ज्याची परिपूर्ण साधना केली असता तृष्णेचा नाश करता येतो व दुःख- निरोध म्हणजे निर्वाण पद प्राप्त करता येते. तसेच ज्याच्या सार्वत्रिक पालनाने बहुजन हिताय बहुजन सुखाय 'धम्म- राज्य' स्थापित एक होऊ शकेल असा तो बुद्धप्रणित धम्ममार्ग आठ अंगांनी युक्त असल्यामुळे त्याला 'अष्टांगिक मार्ग' म्हटल्या गेले आहे. त्या अष्टांगिक मार्गातील सम्यक समाधी हे शेवटचे अंग आहे. सम्यक-समाधी म्हणजे कुशल चित्ताची एकाग्रता करणे होय.
अष्टांगिक-मार्गातील सर्व अंगाचे अचूक पालन करणे आणि त्यात समतोल ऐक्य साधणे यांचा एकत्र पडताळा पाहून खात्री करून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी सम्यक-समाधी उपयुक्त आहे. शांतवेळी एकांतात बसून व मनाच्या सर्व प्रवृत्ती रोखून त्याचे सूक्ष्म केंद्रीकरण करावे. विस्तृत सूर्यकिरणे बाह्यगोल भिंगावर एकत्रित केली तर त्यांची बिंदूमात्र पडणारी प्रतिमा इतकी प्रखर असते की त्यामुळे कागद जळू शकतो. मनाचेही तसेच आहे. अनेकविध विषयातून काढून ते एकाच विषयाचे ठायी केंद्रित केल्यास, ते एकाग्र केल्यास त्याची शक्ती अनंत पटीने वाढते. ते अतिशय प्रसन्न, शांत, प्रकाशमान आणि शुद्ध होते. त्यामुळे कितीही कठीण असलेल्या विषयाचा सहज उलगडा होऊ शकतो. कठीण परिस्थीतीतही मनाचा समतोलपणा ढळत नाही. मनाच्या या स्थितीलाच समाधी म्हणतात. हठयोगी साधना करणारे योगी समाधी लावून अतिवेळ बसतात. ते श्वासोच्छ्वास दाबून ठेवणे, किंवा अशीच अघोरी साधना करतात. तो समाधीचा विकृत प्रकार समजावा. त्यांची ती समाधी निरर्थक असू शकते. केवळ ध्यान-धारणेमुळे होणारा आनंद उपभोगण्यासाठी समाधी साधणे निरर्थकच म्हणावे लागले. कित्येक तर केवळ जागृत निद्रेलाच मोक्ष किंवा मुक्ती मानतात, हेही योग्य नव्हे.
बुद्धप्रणित 'सम्यक-समाधी' वरील समाधीहून भिन्न आहे. ती निश्चित उद्देशाने साधावी लागते. दुःख, दुःखाचे मूळ-कारण, दुःखातून मुक्तता आणि त्यासाठी आचरावयाचा परम-अष्टांगिक-मार्ग या चार परमसत्यांच्या साक्षात्कारासाठी तसेच अष्टांगिक-मार्गांचे पालन करण्याची आपल्या मनाला नित्य सवय होण्यासाठी 'सम्यक-समाधी' एकान चिंतनाने गुंतागुंतीच्या अनेक समस्यांचा उलगडा होतो. आणि जीवनातील अनेक गूढ व गहन प्रश्न सुटल्यामुळे आपल्या मनाला अद्वितीय आनंद लाभतो. सम्यक-समाधीने अष्टांगिक मार्गातील पहिल्या सात नियमांचे आपण कितपत पालन करतो? त्यापैकी काही नियम पाळण्याबाबत उणीव आहे काय? एकूण सर्व नियमांचा समतोल राखल्या जातो की नाही? या नियम-पालन मुळे आपला व समाजाचा लाभ होतो की नाही? अशा सर्व प्रश्नांचे एकाग्र चित्त-साधनेने चितन केले पाहिजे. कायिक-वाचिक शील-शुद्धी, अष्टांगिक-मार्ग, दहा पारामिता, अर्हतत्व, संबोधि-ज्ञान अशा ह्या शील-समाधि-प्रज्ञायुक्त सद्धम्माचे केवळ ग्रंथ वाचून किंवा भाषण-प्रवचने ऐकून आपणाला जे काही ज्ञान होते. ते केवळ शाब्दिक असते. ते मनाच्या वरवरच्या पातळीवर असते. ख-या अर्थाने आपणाला त्याचा साक्षात्कार झालेला नसतो. भ. बुद्धाचा सम्पूर्ण सद्धम्म मनःचक्षू समोर उभा राहिल्याशिवाय, आपणाला त्याचा साक्षात्कार झाल्याशिवाय तो मनाच्या खोल तळापर्यंत पोहचणार नाही. सम्यक-समाधीनेच संबोधीचा लाभ होऊन निर्वाणाचा साक्षात्कार होतो, आणि आपले व्यक्तिमत्त्व तदाकार होऊन मानवी जीवनातील परमोच्च स्थीती असे ते अहत्त्व प्राप्त होते. त्रिपिटक ग्रंथातील आनापानसति-सुत्त, कायगतासति-सुत, महाराहुलोवाद-सुत्त, इत्यादी सुत्तात समाधीच्या अभ्यासाची माहिती आहे.
बुद्धघोषाचार्यांचा 'विशु द्धि-मार्ग' हा तर या विषयावरील अत्यंत उपयुक्त व विशाल ग्रंथ आहे. त्याप्रमाणे समाधी-भावना करु इच्छिणाराने प्रथम पंचशीलादी शीलांनी शुद्ध राहणे आवश्यक आहे. त्यानंतर समाधीचा प्राथमिक अभ्यास ज्या एखाद्या विषय-वस्तूच्या आधारे करावा लागतो. त्यातील पृथ्वी, प्रकाश, अशासारखा सर्वव्यापी विषय, किंवा प्राणिमात्रावर करुणा, मैत्री, करण्याचा विषय किंवा आपल्याच श्वास-प्रश्वासावर मन एकाग्र करण्याचा विषय (आनापान-स्मृती) यापैकी कोणतीही एक विषय-वस्तू घेऊन त्यावर एकांत स्थळी व योग्य वेळी मनाची एकाग्रता साधण्याचा प्रयत्न करावा लागतो, (गृहस्थ जनांसाठी आनापान-स्मृतीच्या कर्मस्थानावर समाधीचा अभ्यास करणे सोयीचे व हितकर आहे). या अभ्यासात काम भोगाबाबतचे विचार, क्रोध, आळस, अस्वस्थता व संशय असे पाच अडथळे ( नीवरणे ) येतात. त्यांना दूर सारून अभ्यासाला भिडावे लागते. यात यश आले की मनाची एकाग्रता साधली जाते. त्यामुळे वितर्क, विचार, प्रिती, सुख व अंती एकाग्रता अशी पात्र ध्यानांगे उत्पन्न होऊन प्रथम-ध्यानाची समाधी प्राप्त होते. यानंतर प्रगती करीत करीत गेले की चतुर्थ व पंचम-ध्यानावर आरूढ असलेली समाधी साधल्या जाते. साधकाचे मन अत्यंत शांत, परिशुद्ध व कुशाग्र बनते.
अशा समाधीला शमय-समाधी असे म्हणतात. पण शमथ-समाधीतच समाधान मानू नये. तेथेच थांबून जाऊ नये. तर मनाच्या त्या एकाग्र अवस्थेचा उपयोग करून साधकाने प्रज्ञा-भावनेचा अभ्यास पुढे चाल ठेवावा. प्रज्ञा-भावनेलाच विपश्यना-भावना असेही म्हणतात. या विपश्यना-भावनेने रूप, आदी पंच-स्कंध अनित्य-अनात्म-दुःख या त्रिलक्षणांनी युक्त आहेत हे पूर्णपणे कळून येते. तसेच चार महाभूते, चार परम-सत्ये व तदंतर्गत अष्टांगिक-मार्ग, प्रतित्य-समुत्पाद, इत्यादींचे सूक्ष्म निरिक्षण केल्या जाऊन त्यांचे रहस्य जाणून घेतल्या जाते. त्यानंतर सर्व प्रकारच्या शंका-कुशंका दूर करणारी 'कांक्षावितरण विशुद्धी', इत्यादी सात विशुद्धी प्राप्त होतात. आणि उदय-व्यय-ज्ञान, भंग-ज्ञान, इत्यादी नव ज्ञाने प्राप्त करीत साधकाचे चित्त क्रमाक्रमाने स्रोतापत्ती, सकुदागामी, अनागामी व अर्हत अशा चार मार्गाच्या प्रवाहात उतरून व त्यांची फळे प्राप्त करून' अंतीमतः परमध्येय अशा निर्वाणाचा साक्षात्कार करणारे होते. चार मार्गाच्या प्रवाहात सक्काय- दिठ्ठी इत्यादी दहाही संयोजने (बंधने) गळून पडतात, आणि साधक जीवन-मुक्त होतो. तो मानवी जीवनाचा परम आदर्श अशा त्या प्रज्ञावंत, अर्हत, सम्बोधी अवस्थेला प्राप्त होतो. त्याला 'याचि देही याचि डोळा' निर्वाणपद पहावयास मिळते.
भन्ते अश्वजित
सदधम्म बुद्धविहार, आरतीनगर,
औरंगाबाद.
मो.नं. ९६७३२९२२९७
0 टिप्पण्या