बाबांच्या लाडक्या मुलांनो... - प्रदीप नाईक

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

बाबांच्या लाडक्या मुलांनो... - प्रदीप नाईक

 बाबांच्या लाडक्या मुलांनो... - प्रदीप नाईक 

बाबांच्या लाडक्या मुलांनो...


Social24Network

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या महापरिनिर्वाणदिनी अभिवादन करतांना त्यांनी सुरु केलेल्या सामाजिक, राजकिय, शैक्षणिक आणि धार्मिक चळवळीचा आढावा घेतला तर आज या चळवळींची प्रचंड मोडतोड झालेली दिसते. बाबासाहेबांचा मूळ विचार या चळवळीच्या अजेड्यांतून गायब झालेला दिसतो. आज साठ सत्तर वर्षानंतर या चळवळीचां आढावा घेतला तर त्याचं अस्तित्व मिटत चाललेलं दिसत. दिसत आहे असं का झालं याचा सखोल विचार केला तर महाकवी वामनदादा कर्डक यांच एक गाण आहे. ते म्हणतात “बाबांच्या लाडक्या मुलांनो घर हे सोडू नका, भीमाची आज्ञा मोडू नका” महाकवी वामनदादा कर्डक यांनी आंबेडकर चळवळीवर केलेले हे धगधगीत भाष्य वर्तमान आंबेडकरी चळवळीच्या दृष्टीने आजही तितकेच महत्वाचे आणि विचार करण्यास भाग पडणारे आहे. बाबासाहेबांनी सांगितलेला एखादा तरी विचार त्यांचे अनुयायी म्हणवणाऱ्यांनी पूर्णत्वास नेला का? याबद्दल आत्मपरिक्षण करणे गरजेचे आहे.  

भारतीय संस्कृतीच्या संगमावर आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवणाऱ्या महापुरुषापैकी बाबासाहेब आंबेडकर हे अलौकिक पुरुष होते. भारताबरोबरच त्यांनी जागतिक पातळीवर आपल्या विद्वतेचा आणि सामाजिक कार्याचा ठसा उमटविला. एकोणिसाव्या शतकातील ते शेवटचे महापुरुष ठरले. कष्टमय प्रयासाने विषमता तुडवीत आणलेला हा समतेचा रथ मोठया विश्वासाने त्यांनी आपल्या अनुयायांच्या हाती सोपवला. त्यांना आशा होती कि, माझी अनुयायी हा रथ पुढे घेऊन जातील व सांगितलेल्या मार्गातून समानतेच्या प्रकाशवाटा निर्माण करतील पण बाबासाहेबांचा हा विश्वास त्याच्या अनुयायांनी सार्थ ठरवला नाही त्यांचे स्वप्न हे स्वप्नच राहिले.
 

बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांनी उभ्या केलेल्या सामाजिक, धार्मिक आणि राजकीय शैक्षणिक चळवळीच नेतृत्व आपल्यालाच मिळाव यासाठी स्पर्धा चालली होती. खर तर बाबासाहेबांनी उभ्या केलेल्या चळवळी तळागापर्यंत पोचवण्यात व त्या लोकभिमुख होण्यासाठी पुढाकार घेण्याऐवजी आपल्या गळ्यात नेते पदाची माळ पडावी यासारखा नतद्रष्टेपणा अनुयायांनी का करावा? त्यांना अनुयायी म्हणावेत का? असाही प्रश्न पडतो आज बाबासाहेबांना जावून सहा सात दशके झाली तरी नेतृत्वाची चढाओढ चालूच आहे. या चढाओढीत बाबासाहेबांचा समाजउद्धाराचा विचार बाजूलाच राहिला. आजपर्यंत बाबासाहेबांसारखा नेता या समाजात जन्माला आलेला नाही. ही निंदणीय गोष्ट आहे. शिका संघटीत व्हा आणि संघर्ष करा. हा बाबासाहेबांनी सांगितलेला संदेश आम्ही उठता बसता दुसऱ्यांना सांगत फिरतो पण स्वतः मात्र पाळत नाही. आम्ही शिकलो स्वतःला नोकरी मिळवण्यासाठी आणि संघर्ष केला. कशासाठी तर उच्च पद, पैसा, गाडी आणि बंगला मिळवण्यासाठी माझंघर भलं आणि मी भला ज्या चळवळीमुळे मला वैभवाचे दिवस दिसले त्या चळवळीला मी काही देण लागतो ही संवेदना माझ्यात राहिली नाही. राखीव जागा टिकवण्यासाठी मी प्रयत्न केले नाही. उलट माझी कुवत असताना सुद्धा मी माझ्या मुलांचं सर्व शिक्षण राखीव जागा घेऊन केले त्यामुळे काही गरीब वि|kर्थींना या लाभांपासून वंचित राहावे लागले मी हा सामाजिक गुन्हा केला आहे. अशी भावना सुद्धा माझ्या मनाला शिवली नाही. मन भर वाचव आणि कणभर अनुकरण कराव अशी म्हण आहे आम्ही बाबासाहेब वाचले फक्त आमच्या पुरते आणि कपाटात बंद केले आम्ही त्यांच्या नावाने स्मारक बांधली, पुतळे उभारले, चौकाला, रस्त्याला नाव दिली. पण शाळा, कॉलेज काढली नाहीत, आय.ए.एस. रँकचे अधिकारी घडवले नाही. न्यायमूर्ती, वकील, डॉक्टर, इंजिनिअर, अर्थतज्ञ इत्यादी महत्वाच्या क्षेत्रात आपल्या विचारांचे वि|kर्थी तयार केले नाहीत. बँका, पतपेढया, कारखाने, हॉस्पिटल्स या आर्थिक उन्नतीच्या क्षेत्रात आम्हाला स्वारस्थ नाही. आम्ही देणाऱ्यापेक्षा मागणारेच जास्त त्यामुळेच उदवस्त घराचे मालक होण्याचे पातक आमच्या भाळी आले. आपल्या ताटात पंचपकवान असूनही आम्हाला तराळकीच्या तुकड्याची सवय झाली आहे.  

समाजामध्ये सर्व प्रकारची विषमता नष्ट व्हावी आणि समाज समानतेच्या व्यापक विचारधारेशी जोडला जावा यासाठी आम्ही समाजापर्यंत गेलो नाही त्यासाठी कृतीकार्यक्रम राबवला नाही. भाषणे झोडली व्याखाने दिली. समानतेचा विचार सांगितला पारंपारिक चौकटीत राहूनच. आम्ही स्वतःला कार्यकर्ते म्हणवून घेतो. मिरवतो पण लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्नांची आम्हाला कणभर जाणभाण नाही. त्यामुळे माणूस बदलला की सोसायटीबदलते या सारख्या प्रश्नांच्या खोलात आम्ही केव्हा शिरलो नाही व तशी गरजही वाटली नाही. आम्ही बाबासाहेबांच्या नावाचा जय जयकार करतो. छातीफुटेपर्यंत जोरात घोषणा देतो. या निरर्थक गोष्टीत आम्ही स्वतः खूष असतो. महापुरुषांच्या अनुयायांची मने विकसीत झाली तर महापुरुषांच्या मनातील स्वप्ने साकार झाल्याशिवाय राहणार नाहीत पण खेदाने असे म्हणावे लागते की बाबासाहेब आंबेडकराना असे अनुयायी लाभले नाहीत.

मार्क्सला मर्यादित अनुयायी लाभले त्यांनी मार्क्स काय आहे हे जगाला सांगितले जगभरात मार्क्सचे तत्वज्ञान सांगणारे अभ्यासक निर्माण झाले आणि आम्ही मात्र बाबासाहेबांनी हे केले ते केले हेच सांगत राहिलो. छप्पन नंतर आपण करायला हवं ते सांगितलेच नाही. कोणत्याही समाज व्यवस्थेमध्ये दोन समाज घटक असतात. एक संघटीत व दुसरा असंघटीत. संघटीत समाज आपल्या सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक प्रश्नाविषयी जागृत असतो. तो नुसताच जागृत नसतो तर इथली राजकीय व सांस्कृतिक सत्ता आपल्या हातात कशी राहील याची तो पुरेपूर काळजी घेतो. इथली प्रस्तापित व्यवस्था आणि राजकीय सत्ता आपल्या हाती कायम ठेवण्यासाठी त्याची स्वतःची एक आचारसहिंता असते. या आचारसहिंतेच्या माध्यमातून तो स्वताची यंत्रणा राबवतो. विस्कळीत समाजाला तस जमत नाही. तो नेतृत्वहीन असल्यामुळे त्याला कुठल्याच प्रकारची जाणीव नसते. त्यामुळे तो प्रस्थापित व्यवस्थेचा बळी ठरतो. संघटीत समाज घटक विस्कळीत समाजाच्या मिथिकांचा शोध घेऊन आपल्या सामाजिक व राजकीय स्वार्थासाठी त्यांचा वापर करतो. सहा दशकांच्या वाटचाली नंतर आपण नक्की कोणत्या व्यवस्थेचा भाग होणार आहोत.  

महापुरुषांच एक वैशिट्य असे आहे की, त्यांना पूर्ण अवस्था प्राप्त झाल्यावर ते परत समाजाकडे वळले. समाजाच्या प्रश्नांच अभ्यास करून लढे उभे केले आणि पूर्णत्वास नेले समाजाला त्यांच्या मानवी हक्कापासून वंचित ठेवणाऱ्या व्यवस्थेला त्यांनी फासावर लटकवले. समाजाच दायीत्व स्वीकारून आदर्श नेतृत्वाचा वस्तूपाठ घालून दिला. पण त्यांनी नेतृत्वाचा धंदा केला नाही. आम्ही मात्र नेतृत्वाचा नावावर स्वतःचा उद्धार करून घेतला. आज बाबासाहेबांच नाव घेऊन चालणाऱ्या पायतीच्या पन्नास संघटना आहेत पण त्या संघटनेत मात्र बाबासाहेबांचा विचार नाही. 

जे जे वडीले निर्मिले ते ते पाहिले पाहिजे आणि अभ्यासले पाहिजे व येणाऱ्या पुढच्या पिढीपर्यंत पोचवले पाहिजे अनुयायी म्हणून आम्ही तिथेच कमी पडलो यश अपयश याची चर्चा करताना व्यक्तीच यश मोठी कि समुहाच यश मोठ याची तुलना केली तर चळवळीत नेतृत्व करणाऱ्या व्यक्ती मोठया झाल्या पण चळवळ मात्र खुंटत गेली त्यामुळे समुह म्हणून पदरी अपयश आलं ही ऐतिहासिक चूक सुधारण्याची संधी अनेकदा मिळाली असताना सुद्धा आम्ही ती नाकारली वामन दादांच्या शब्दात सांगायचं झाल तर.  


परिश्रमाची शर्थ करुनी

संघटना घडविली,

समतेच्या सागरी विषमता

कायमची बुडविली

समतेचे आणि बंधुत्वाचे

नामे तोडू नका...


आमच मोडक घर तांगडण्यापेक्षा दुसऱ्याच्या घरात आश्रय घेण्यात आम्हला असुरी आनंद मिळतो. आम्ही भाषणात समता सांगतो आणि व्यक्तीगत वर्तमान पराकोटीची तुच्छता पाळतो. विषमतावादी विचारसरणीशी स्वार्थासाठी हात मिळवणी करतो स्वतःसाठी पदे मिळवितो- अशा प्रवृत्तीमुळे चळवळीची वैचारिक द्रुष्ट्या प्रचंड हानी झाली. बाबासाहेबांनी मोठ्या कष्टाने उभी केलेली समतारुपी झोपडी त्याच्या लाडक्या मुलांनी अशी उध्वस्थ करून टाकली.  


प्रदीप नाईक 

मो. नं. ८६५२५६५८२१

नवी मुंबई 

pgnaik70@gmail.com


(लेखक हे माझ अस्तित्व हया मासिकाचे संपादक व सामाजिक कार्यकर्ते आहेत) 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या