ज्येष्ठ साहित्यिक तथा विचारवंत प्रा. सतेश्वर मोरे यांचे काल दि. 2 फेबु्रवारी 2021 रोजी दुःखद निधन झाले. मराठी साहित्य वार्ताच्या संपुर्ण उपक्रमामध्ये त्यांनी सातत्याने मार्गदर्शन केले आहे. मराठी साहित्य वार्ताच्या आगामी होणा-या साहित्य संमेलनाच्या उद्घटक म्हणुन सरांनी येण्याचे आश्वासन दिले होते. परंतु काळाने घात केला. त्यांच्या जाण्याने आंबेडकरी साहित्य आणि सांस्कृतिक चळवळीची मोठी हाणी झाली आहे. त्यांच्या आठवणींना उजाळा देणारा ज्येष्ठ आंबेडकरवादी गझलकार प्रमोद वाळके ‘युगंधर’ यांचा लेख...
नागपूरची दि. २ मार्चची संध्याकाळ तशी फारशी चांगली नव्हतीच. दिवसभरच मी उदास बसलो होतो. कधी मोबाइलवरील व्हाट्सअपवर येणारे माहितीपर लेख बघत होतो तर कधी शेतकरी आंदोलनांच्या बातम्या ऐकत होतो. कधी टीव्हीवरील बातम्या तर कधी एखादी चांगली धारावाहिक आहे काय याचा शोध घेत होतो. तरीही मन लागत नव्हते. होता होता संध्याकाळ झाली आणि मोबाईलची घंटी कडाडली. मोबाईलच्या घंटीचा आवाजही कर्णकर्कश वाटत होता. तेवढ्यात 'मराठी साहित्य वार्ता वेब पोर्टलचे' मुख्य संपादक अमरदीप वानखडे यांचा फोन आला. नाव पाहून जरासा हरखलो. कारण हा मुलगा बोलताना नेहमी हसत बोलतो. त्यांचे असे हसत बोलणे मला असीम आनंदाचा खजीना देत असते. त्यामुळे घाईघाईतच मी फोन अटेंड केला. अमरदीप बोलले, सर माहीत झालं का? त्यांच्या बोलण्याचा अर्थ समजला नव्हता. मी प्रश्न केला आणि त्यांचे बोलणे ऐकून मी गर्भगळीत झालो. ते बोलले सतेश्वर मोरे सरांविषयी फेसबुकवर बातम्या येत आहेत सर...
...आणि सतेश्वरची भेट झाल्यापासूनच्या सर्वच आठवणी माझ्या मनात जमा होऊ लागल्यात. अमरदीप म्हणाले की, सर आठवड्यापूर्वीच त्यांच्याशी मी बोललो. मराठी साहित्य वार्तातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून येण्याचे त्यांनी मान्यही केले होते. आणि आज फेसबुकवर त्यांच्या निधनाची बातमी... अमरदीपच्या शब्दाशब्दातून त्यांच्या मनाची हतबलता जाणवत होती.
१९९१ च्या आसपास कल्याण येथे झालेल्या अखिल भारतीय दलित साहित्य संमेलनात सतेश्वरची 'मेजर' ही कविता मी ऐकली होती. त्यावेळेस तो बावीस-तेवीस वर्षाचा तरणाबांड कवी होता. त्याचा तारुण्यातला तो कमांडरी आवाज मेजर कविता वाचताना मला खूप भावला होता. मंचावर जावून त्याला मिठीही माराविशी वाटली होती. त्यावेळेस गर्जत होता...
"आपल्या विभागलेल्या सैन्य तुकड्यांना
जोडण्यात वेळ घालवू नका मेजर !
शत्रूचे सैन्य सीमापार करीत आहे
ते पहा ! त्यांच्या सनातन तोफांचे आवाजही
आपल्याच दिशेने येत आहेत मेजर ! "
तो मेजर कवी साहित्य मंचावरून खाली उतरला आणि मी त्याची भेट घेतली. ती माझी पहिली ओळख होती. त्यानंतर त्याच्याशी अनेकदा गाठीभेटी झाल्यात. परंतु कविता सादरीकरणातली ती रग, वाढलेल्या दाढीतील त्याची ती दहाड, ती गर्जना आजही आगाज करीत आहे. प्रत्येकच माणसाला सावध करीत आहे. 'त्यांच्या सनातन तोफांचे आवाज' आजही हल्ला करीतच आहेत. आणि तुकड्या अजूनही विभागलेल्याच आहेत. ह्या तुकड्या एकसंध होत नाहीत. तरीही 'आमच्या छातीच्या बरगड्या आणि पाठीचा कणा अजूनही ताठ आहे मेजर !'
हा आहे आंबेडकरवादी कवितेचा मेजर नव्हे साहित्याचा मेजर. या मेजरचे असे ५८ व्या वर्षी जाणे अप्रामाणिक आहे. नियमबाह्य आहे. तरीही सतेश्वर गेला. त्याच्या अध्यापनातून सेवामुक्त होण्याआधीच तो साहित्य सेवेतून निवृत्त झाला. 'बंदुकीचा दस्ता जमिनीला टेकवून विचार करण्यात अर्थ नाही, आपण हल्ला केलाच पाहिजे' असे म्हणणारा चळवळीतील मेजर मृत्यूशी लढा देऊ शकला नाही. संग्रामशील झाला नाही. मृत्यूला थांबवू शकला नाही. आणि मृत्यूने लादलेल्या गुलामीच्या जळत्या घरात निघून गेला. कायमचेच राहण्यासाठी...
तो दिवस, त्या दिवसाची ती संध्याकाळ, बातमी समजल्यानंतर माझ्यासाठी कशी गेली असेल हे सांगणे शब्दातीत आहे. मृत्यूच्या जळत्या घराशी निष्ठेने लढा देणाऱ्या माणसांच्या कहाण्या मेजर सतेश्वर मोरेंनी आम्हा साहित्याच्या सैनिकांना ऐकवल्या होत्या. आणि त्यांच्या ऐकवण्यातून आम्ही आमच्या लेखणीला धार दिली होती. कालच्या संध्याकाळपासून आता ते शब्द, त्या कहाण्या आम्हाला ऐकता येणार नाहीत. आणि आमच्या साहित्याच्या झोपडीतला बारुदखानाही उडवू शकणार नाही असे वाटावे इतकी हतबलता या सायंकाळच्या एका बातमीने आमच्या मनाला दिली आहे.
मेजर सतेश्वर ! तरीही आम्ही तुला शब्द देतो. आम्ही लढणार आहोत. तुझ्या शब्दानिशी. तुझ्याच कमांडरी शब्दांचा बारुदखाना घेऊन. पर्यायाने किंवा अपरिहार्यतेने मृत्यूला थांबवून. त्यालाही आमच्यासारखे राबायला सांगून आम्ही लिहीत राहू. लढत राहू. तुला गुलाम करणाऱ्या मृत्युलाही आम्ही आमचे सैनिक करून घेऊ. आमच्या गोदामात तुझेच शब्द बारुदासारखे राहतील. तुझेच शब्द क्रांती होतील आणि तू म्हटल्याप्रमाणे विजयाचा नवा इतिहासही घडवतील. कारण तुझा शब्द सत्य शब्द आहे. त्याची वाढही होत नाही आणि तो घटतही नाही. तुझा शब्द खोटा असता तर...! खोट्या शब्दाला परीक्षा द्यावी लागत नाही मेजर ! तो समजावून सांगण्याची गरज नसते. हा शब्द कधी संपतो तर कधी त्याची वाढ होत असते; हे तुलाही माहीत आहे आणि मलाही मेजर !
ज्यांची पुस्तके प्रकाशित होत आहेत त्यांना मरण नसते असे सगळेच म्हणतात. परंतु ज्यांचे एकही पुस्तक नाही ते जिवंत असत नाहीत हा प्रश्नच मला चुकीचा वाटतो. त्यांच्या रचना, त्यांनी वेळोवेळी केलेले मार्गदर्शन लोकांच्या मनात कोरलेलेच असते. ते ऐकणाऱ्यांच्या मनांनी अधोरेखित केले असते. कधी अध्यक्षीय भाषणातून तर कधी उद्घाटक म्हणून दिलेली भाषणे ऐकणाऱ्यांनी हृदयात सांभाळून ठेवली आहेत. आंबेडकरवादी साहित्य संमेलने, सामाजिक, सांस्कृतिक चळवळींचे केलेले तत्त्वनिष्ठ विवेचन, विचारवंत, कवी, व्याख्याता म्हणून प्रत्येक ठिकाणी असलेला मेजरचा सहभाग हा प्रकाशित झालेल्या पुस्तकांपेक्षा कितीतरी मोठा आहे. याद्वारेच प्रत्येकाच्या मनात सतेश्वरच्या विचारांचे संग्रामपिटक ग्रंथरूपात असणार आहे; यात दुमत नाही. यासंदर्भात लागू पडणारा कृष्ण बिहारी 'नूर' यांचा शेर देतो. ते म्हणतात...
"अपनी रचनाओं में वो जिंदा है
'नूर' संसार से गया ही नही"
चळवळ असो, साहित्य संमेलन असो किंवा युवा परिषद असो, दीपस्तंभाप्रमाणे उभे राहणारे मेजर सतेश्वर, मी तुम्हाला शेवटचा जयभीम करतो आणि माझा लेख संपवितो...
प्रमोद वाळके 'युगंधर'
मोबाईल क्रमांक : ८३२९३७४९९६.
0 टिप्पण्या