डॉ. आनंद तेलतुंबडे यांना समजून घेतांना...... - प्रा. देवानंद पवार

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

डॉ. आनंद तेलतुंबडे यांना समजून घेतांना...... - प्रा. देवानंद पवार


(प्रसिद्ध आंबेडकरी कवी तथा रमाई धम्मसृष्टी स्मारक समितीचे अध्यक्ष प्रा. देवानंद पवार यांचा लेख)




आज आमचे जे काही आहे
ते सर्व तुझेच आहे
हे जगणे आणि मरणे
हे सुख आणि दुःख
हे स्वप्न आणि वास्तव
ही भूक आणि तहान
ही सर्व पुण्याई तुझीच आहे

जागतिक विद्रोही कवी नामदेव ढसाळ यांची ही कविता आमच्या जगण्याचं मूळ सांगून जाते , म्हणूनच आम्ही सुद्धा आमच्या जगण्याचा श्वास ऑक्सिजन बाबासाहेबांना समजतो कारण हजारो वर्षाच्या इतिहासाने सांगितले आम्ही गुलाम होतो आणि शूरवीर सुध्दा होतो या गुलामगिरीला नष्ट करण्यासाठी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी जीवाची पर्वा न करता अत्यंत संघर्ष करून आम्हाला माणसाचं जीवन बहाल केलं हे जीवन सहजपणे मिळालेलं नाही या मागे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संपूर्ण कुटुंबाचा त्याग आहे . कारण डॉ.बाबासाहेब आंबेडकर आमच्यासाठी संघर्ष करीत असतांना जीवन झिजवत असतांना रामजीचं निधन , लाडक्या राजरत्न यांचं निधन , उपाशीपोटी राहून बाबासाहेबांचा संसार चालविणारी माय माऊली रमाईचं निधन या कडे बाबासाहेबांचे दुर्लक्ष झाले असे नाही पण समाजासाठी विदेश दौरा ,अक्खा देश समाज परिवर्तनासाठी भ्रमण करणं हे ही आवश्यक होतं म्हणूनच त्यांच्या कुटुंबाची झालेली होरपळ आपलं जीवन फुलण्यासाठी त्यांच्या कुटुंबाची झालेली हानी याची भरपाई कोण भरून देणार ? हे समाजाने समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे . पण आपल्या समाजातील काही एकाच वर्गाचे अतिशहाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या घराण्याला मुद्दाम टार्गेट करून सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या अकलेचे तारे तोडत असतांना आपल्याला दिसून येत आहेत.

मित्र हो ! समाज मनात कलह होत असतांना समाजातील प्रतिभावंत कवी, गायक, पत्रकार, लेखक, विचारवंत यांनी गप्प बसने म्हणजे षंडाचे लक्षण होय, आज आपल्या समाजात अनेक प्रश्न भयावह उपस्थित होत असून आंबेडकरी चळवळीला मजबूत करण्याचे सोडून काही महाभाग डायरेक्ट आंबेडकरी घराण्याच्या विरोधात बोलतांना दिसतात. मला त्यांच्या बुद्धीची कीव येते, अरे... आपल्या घरातील भांडणे आपण किती तानायचे याचे तरी भान ठेवा नाही तर येणारी पिढी तुम्हाला माफ करणार नाही. कारण बाबासाहेबांचा संघर्ष हा एका रात्रीतून जन्माला आला नाही म्हणून याची जाण आणि भान ठेवून आपण वागायला पाहिजे . राहिला वाद - विवाद विचार सारणीचा प्रश्न हा ज्याचा त्याचा अधिकार बाबासाहेबांनीच दिला एखादा आंबेडकरी अनुयायी आपल्या पारंपारिक चाकोरीच्या कड्या तोडून जागतिक पातळीवर बाबासाहेबांचे विचार सांगत असेल लिहीत असेल तर त्याला चक्क हा आंबेडकरवादी नाही म्हणून वाळीत टाकायचं आणि असं वातावरण निर्माण करून इथल्या व्यवस्थेला खतपाणी घालण्याचं काम आपल्यातीलच अतिहुशार करीत असतांना दिसून येत आहेत. आजच्या या गंभीर परिस्थितीत सहकार्याची भावना तर सोडाच पण विरोध करणं त्यांना आज प्रतिष्ठतेचं वाटत आहे. याचा अर्थ असा की समाज परिवर्तन करतांना समाजातील फितूरांपासून बाबासाहेबांना त्या वेळेस सुध्दा त्रास झालाच असे नाही तीच वेळ तसाच अनुभव भय्यासाहेब यांना ही आला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चिरंजीव भय्यासाहेब ऊर्फ यशवंतराव आंबेडकर यांच्या विषयी सुद्धा आपल्यातील काही महाभागांनी त्यांच्या कार्याची
वास्तविकता नाकारून वर्चस्वाच्या राजकारणासाठी त्यांना बदनाम करण्याचे काम केले. त्यांच्या विषयी आंबेडकरी समाज मनात विष पेरलेलं होतं आज ही हे विष नव्याने काही प्रमाणात उगवतांना दिसत आहे हे आंबेडकरी घराण्या साठी नवीन नाही. पण अश्या या गद्दार विषा ला मुळातून उखडून आणि जाळून टाकणे आजच्या पिढीला महत्वाचे आहे नाही तर येणारे हे विषात्मक लोक हातात निळा झेंडा घेऊन भगव्यात शिरून आपल्याच माणसाची कत्तल करायला तयार होतील हीच परिस्थिती ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या विषयी आहे. ऍड. बाळासाहेब आंबेडकर हे उच्चकोटीचे विचारवंत असून आपल्या बुद्धीच्या जोरावर रात्रंदिवस समाज परिवर्तनासाठी झटत असतांना त्यांना आपल्यातीलच महाभाग वेगवेगळ्या प्रकारचे आरोप ठेवून त्यांच्या विषयी सुद्धा आंबेडकरी समाजात विष पेरत असतांना दिसत आहेत. हे तुम्ही आम्ही आणि आपण सर्वजण आज अनुभवतोच आहे. मला सांगायचे असे की ज्या बाबासाहेबांच्या कार्यामुळे आज आपण जिवंत आहोत आपल्या जीवनाची परिस्थिती त्यांच्यामुळेच बदलली हे सर्व ज्ञात असतांना बाबासाहेबांच्या घराण्याचा प्रमाणाच्या बाहेर द्वेष करणे कितपत योग्य आहे? हे आम्ही मुकाटपणे किती सहन करायचा ?

मित्र हो! आपण या विषयी बोलूच नये असे वातावरण इथल्या काही व्यवस्थेच्या बगलबच्चानी करून ठेवले आहे. त्यांनी भय्यासाहेब यांना छळले त्यांनी बाळासाहेबांना छळले आता आंबेडकरी समाजातील प्रसिद्ध विचारवंत डॉ. आनंद तेलतुंबडे यांच्या विषयी असचं होत आहे कारण आपल्या समाजाचा नियमच असा आहे एखादया माणसाचा अभ्यास न करता त्याला दोष देऊन समाजात त्याला इतके छळायचे की त्याच्या वाढदिवसावर ही जायचे नाही तर त्याच्या मौत वर ही जायचे नाही इतके आपण कट्टर आहोत या मुळेच आपण कुठेतरी थांबत आहो हे ही समाजाने लक्षात घेतले पाहिजे. म्हणजे आपले आप - आपसातील वाद उखरून काढणे आणि आंबेडकरी चळवळीला आणि आंबेडकरी घराण्याला वाऱ्यावर सोडणे याचा आपण विचार करायला हवा , काही अतिशहाने असे ही म्हणतात की बाबासाहेबांचे नातेवाईक आहेत म्हणून त्यांची तुम्ही बाजू घेताय का ? तुम्ही बाबासाहेबांचे भक्त आहात असे म्हणून चळवळीला ब्रेक करतात. मला त्यांना सांगावेशे वाटते अरे ...मित्रा ! ही आंबेडकरी घराण्यातील माणसं सूर्याच्या तेजाने माखली आहेत त्यांच्या बुद्धीमत्तेची, विचारांची पातळी तुला कशी कळणार जसे डॉ.बाबासाहेब आंबेडकर समजण्यासाठी फुले, शाहू समजून घ्यावे लागतात तसेच ऍड.बाळासाहेब आंबेडकर समजण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर, भय्यासाहेब आंबेडकर समजून घेणे अत्यंत महत्वाचे आहे वरच्या वर वाद घालून कसे कळणार आंबेडकरी घराणं ! राहिला प्रश्न डॉ.आनंद तेलतुंबडे यांचा डॉ.आनंद तेलतुंबडे समजून घेण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही त्यांचा अभ्यास करायला हवा त्यांनी लिहिलेल्या ग्रंथाचा अभ्यास करून पुढचे पाऊल उचलायला हवे आज डॉ.आनंद तेलतुंबडे यांना संशयास्पद अटक होते म्हणून आपण त्यांना सपोर्ट करायचे सोडून त्यांना विरोध कसा करता येईल या पद्धतीचं वातावरण आंबेडकरी समाजात निर्माण केल्या जात आहे. कोणी डॉ.आनंद तेलतुंबडे यांच्या विषयी लिहुच नये वा बोलूच नये असे दहशतीचे वातावरण इथल्या बांडगुळानि सोशल मीडिया च्या माध्यमातून करत असतांना आपल्याला दिसत आहे. मित्र हो ! आपल्या आंबेडकरी चळवळीत ज्यांनी ज्यांनी चाकोरीच्या बाहेर जाऊन कार्य करायला सुरुवात केली आपण त्यांना वाळीत टाकल्या सारखे केले आहे. मग तो इथला कवी, गायक, लेखक, विचारवंत असो फक्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेऊन तो भगव्यात शिरला तरी चालेल असा आपला चळवळीचा भास आहे . म्हणून ओठातील बाबासाहेब आणि पोटातील बाबासाहेब आपण कधी समजणार ?

करोना विषाणू च्या प्रादुर्भावाने या वर्षीच्या भीमजयंती ला लागलेलं गालबोट हे आम्ही माणूस वाचविण्यासाठी होतं म्हणून समजून घेऊ पण भीमजयंती दिनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातजावई डॉ.आनंद तेलतुंबडे यांना सरेंडर करून घेणे या व्यवस्थेच्या मनातील काळा डाव आपण समजून घ्यायला हवा . मित्र हो! डॉ.आनंद तेलतुंबडे हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे चिरंजीव यशवंतराव भीमराव आंबेडकर यांची कन्या प्रा.रमा तेलतुंबडे यांचे ते पती आहेत. इतकं काही असून सुद्धा समाजातील काही अतिशहाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ.तेलतुंबडे यांचा त्यांच्या घराण्याशी काहीच संबंध नसल्याचे भासवून तसा या विषयाला आकार देत आहेत. म्हणून आंबेडकरी चळवळीतील वा समाजातील तमाम भीमसैनिक यांना माझा प्रश्न आहे आपल्या नात्यातील एखादी व्यक्ती संकटात असतांना आपण काय करतो हा प्रश्न आपणच आपल्याला विचारावा आणि नातं काय असते ? हे वांझोट्याला काय कळणार ? हा प्रश्न डोळ्यासमोर ठेऊन इतक्या कुजक्या विचारांची आंबेडकरी चळवळ नाही आहे हे माणसं तोडणाऱ्या चळवळीतील फितुरांनी समजून घ्यायला हवं नाही तर अकलेचे तारे तोडणारे म्हणतात डॉ.आनंद तेलतुंबडे हे आंबेडकरवादी नाहीत, आंबेडकरी विचारवंत नाहीत मान्य आहे तुझा विचार करण्याचा तो भाग आहे. असाच एक संवाद बाबासाहेबांच्या संदर्भात असावा एका पत्रकाराने बाबासाहेबांना विचारले बाबासाहेब स्वातंत्र्याच्या चळवळीत तुमचे काय योगदान आहे तेव्हा बाबासाहेब म्हणाले मित्रा तुझा अभ्यास असेल तर माझ्या किती तरी पिढ्या ह्या स्वातंत्र्या साठी तुरुंगात जन्माला आल्या आणि तिथेच मरणपावल्या. असो मित्र हो ! आपले जगणेच संघर्षाचे आहे मग डॉ.आनंद तेलतुंबडे या मधून कसे सुटणार ते कम्युनिस्ट साम्यवादी आहेत विचारा - विचारांची लढाई आपण समजून घेऊ पण ते आपले कोणीच नाही असा जेंव्हा डाव आखल्या जातो तेंव्हा दाल मे कुछ काला हैं ! असे आपणास स्पष्टपणे दिसून येते. आमच्या सह कोणालाच वाटत नाही भीमजयंती दिनी राजगृहा वर काळा झेंडा फडकावा पण या मागचे कारण ही आपण शोधले पाहिजे . मित्र हो ! निसर्गाचा नियम आहे ज्याच्या डोळ्याचे केस उपटले त्याच्याच डोळ्यात आसू येतील बाबासाहेबांच्या घराण्यातील त्यांच्या रक्ताचा अंश असलेले ऍड.बाळासाहेब आंबेडकर, आनंदराज आंबेडकर, भीमराव आंबेडकर, आणि प्रा.रमा तेलतुंबडे यांना राजगृहावर काळा झेंडा फडकविल्याचा आनंद आहे का ? मुळातच नाही हा प्रश्न सुद्धा भीमसैनिकाने समजून घेणे अत्यंत महत्त्वाचा आहे. ही व्यवस्थाच आपल्या माणसाच्या हातून आपल्या माणसाचा जीव घेते की काय ? या प्रश्नाचे आंबेडकरी समाजाने सिंहावलोकन करून चिंतन करायला हवे आणि आपला आंबेडकरी समाज एकात्मतेच्या प्रवाहात कसा येईल या कडे लक्ष दयावे नाही तर आपल्या आंबेडकरी समाजात आज ही पोटजाती नुसार नेते, विचारवंत तयार करून त्यांचे नेतृत्व स्वीकारून आंबेडकरी घराण्याला आत मधून  छेडत आहेत. याचा कुठं नवीन पिढीने विचार करायला हवा. म्हणून या विषयी लिहीत असतांना माझी आपल्या समाजाला कळकळीची विनंती आहे. मित्र हो ! माणसं वाचायला शिका एखाद्या स्वार्थासाठी व्यवस्थेला बळी जाऊ नका. समाजात जिंदा असलेल्या माणसांचीच निंदा होत असते. आज ही ग्रामीण भागातील मायबाप यांना आंबेडकरवाद काय असतो हे समजू शकत नाही म्हणून ते जयभीम ! म्हणजेच सर्वकाही म्हणून आम्हाला कुठल्याच वादात पडायचे नाही जयभीम म्हणजेच आमचे सर्वकाही म्हणून आम्ही आज ही आमच्या काही पारंपरिक पद्धतीनेच निळा झेंडा हातात घेऊन मार्गक्रमण करीत असतो . म्हणून समाजातील फितूर गद्दार यांना मला सांगायचे आहे आम्हाला तत्वज्ञान शिकू नका कारण बाबासाहेब जन्माला आले नसते तर कुठला विचार आणि कुठला वाद या सर्व गोष्टींचा विचार करून आंबेडकरी घराण्या विषयी या पुढे शंका जरी घेतली तरी याचे गंभीर परीणाम भोगावे वा सोसावे लागतील आणि या पुढे जाऊन सांगतो तुम्ही मला व माझ्या सारख्याला आंबेडकरी भक्त आहेत असे म्हणून घराणेशाही ला मानतात .तर मी अश्या बालबुद्धी असणाऱ्याला सांगू इच्छितो  बाबा रे बाबासाहेब होते म्हणून आपण आहोत म्हणून त्यांच्या विषयी आपल्याला काहीच करता येत नसेल तर त्यांच्या घराण्याला कश्याला नावे बोटे ठेवतो मान्य आहे तुझे तत्वज्ञान तू तुझ्या जवळच ठेव म्हणून समाजातील अश्या व्यवस्थेला बळी न पडता रमाई च्या आणि बाबासाहेबांच्या नातवांसह त्यांच्या नातेवाईकांना ही आंबेडकरी चळवळीने आणि समाजाने आपण बाबासाहेबांना जसे जपतो तसेच तळहातावरील फोडा प्रमाणे त्यांना ही जपले पाहिजे नाही तर आपला येणारा काळ हा जोहार मायबापचाच असेल.
जयभीम !

प्रा.देवानंद पवार
अध्यक्ष : रमाई धम्मसृष्टी स्मारक समिती, महाराष्ट्र
बोला : 09158359628

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या