या संपूर्ण विश्वातील जी मानव जात आहे, त्या अखिल मानव जातीच्या जगण्यासाठी जगातील संपूर्ण मानवांचे पहिले गुरु तथागत भगवान बुद्ध. यांनी त्यांच्या जीवन जगण्याचा जो मार्ग शोधून काढला त्याला बौद्ध जीवनमार्ग असे म्हणतात. मग तो माणूस कोणत्याही धर्माचा असो, कोणत्याही पंथाचा असो, कोणत्याही संप्रदायाचा असो, कोणतीही बोलीभाषा बोलणारा असो आणि कोणत्याही वर्णाचा असो !
अशा सर्व मानव प्राण्यांसाठी तथागतांनी जो जीवनमार्ग शोधून काढला तो अनित्य, दुःख आणि अनात्म या तीन गोष्टीवरच अधिष्ठित आहे. आणि त्याचेच दुसरे नाव म्हणजे बुद्ध धम्म होय. त्यापैकी अनित्य हे पहिले अधिष्ठान आहे. या सिद्धांताचे तीन पैलू आहेत.
१) अनेक तत्वांनी बनलेल्या वस्तु अनित्य आहेत.
२) सर्व प्राणी अनित्य आहेत.
३) प्रतीत्य समुत्पन्न वस्तुचे तत्व (क्षयधर्म) अनित्य आहे.
यातील पहिल्याचे स्पष्टीकरण असे की, पृथ्वी, आप, तेज आणि हवा हे चार घटक मानसिक तत्वे यांचे संघटन म्हणजे सजीव प्राण्याचे शरीर होय. या घटकांचे पृथ:करण झाले की, सजीव प्राणी हा संपुष्टात येतो. दुसरे म्हणजे सजीव प्राणी केव्हा ना केव्हा तरी मरणार परंतू तो जीवंत असताना सारखा बदलत असतो. बालपण, तरुणपण आणि म्हातारपण या तीनही अवस्थेतून त्याला जावेच लागते. तिसरे म्हणजे की, सर्व वस्तु हया हेतू आणि प्रत्यय यामुळे उत्पन्न होतात. त्याचे असे अगदी स्वतंत्र अस्तित्व नसते. हेतू प्रत्ययाचा उच्छेद झाला की, वस्तुचे अस्तित्व उरत नाही. अशा प्रकारे मनुष्यप्राणी हा परिवर्तनशील आहे संवर्धनशील आहे.
आपल्या जीवनाच्या कोणत्याही क्षणी तो तोच असू शकत नाही. तो सतत बदलत असतो. हा अनित्यतेचा नियम जसा जीवंत प्राणिमात्रांना लागू आहे. तसाच तो निर्जिव वस्तुनांही लागू आहे. बौद्ध शुन्यवादाचा अर्थ एवढाच की, हया ऐहिक जगात प्रतिक्षणी परिवर्तन चालू आहे. भगवान बुद्धांनी स्पष्टपणे सांगितले की, सर्व वस्तु अनित्य आहेत. यातील दुसरे अधिष्ठान दु:ख आहे हे माणसाने प्रथमत: जाणले पाहिजे. ज्याला दु:ख काय आहे हे ठाऊक नाही, त्याची बुद्धी धर्माकडे वळणे कठीण, या प्रपंचात दुःख आहे, असे वाटल्यावरुनच सर्व पंथाच्या लोकांना परमार्थाविषयी प्रयत्न करण्याची बुद्धी होते. दु:ख कोणते? जन्म दुःखकारक आहे म्हणजे मुल जन्मताच दु:ख बरोबर घेऊन येते.
म्हातारपणही दुःखकारक मरतेवेळी प्राण्याला दुःख होते. आयुष्यामध्ये शोकाचे अनेक प्रसंग येतात, ते ही दुःखकारक, अप्रियांशी संबंध येणे ते ही दु:ख कारक. प्रियांचा वियोग झाला तरी दु:ख होते. एखादया वस्तुची इच्छा करुन ती न मिळाली म्हणजे त्यापासूनही दु:ख होते. संक्षेपाने सांगायचे झाल्यास पाच उपादान स्कंध हे दुःखकारक आहेत. जगातील कोणताही प्राणी दु:खाच्या बंधनातून मुक्त नाही. जगाकडे वास्तवतेचा दृष्टीकोनातून पाहणारा कोणीही सुज्ञ माणूस हे सत्य नाकारु शकत नाही.यातील तिसरे अधिष्ठान अनात्म आहे. भगवान बुद्धांनी आत्म्यावर आधारलेला धर्म हा केवळ कल्पनामिश्रीत आहे असे म्हटले म्हणून त्यांच्या आत्म्यासंबंधी सिद्धाताला अनात्मवाद असे म्हणतात.
बुद्ध म्हणतात, "आत्मा कोणीही पाहिलेला नाही किंवा आत्म्याशी संभाषण केलेले नाही. आत्मा अज्ञात आणि अदृष्य आहे, असे जे समजतात ती गोष्ट आत्मा नसून मन आहे आणि मन हे आत्म्यापासून भिन्न आहे." तसेच बुद्धांनी इश्वाराचे अस्तित्व नाकारताना जी विचारसरणी मांडली ती आत्म्यावरील सिद्धान्ताविरुद्ध मांडली. आत्म्याच्या अस्तित्वाची चर्चा ही देवांच्या अस्तित्वाच्या चचेंइतकीच निरुपयोगी आहे. देवाच्या अस्तित्वावरील विश्वास हा सम्मादिठ्ठीला (सम्यक दृष्टीला) जितका बाधक आहे तितकाच आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वास बाधक आहे. आत्म्याच्या या सर्व सामान्य विचारसरणीपेक्षा भगवान बुद्धांनी सत्यावर आधारित विचारश्रृंखला मांडली.
या संदर्भात तथागतांनी नामरुप सिद्धांत मांडला. हा सिद्धांत मानव प्राण्यांच्या अतिशय सुक्षम, काटेकोर विश्लेषणाचा परिणाम आहे. ज्यावेळी आत्मा आणि पुनर्जन्म यासंबंधी प्रश्न उपस्थित केला गेला. त्यावेळी बुद्धांनी पुनर्जन्म (पुनर्भव) प्रवचिला आहे. परंतू आत्म्याचे संसरण (एका देहातून दुस-या देहात प्रवेश) प्रवचिले नाही. आत्म्याशिवाय पुनर्जन्म (पुनर्भव) शक्य आहे. याबाबतचे अधिक स्पष्टीकरण भन्ते नागसेनांनी राजा मिलिंद यांस 'मिलिंद प्रश्न' या ग्रंथात उदाहरणासह दिले. एका दिव्याने दुसरा दिवा पेटविणे किंवा शिक्षकापासून विद्यार्थ्याच्या मुखी कविता जाणे, या क्रियेस संसरणाविना पुनर्जन्म झालेला आहे. याचा स्पष्ट अर्थ असा की, आत्मा नसला तरी पुनर्जन्म (पुनर्भव) होऊ शकतो. यामुळेच बुद्धाच्या या सिद्धांताला अनात्मवाद असे म्हणतात आणि हा सिद्धांत समजून घेणे म्हणजे मानवी जीवनमार्ग होय.
भन्ते अश्वजित
सदधम्म बुद्धविहार,
आरती नगर, औरंगाबाद
मो.नं. ९६७३२९२२९७
0 टिप्पण्या