Social24Network
उत्तर प्रदेश सरकार संविधानद्रोही ; रेखा ठाकूर यांचा आरोप
मुंबई/प्रतिनिधी:- उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात वाल्मिकी समाजातील तरूणीवर झालेल्या बलात्कार व हत्येप्रकरणी वंचित बहुजन महिला आघाडीच्या अध्यक्षा रेखा ठाकूर यांनी योगी सरकारचा चांगलाच समाचार घेतला आहे. उत्तर प्रदेशमधील सरकार संविधान द्रोही असून मनुस्मृतीची व्यवस्था निर्माण करीत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे.
या संदर्भात वंचित बहुजन महिला आघाडीच्या अध्यक्षा रेखा ठाकूर यांनी यासंदर्भात एक पत्र प्रसिद्ध केले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की,
उत्तर प्रदेशातील हाथरस येथील 19 वर्षीय वाल्मिकी समाजातील तरुणीवर, त्याच गावातील ठाकूर आणि राजपूत या उच्च जातीच्या तरुणांनी सामूहिक बलात्कार करून तिने आरोपीचे नाव सांगण्याची हिंमत करू नये म्हणून तिची जीभ देखील कापून काढली. तिच्यासोबत झालेल्या या भयावह, क्रूर, अमानुष बलात्कारामुळे आणि तिला वैद्यकीय उपचार मिळण्यास झालेल्या अडथळ्यांमुळे काल तिचा मृत्यू झाला. काल तिचे प्रेत घरच्यांना सुपूर्द न करता, पोलिसांनी परस्पर तिच्यावर अंतिम संस्कार केले. अंतिम संस्काराच्यापूर्वी घरच्यांनी विनवणी करूनही तिचे दर्शन घेऊ दिले नाही आणि अंतिम संस्कारांच्या वेळी घरच्यांना व प्रेसला अंधारात ठेवण्यात आले.
सुरुवातीला आरोपीच्या विरोधात FIR करण्यात देखील पोलिस टाळाटाळ करत होते. या टाळाटाळी बद्दल सरकार विरोधात आवाज उठल्या नंतर FIR घ्यावा लागला. ही घटना उत्तरप्रदेशातील योगी सरकार आणि पोलीस दाबण्याचा प्रयत्न करीत होते आणि आहेत. या तरुणीला वेळेवर वैद्यकीय मदत देखील मिळाली नाही अन्यथा तिचा जीव वाचू शकला असता, क्रूर अमानुष अत्याचाराची ही घटना आणि त्यानंतर संपूर्ण शासन व्यवस्थेने तिला मदत देण्यासाठी केलेले असहकार्य आपल्या संपूर्ण समाजाला आणि भारतीय राज्य व्यवस्थेला लज्जास्पद अशी घटना आहे.
वंचित बहुजन महिला आघाडी या शर्मनाक घटनेचा तीव्र निषेध करते. मनुस्मृतीच्या व्यवस्थेचा पगडा भारतीय समाजातील उच्चवर्णियांवर आजही कायम आहे त्यामुळे महिला आणि शूद्रातिशूद्रांवरील अत्याचार वाढत चालले आहेत. परंतू मनुस्मृतीच्या व्यवस्थेला नकार देऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय समाजाला समतेचे अधिकार देणारे संविधान दिलेले आहे आणि नागरिकांच्या या समतेच्या अधिकारांचे रक्षण करण्याची जबाबदारी राज्य व्यवस्थेला दिलेली आहे. ही संवैधानिक जबाबदारी पार पाडण्यास नकार देऊन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकार व पोलिस संविधानाशी सातत्याने द्रोह करीत आहेत व मनुस्मृतीची व्यवस्था राबवत आहेत.
या अमानुष घटनेची वंचित बहुजन महिला आघाडी निंदा करत आहे आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी याची मागणी करीत आहे. वंचित बहुजन महिला आघाडी निघृण अत्याचाराची बळी झालेल्या उत्तर प्रदेश मधिल आमच्या भगिनीला विनम्र अभिवादन करीत आहे आणि उत्तर प्रदेश सरकारचा तीव्र निषेध करीत आहे.
0 टिप्पण्या