणारायण, अनिल शामस्कर, सिद्धार्थ तायडे, मनोहर नागे, राहुल भगत, आकाश सरदार, धम्मपाल महाजन आदी कवींनी सादरीकरण केले. आपल्या अध्यक्षीय समारोपात ज्येष्ट कवी भगवंत तायडे यांनी कविता सादरी करत या उपक्रमास सदिच्छा व्यक्त केल्या ते म्हणाले की,

माझ्या घराला असाव्या भिंती
पण त्यावर धर्माचे चित्र नसावे,
माझ्या घराला असावी खिडकी
तिला कुठली जात नसावी!
या कविसंमेलनाचे सुत्रसंचालन प्रजानंद उपर्वट यांनी केल तर आभार पंजाबराव वर यांनी मानले. या काव्य संमेलनाला जिल्ह्यातील कवी/कावयित्रींनी मोठी उपस्थिती लावली.












टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या