स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही सिकलकरी समाज पारतंत्र्यातच ; अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही सिकलकरी समाज पारतंत्र्यातच ; अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

(वंचित बहुजन आघाडी प्रणित भटके-विमुक्त, आदिवासी समन्वय समिती अंतर्गत दि. १९ जानेवारी २०२० रोजी औरंगाबाद येथील मौलाना अब्दुल कलाम आझाद सभागृह येथे अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सिकलकरी समाजाचा मेळावा संपन्न झाला. यावेळी बाळासाहेब आंबेडकरांनी केलेल्या भाषणाचा मराठी अनुवाद आज आम्ही येथे प्रसिद्ध करीत आहोत. सिकलकरी समुहाचे प्रश्न या भाषणातुन बाळासाहेबांनी जनतेसमोर मांडले आहेत. वंचित बहुजन आघाडी ही छोट्या-छोट्या जाती समुहांना मुख्य राजकीय प्रवाहात आणु पाहत आहे. म्हणुन हा विचार, ही भुमिका सर्वदुर पोहचविण्यासाठी आपण सर्वांनी जास्तित जास्त शेअर करून सहकार्य करावे.)

Social24Network

मंचावर उपस्थित मान्यवर आणि माझ्या बंधु भगिनींनो! सिकलकरी समाजाचा आजचा हा मेळावा औरंगाबाद सारख्या ठिकाणी मौलाना अब्दुल कलाम आझाद नावाच्या सभागृहात होत असल्याने या मेळाव्याला विशेष महत्त्व आहे. नागपुर नजीक असलेल्या तळेगाव येथील सिकलकरी बांधव माझ्या परिचित आहेत. आणि त्यांना सुद्धा मी परिचित आहे. समाजाच्या परिस्थिबद्दल मी जाणुन आहे. परंतु आज विशेष आनंद वाटत आहे तो या गोष्टीचा की एकत्र आल्याशिवाय आता पर्याय नाही ही भुमिका आता सामाजिक पातळीवर घेतल्या जात आहे. सिकलकरी समाजाने शिख समुहाबरोबर जुळण्यासाठी अनेकदा प्रयत्न केले त्याबद्दलही मी जाणुन आहे. परंतु ज्या पद्धतीने शिख समुहाने त्यांना स्वीकारायला हवे होते त्या पद्धतीने स्वीकारलेले नाही. हे वास्तव आहे. मी त्याच्या खोलामध्ये जावु इच्छित नाही. कारण या समाजाला मोठा इतिहास आहे. आणि या इतिहासाच्या जोरावर आम्ही आमची स्थिती बदलवु शकतो. हे तुम्हाला पहिल्यांदा ठरवावे लागेल.


आपणा सर्वांना माहिती आहे की, सच्चर कमिटीच्या रिपोर्टमध्ये मुस्लिम समाजाचे शैक्षणिक प्रमाण कमी असल्याचे सांगीतले होते. त्यानंतर मुस्लिम समाजाने एकत्रीत निर्णय घेतला कीए आपल्या मुला-मुलींना शिक्षणासाठी तयार करणार. मग ते मदरशाच्या माध्यमातुन, नगरपरिषद, मनपाच्या शाळा असतील किंवा ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांनी खासगी शाळांमध्ये आपल्या मुलांना दाखल करावे. हा सामुहिक निर्णय झाल्यानंतर आज वीस वर्षांनी जेव्हा आम्ही मुस्लिम समाजाकडे पाहतो तेव्हा त्यांच्या शैक्षणिक पातळीमध्ये 60 टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे पाहायला मिळेल. म्हणुन तुम्हाला तुमची लढाई उभी करावी लागेल. सकरकार तुमच्या विरोधात आहे. तुमच्यावर सातत्याने अन्याय होतो आहे. म्हणुन पहिल्यांदा तुम्ही तुमचा शैक्षणिक दर्जा सुधारावा तरच तुम्हाला तुमचा इतिहास माहिती होईल आणि एकदा का इतिहास माहिती झाला की तुम्ही इतिहास घडविल्याशिवाय राहणार नाही. हे लक्षात घ्या. खोटा इतिहास निर्माण व्हावा हे सरकारचे धोरण आहे. ब्रिटिशांबरोबर सोबत जेवणारे आज म्हणाताहेत की, आम्ही इंग्रजांच्या विरूद्ध लढलो माझा त्यांना प्रश्न आहे की, इंग्रजांशी लढतांना तुमच्यातील किती शहिद झाले याचा खुलासा करावा. परंतु हा खुलासा ते कधीही करणार नाहीत.


आज ते मालक होवु पाहतो आहेत आणि इतरांना सेवक म्हणुन वागविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांचा हा प्रयत्न हाणुन पाडण्यासाठी आम्ही मानसाला मानसासारखे जीवन व्यतित करता यावे यासाठीची व्यवस्था उभी करण्यासाठीची लढाई उभारली आहे आणि ही लढाई आम्ही लढत आहोत. कुणाचे गुलाम, सेवक बनुन आम्ही जगणार नाही. निवडणुका आल्या की वाटप सुरू होतो. निवडणुकीच्या दोन दिवसांआधी वाटल्या जाणारा पैसा, दारू, मटन इत्यादी. निवडणुकीनंतर वाटप का केल्या जात नाही? केवळ मतदानापुरते अशा प्रकारचे आमिषे का दाखविण्यात येतात. याचा गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे. त्यांना माहिती आहे की, तुमच्या मताशिवाय त्यांच्या हाती काही काहीही लागणार नाही. म्हणुन आता आपल्याला ठरवायचे आहे की, आपण त्यांच्या हाती पोटली द्यायची की स्वतः मालक व्हायचे आहे. 


आम्ही सरकारला विचारतो आहोत की, खासगी शाळेच्या एवढ्या मोठमोठ्या इमारती ज्या उभ्या राहाताहेत त्यामध्ये गरीबांचा मुलगा कुठे असेल. कारण त्यांचे उत्पन्न तेवढे नाही. आणि जर उत्पन्न तेवढे नसेल तर त्याला शिक्षणापासुन वंचित राहावे लागणार आहे. म्हणुन माझी सिकलकरी समाजाला विनंती आहे की, ज्या पद्धतीने मुस्लिम समाजाने सामुहिकपणे त्यांच्या पाल्याच्या शिक्षणासाठी भुमिका घेतली. भले ही एक वेळ उपाशी राहावे लागले तरी चालेल परंतु मुलाच्या शिक्षणात कसलीही तडजोड करणार नाही अगदी त्या पद्धतीने सिकलदरी समाजाने येत्या जुन महिन्यापासुन जी मुलं शाळेत नाहीत त्यांची नावे पहिल्यांदा जि. प. असेल, न. प. असेल अथवा एखाद्या संस्थेची शाळा असेल त्यामध्ये दाखल करावीत. एकदा का तो शाळेत दाखल झाला की, त्याच्या दुधाची व्यवस्था, त्याच्या जेवनाची व्यवस्था शाळेमध्ये होईल आणि त्याला शाळेबद्दल रूची निर्माण होईल की, येथे शिक्षणाबरोबर जेवनाची सुद्धा काळजी घेतली जाते. सरकारला जर मराठी शाळा वाचवायच्या असतील, मराठी शाळेमध्ये मुलांची संख्या वाढवायची असेल तर त्याला बिस्किट, अंडी, त्याच्या जेवणाची व्यवस्था करावी. आमच्या वेळी ही व्यवस्था होती. आणि ही व्यवस्था पुन्हा निर्माण व्हावी असे आपणास वाटत असेल तर आपल्याला खुर्चीवर बसण्यापलिकडे दुसरा पर्याय आहे असे मला वाटत नाही. एकदा का आपण या सत्तेच्या खुर्चीवर बसलो की मग परिवर्तन हे आपोआप झाल्याशिवाय राहणार नाही.


मुळात ब्रिटिशांबरोबर लढाई केल्यामुळे सिकलकरी समाजाला ब्रिटिशांनी बंदी करून ठेवले होते. स्वातत्र्यानंतर त्यांना त्यांच्या पायावर उभे राहण्यासाठी सरकारने शासकीय तिजोरी खुली करायला हवी होती. परंतु सरकारची तशी भावना नाही. चोरी झाली, लुटमार झाली तर सिकलकरी लोकांना पकडल्या जाते त्यांना मारहाण केली जाते. त्यांच्यावर संशय घेतला जातो. त्यामुळे सिकलकरी समाज आजही स्वातंत्र्यामध्ये पारतंत्र्याचे जिवन जगत आहे. इंग्रजांचे आपण समजु शकतो ते परकीय होते. त्यांच्या विरोधात स्वकीयांनी कारवाई केल्यास त्यांना बंदी करीत होते. परंतु स्वातंत्र्यानंतर सत्तेत आलेल्या सरकारने सिकलकरी समाजावर अन्याय केला आहे. त्यामुळे ब्रिटीश आणि सरकार यांच्या काहीही फरक नाही. सिकलकरी समाजाबद्दल सरकार आजही म्हणते की, हे लोक ‘‘आदत से मजबुर है, इसलिए गुनहगार है।’’ आमचा त्यांना सवाल आहे की, जन्माने कुणीही गुन्हेगार नसतो, जर सिकलकरी समाजापर्यंत सरकारने आपल्या योजना, त्यांना सर्व सुविधा पोहोचविल्या तर त्याचे जिवनमान उंचावल्याशिवाय राहणार नाही. 


आज जे सत्तेमध्ये बसले आहेत त्यांचे म्हणणे आहे की, ब्रिटिशांनी या समुहाला गुन्हेगारी जमात म्हणुन गणले होते. हा समुह मजबुरीने नाही तर सवयीने गुन्हेगार बनला आहे. सिकलकरी समाज हा इंग्रजांविरूद्ध आवाज उचलत होता म्हणुन इंग्रजांनी त्यांना गुन्हेगार म्हणुन संबांधले होते. आणि आज केवळ तुमचा वापर व्हावा म्हणुन तुम्हाला गुन्हेगार ठरविण्याचे काम सरकार करीत आहे. एकुणच काय तर दोघांचीही ‘‘सोच’’ एकच आहे. आणि जो पर्यंत सरकारची ही ‘‘सोच’’ बदलणार नाही तोपर्यंत इथला गुन्हेगार ठरविला जाणारा समुह सुरक्षित राहणार नाही. समाधानाने ते आयुष्य जगु शकणार नाहीत. गुन्हेगारी कमी झाली असे आमचे म्हणणे मुळीचं नाही परंतु आज ज्यांच्याकडे बंदुक आहे तो गुन्हेगार मानल्या जात नाही परंतु चाकु बनविणारे गुन्हेगार मानले जातात. हत्यारे बनविणे ही या समुहाची कला आहे असं मी मानतो. सरकार बाहेरून हत्यारे मागविते परंतु यांच्या कलेला विकसित करून जर सरकारने शासकीय कारखाना उभारला आणि त्यामध्ये या लोकांना नोकरी दिली तर त्याचा फायदा सरकार आणि सकलरी समाज या दोघांना झाल्याशिवाय राहणार नाही.


मी 17 वर्ष लोकसभेमध्ये होतो. एकदा विस्तवावर चालणा-या व्यक्तीच्या संदर्भाने सभागृहात चर्चा झाली. अनेकांनी त्याला अंधश्रद्धा असे म्हटले. मी ही या चर्चेमध्ये सहभागी झालो आणि त्यांना म्हणालो की, ही अंधश्रद्धा नसुन ही एक कला आहे आणि या कलेच्या माध्यमातुन तो व्यक्ती स्वतःचे कुटुंब चालवितो. यामागे कुठलीही अंधश्रद्धा नाही. हा खेळ फक्त 10 ते 15 पाउल चालतील एवढाच तो चालवितो. त्याला कारण आहे ते म्हणजे निलगीरीचे तेल पायाला लावले तर आगीवर, विस्तवावर काही सेकंद पायाला चटका बसत नाही. अशा पद्धतीने कलेचा वापर करून त्याने त्याची उपजिवीका भागविली आहे. अशा अनेक प्रकारच्या कला आहेत. त्याला अंधश्रद्धेचे गोंडस नाव देवुन सरकारने त्यावर निर्बंध लादले आहेत.


शेवटी मी एवढेच म्हणेल की, ज्याच्याजवळ जी कला आहे ती विकसीत करण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला, त्याला त्याची कला विकसीत करण्यासाठी साधनं उपलब्ध करून दिली, त्याला प्रोत्साहन दिले तर तो त्याचे कुटुंब कुठेही स्थायिक करू शकतो. परंतु सरकार असे करीत नाही त्यामुळे आज सिकलकरी समाज राहायला जागा मागतो आहे. कारण एवढे वर्ष आम्ही जंगलात फिरलो आणि आता शहरात फिरतो आहोत. त्यामुळे वास्तव्यासाठी जागा पाहिजे. सरकारने जर या कला आधीच विकसित केल्या असत्या तर अशा प्रकारच्या मागण्या आपल्याला करण्याची गरज निर्माण झाली नसती. आणि आपल्या स्वतःच्या हिमतीवर आपण आपले वास्तव्य निर्माण केले असते. आणि नवी व्यवस्था निर्माण करू शकलो असतो.


मी आपल्या सर्वांना एकच विनंती करतो की, 70 वर्षामध्ये सरकारने आपल्याला कधी हात दिला नाही. वर येण्यासाठी कधीही मदत केली नाही. म्हणुन आता आपल्याला आपली व्यवस्था निर्माण करावी लागेल. जो पर्यंत आपली व्यवस्था निर्माण करणार नाही तोपर्यंत आपल्याला कोणीही मदत करणार नाही. सरकार आपले असेल तर तिजोरी आपली असणार आहे. आणि तिजोरी आपल्या ताब्यात आली म्हणजे आपल्या विकासासाठी ती कशी खर्च करायची याची नोंद करणे आपल्या हाती असते. आणि म्हणुन जो इथला वंचित आहे, गरीब आहे, अल्पसंख्यांक, ज्याला सरकारने नाकारले आहे त्याला एकत्र होणे गरजेचे आहे. आणि एकत्रीत होवुन या देशाची व्यवस्था आपल्या हाती घ्यावी लागणार आहे. ज्या पद्धतीने आपल्याला वाटते त्या पद्धतीने आपल्याला आपला विकास करून घ्यावयाचा आहे. ही आपली भुमिका असावी.


मी गेल्या अनेक वर्षापासुन पाहतो आहे की, सिकलकरी समाज आपल्या न्याय मागण्यांसाठी निवेदने देतो परंतु सरकार त्यावर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करीत नाही. म्हणुन आता सिकलकरी समाजाने एक गोष्ट निश्चित करावी की आता आम्ही मागणारे होणार नाही तर सत्ता काबीज करून आमचा रस्ता आम्हीच बनविणार, हा दृष्टीकोन आपण ठेवला पाहिजे. जर सत्ता आम्ही आमच्या हाती घेवु शकतो तर का आम्ही दुस-यांसमोर जावुन झोळी पसरवितो? सिकलकरी समाज हा लढाकु समाज आहे. राजा महाराजांसोबत हा समाज लढला आहे. त्यांच्या हुकुमशाहीविरूद्ध तो लढला आहे. ब्रिटिशांसोबत लढला आहे. त्याने हार मानली नाही म्हणुन त्यांना ताब्यात करण्यासाठी गुन्हेगार म्हणुन त्यांच्यावर शिक्का मारण्यात आला होता. आणि त्यांना कैद करण्यात आले. त्यांची गावे उठविण्यात आली. हा इतिहास आपल्या सर्वांचा आहे. 


आपल्याला नवा इतिहास निर्माण करायचा आहे. इतिहास निर्माण करायचा असेल तर पहिल्यांदा आपण आपल्या पाल्याला शाळेत पाठवा. आणि तिथुनच त्याच्या शिक्षणाची व्यवस्था सुरूवात होईल. आणि आपल्या कलेला विकसित करण्यासाठी जे तुम्ही निर्माण करीत आहात त्याला बाजारपेठ नाही. ते सरकारने विकत घ्यावे. यासाठी एक लढा उभा करणे गरजेचे आहे. आणि हा लढा यशस्वी झाला तर देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल आणि सिकलकरी समाजाला रोजगार मिळेल. म्हणुन त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा संघटीत व्हावे लागणार आहे, आपले संघटन मजबुत करावे लागणार आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या