सवलतीसाठी अस्पृश्य राहावे काय?

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

सवलतीसाठी अस्पृश्य राहावे काय?

 सवलतीसाठी अस्पृश्य राहावे काय?



दि. १३ ऑक्टोबर १९५६ रोजी ‘‘बौद्ध धम्म स्वीकारण्या"पूर्वी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपुर येथे घेतलेली ऐतिहासिक पत्रकार परिषद आम्ही येथे प्रसिद्ध करीत आहोत. 

"मी. गांधीजींना असे आश्वासन दिले होते की, कमीतकमी हानकिारक मार्ग मी स्वीकारीन. तद्नुसार आता बौद्ध धर्म स्वीकारुन मी हिंदू समाजाच्या दृष्टीने एक उपकारक कृत्यच करीत आहे, कारण बौद्ध धर्म हा भारतीय संस्कृतीचेचे अंग आहे." असे उदगार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दि. १३ ऑक्टोबर १९५६ रोजी सायंकाळी 'धर्मांतरा' विषयी पत्रकारांशी बोलताना काढले. "या धर्मातरामुळे घटनेने अस्पृश्य वर्गाला ज्या खास सवलती दिल्या आहेत. त्या जातील त्याविषयी काय?" असा प्रश्न विचारला असता बाबासाहेब म्हणाले, "सर्वसामान्य नागरिकांसाठी ज्या सवलतीची तरतूद केलेली आहे, त्या धर्मांतरानंतर आम्हाला मिळतील. पण खास सवलतीचा प्रश्न का उपस्थित करता? त्याविषयी चिंता कशाला? घटनेने दिलेल्या खास सवलतीचा लाभ उठविता यावा म्हणून आम्ही सदासर्वकाळ अस्पृश्यच राहावे असेच तुम्हाला वाटते का? आम्ही मनुष्यत्व गाठण्याचा प्रयत्न करीत आहोत. घटनेने दिलेल्या खास सवलती मिळाव्यात म्हणून ब्राह्मण अस्पृश्य होतील का?"

पत्रकार -  त्यांना त्याची गरज नाही...

डॉ. आंबेडकर -  कदाचित त्यांना तशा खास सवलती मागण्याचाही काळ येईल. नाही कोणी म्हणावे? पण पूर्वी जेव्हा आम्ही विभक्त मतदार संघाची मागणी केली तेव्हा गांधीजींनी विरोध केला. मग आताच खास सवलतीचा मुद्दा का पुढे केला जातो. बौद्धधर्म स्वीकारताना खास राजकीय हक्कामध्ये माझे हितसंबंध गुंतलेले नाहीत. जर विभक्त मतदार संघ आहेत, त्याची अवस्था अशी आज काय आहे? काँग्रेसने सर्वच जागा बळकावल्या आहेत ना? आणि अस्पृश्यांचे म्हणून जे प्रतिनिधी राखीव मतदार संघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडून गेले त्यांनी कधी तरी अस्पृश्यांचे हिताचे काही केले आहे काय? अशा जागा घेऊन करावयाचे तरी काय?

पत्रकार - आपण धर्मांतराचा निर्णय का घेतला?

डॉ. आंबेडकर - शतकानुशतके सवर्ण हिंदूंनी आणि विशेषतः ब्राह्मणांनी आमच्याशी गैर व्यवहार केला म्हणून! ज्यांच्या नाकाला काही घाण असेल, तर तो प्रत्येक जण बौद्ध होईल. बौद्धधर्म हा विश्वधर्म आहे, माझे क्षेत्र मला केवळ अस्पृश्यांपुरतेच मर्यादीत करावयाचे नाही. संपूर्ण भारतात धम्मचक्र प्रवर्तन घडवून आणावयाचे आहे. मी सांगतो ते चिरकाल मानावे, असे बुद्धाने कधीही सांगितले नाही. जे मी सांगितले ते काळाशी विसंगत असेल तेव्हा त्यात परिवर्तन करावे, असे सांगून त्यांनी इतकी मोकळीक दिली आहे. प्रथम लोकांच्या विचारात क्रांती करावी लागते, मग आचारक्रांती होते.

पत्रकार - विचारात आणि आचारात काहीच तफावत राहणार नाही काय?

डॉ. आंबेडकर - फरक पडतोच, पण धर्माचे शिक्षणही समाजाला द्यावे लागते. 

पत्रकार - एक जातीभेद सोडला तर तुम्ही बौद्ध आणि हिंदू धर्मात काय फरक दाखवाल?

डॉ. आंबेडकर - प्राण सोडला तर शरीरात काय राहिले, असा सारखाच हा प्रश्न आहे. हा जातीभेद तुम्हीच पाळता ना? जातीभेद वाढविला कोणी? ब्राह्मणांनी आम्हाला आणि मराठ्यांना कधीही मतस्वातंत्र्य दिले नाही.

पत्रकार - हा जातीभेद अस्पृश्य वर्गातील होतो ना? तो बौद्धधर्म स्वीकारल्यानंतरही कायम राहणार नाही कशावरून?

डॉ. आंबेडकर - तो आम्ही तुमच्या कडूनच घेतला ना? पण त्यास आम्ही प्रतिरोध तर करू शकतो. मी शूर आणि धीट आहे. मी लोकांना कसे वागावे याचे आदेश देईन, नाही तर मी एकटाच बौद्ध होईल त्यात बिघडले कोठे? आणि माझा तर असा प्रश्न आहे की, बुद्ध कालीन ब्राह्मणांना बौद्ध धर्म कसा पटला? आणि आताच तो का पटत नाही. मी हा प्रश्न माझ्या जाहीर भाषणात विचारणार आहे.

पत्रकार - धर्मांतरानंतर शेड्युल कास्ट फेडरेशनचे होणार?

डॉ. आंबेडकर - कदाचित तो कायम राहील किंवा नवा पक्ष स्थापन होईल. मी मात्र बौद्ध धम्मात प्रवेश केल्यानंतर शेड्यूल कास्ट फेडरेशनचा राहणार नाही.

पत्रकार - बौद्ध धम्म स्वीकारल्यानंतर आपण काय करणार?

डॉ. आंबेडकर - मी 'मिशनरी' होणार आहे. पण राजकारणाचा संन्यास मात्र घेणार नाही. निवडणुकीलाही निश्चितपणे उभा राहीन.

पत्रकार - रिपब्लिकन पार्टी स्थापन करण्याचे आपण निवडणुकीलाही निश्चित केले आहे काय?

डॉ. आंबेडकर - हो. ते नक्की ठरवले आहे. मी त्या पक्षाची घटनाही तयार केली आहे. त्याच्या प्रिअंबलमध्ये स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या तत्वावर हा पक्ष आधारलेला राहील असे मी स्पष्ट केले आहे. पार्लमेंटमध्ये येणाऱ्या प्रत्येक विधेयकाची कसोटी या तीन निष्कर्षावर पाहिली जाईल. 

पत्रकार - पण पक्षाचे तत्वज्ञान कोणते राहील? आणि या पक्षाचे स्वरूप व्यापक राहील का?

डॉ. आंबेडकर - पक्षासाठी मुख्य गरज असते ती कणखर नेत्याची आणि या पक्षात सर्वांना पक्षात प्रवेश दिला जाईल.

पत्रकार - द्विभाषिक विषयी आपले काय मत आहे? ते टिकेल का?

डॉ. आंबेडकर - ते मोडून काढणे हे तर माझे आद्य कर्तव्यच आहे. ज्या सांस्कृतिक सीमा भारतात स्वाभाविकपणे निर्माण झाल्या आहेत, त्या आपण बदलू शकत नाही.

पत्रकार -बौद्ध धम्माची दीक्षा दिल्यानंतर कालचे महार उद्या बौद्ध होतील. तर उद्याचा बौद्ध कसा ओळखू येईल?

डॉ. आंबेडकर - माझा बौद्धधर्मीय हा आचरणाने ओळखू येईल. त्याचं चालणं, त्याचं बोलणं, त्याचं वागणं, त्याचं जेवण हे सर्व श्रेष्ठ दर्जाचे असेल. आणि विशेष म्हणजे तो निर्व्यसनी असेल!

(मुलाखत समाप्त)


संकलन

भन्ते अश्वजित

सदधम्म बुद्धविहार, 

आरती नगर,औरंगाबाद.

मो. नं. ९६७३२९२२९७

भन्ते अश्वजीत यांचे आणखी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

बौध्दांचा कायदा म्हणजे २२ प्रतिज्ञा !

संघर्षाचे नांव डॉ. बाबासाहेब आंबेडकर! 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे धम्म मिशन 

मातापितु उपट्ठानं 

दुःखाचे कारण आणि उपाय  सर्वप्रथम बुद्धांनीच सांगितले!


टिप्पणी पोस्ट करा

3 टिप्पण्या

Unknown म्हणाले…
बाबासाहेब आंबेडकर यांची महत्त्वपूर्ण मुलाखत .आपण छान लेख आहे
Unknown म्हणाले…
वन्दा मि भन्ते ,
" ज्यांच्या नाकाला जातीची दुर्गंधी येईल तो प्रत्येक जन बौद्ध झाल्याशिवाय राहणार नाही " .
हे बाबासाहेबानी सांगितलेल भविष्य अक्षरशः खर होताना दिसून येत आहे .
पण आम्ही कमी पडलो . बाबासाहेबाना ' फक्त ' मानणारा समाज नीट बौद्ध झाला नाही . त्यामुळे बौद्ध समाजाचा नेमका आदर्श आम्ही इतरांना दाखवून दिला नाही .
बाबासाहेबांच्या म्हणण्याप्रमाणे , विचारात क्रांती झाल्याशिवाय आचारात क्रांती होत नाही , त्यासाठी समाजाला धर्माचे शिक्षण ही द्यावे लागते . '
नेमके इथेच आम्ही चुकलो . कारण धर्माचे शिक्षण देण्याची
सोय आम्ही निर्माण केली च नाही .
जातीच्या नरकातून देश अजूनही बाहेर पडलेला नाही .
त्यामुळे अन्याय -अत्याचाराला सीमा उरली नाही . जातीच्या माणसीकतेमुळे इथे माणसे पशू बनत आहेत .
या नरकातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे
" बौद्ध बनन्याचा " जो पक्का मार्ग या देशाला दाखवून दिला .
त्याला दुसरा पर्यायच नाही .
आद. भन्ते आपण बाबासाहेबांचा नेमका दृष्टीकोन ,
त्यांची दि०य दृष्टी समाजासमोर ठेवीत आहात , त्या बद्दल आपणास खुप खुप धन्यवाद .
साधुवाद .
जयभीम ...
sujay म्हणाले…
वंदामि भंतेजी
छान लेख आहे
साधू साधू साधू!