प्रस्तुत 'धम्मचक्र प्रवर्तन सुत्ताला' महान पार्श्वकथा आहे. उरुवेला (सध्या बिहारमधील बौद्ध-गया) जवळील निरंजना नदीच्या काठी बोधिवृक्षाखाली वैशाख पौर्णिमेच्या दिवशी सिद्धार्थ गौतमाला बुद्धत्व प्राप्त झाले. तत्पूर्वी त्यांनी गृहत्याग केल्यापासून सहा वर्षेपर्यंत आलार कालाम व उद्दक रामपुत्त या गुरूकडे अभ्यास केला. पुढे पांच साथीदारांना घेऊन त्यांनी निरंजना नदीकाठी उपवासादी कठीण व्रतांनी घोर तपश्चर्या सुरू केली होती. परंतु उपास-तापासा सारख्या देहदंडनाच्या मार्गाने ज्ञान प्राप्त होणार नाही, अशी खात्री होताच तपश्चर्येचा मार्ग सोडण्याचा व नियमीत आहार घेण्याचा विचार त्यांच्या मनात आला.
त्याच दिवशी त्या परिसरातील एक धनिक कन्या सुजातेने सुवर्णपात्रात आणलेली खीर त्यांनी खाल्ली. गौतमाने तपश्चर्येचा मार्ग सोडून दिला व तो आता अन्न भक्षण करतो हे पाहून त्यांचे साथीदार असलेल्या त्या पंचवर्गीय श्रमणांना फार राग आला. ते गौतमास सोडून गेले. त्यानंतर गौतमाने बोधिवृक्षाखाली आसन मांडून ध्यान-धारणा केली. “माझे मांस, रक्त, मेन्दू, हाडे, हे सर्व नष्ट झाले तरी चालेल, पण मी ज्ञान-प्राप्तीशिवाय हे आसन सोडणार नाही." असा त्यांनी दृढ संकल्प केला. त्यावेळी माराने (म्हणजेच काम विकार, कुशंका, इत्यादींनी) त्यांच्या समाधीचा भंग करण्याची पराकाष्ठा केली. पण त्यांनी मारावर विजय मिळविला. अशा रीतीने चार आठवडे ध्यान केल्यावर वैशाख पौणिमेच्या रात्री त्यांना संबोधी-ज्ञान प्राप्त झाले.
बोधिसत्त्वाचे ते आता सम्यक-संबुद्ध झाले, भगवान झाले. अज्ञानांधकार नष्ट झाला. सम्बोधाचा सूर्य उगवला. जगाला तारण्याचा मार्ग मिळाला. दुःख दिसून आले व दुःखाचा नाश करण्याचा मार्गही लाभला. रोहिणी नदीच्या पाण्यासाठी युद्धे करणाऱ्या शाक्य व कोलिय यांच्यातच नव्हे तर साऱ्या विश्वात शांती निर्माण करण्याचा उपाय सापडला. ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर बुद्धाने बोधि वृक्ष, अजपाल वृक्ष, मुचलिंद वृक्ष व राजायतन वृक्ष यांचेखाली प्रत्येकी एक एक सप्ताह विमुक्ती-सुखाचा अनुभव घेतला. ते असे राजायतन वृक्षाखाली बसले असतांना तपस्सू व भल्लीक नावाचे दोन बंजारा व्यापारी उत्कल (ओरिसा) देशातून त्या ठिकाणी आले. त्यांनी बुद्धास दही व मध मिश्रित लाडू अर्पण केले. आणि हात जोडून आपणास उपासक बनण्याची विनंती केली. भगवंताने त्यांना तेथेच दीक्षा दिली. जगातील हेच दोन उपासक फक्त 'बुद्ध' या एका शरणाला अनुसरून उपासक बनले. सम्बोधी-ज्ञान प्राप्त झाल्यावर महाकष्टाने साध्य केलेले ते अमुल्य तत्त्वज्ञान जगाला शिकवावे की नाही, अशी शंका बुद्धाच्या मनात आली.
अज्ञान, अहंकार, द्वेष अशा दुर्गुणांनी भरलेल्या लोकांना हे तत्त्वज्ञान समजणे कठीण जाईल. त्यापेक्षा आपण कुठे तरी दूर एकान्तात विमुक्ती-सुखाचा अनुभव घेण्यात काळ घालवावा, असे त्यांना वाटले. परंतु ब्रह्म सहपतीने येऊन मानवांना हे नवीन तत्त्वज्ञान शिकविण्याची भगवंतास विनंती केली. आणि जगाबद्दल अपार करुणा असल्यामुळे भगवंतांनी ब्रह्म सहपतीची ती विनंती मान्य केली. आपले नविन तत्वज्ञान जगाला शिकविण्याचा निर्धार केल्यानंतर आता हे ज्ञान सर्वप्रथम कोणाला शिकवावे, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. आलार-कालाम व उद्दक रामपुत्त यांचेजवळ त्यांनी तपश्चर्या मार्गाचा अभ्यास केला होता. प्रथम त्यांनाच हे ज्ञान शिकवावे असा त्यांचा विचार झाला. परंतु आपले हे दोन्ही गुरु मरण पावल्याचे समजताच भ. बुद्ध म्हणाले- “खरेच, रामपुत्त फार श्रेष्ठ होते. माझे तत्वज्ञान ऐकले असते तर त्यांनी ते अवश्य मानले असते. त्यानंतर बुद्धास काही काळ आपले साथीदार राहिलेल्या पंचवर्गीय भिक्खुंची आठवण झाली. आणि मग त्यांचा शोध घेण्यासाठी त्यांनी वाराणशी जवळील ऋषीपतन (सध्याचें सारनाथ) येथे जाण्याच्या उद्देशाने पायी प्रवास सुरू केला. प्रवासात त्यांना उपक नावाचा एक श्रमण (संन्यासी) भेटला. आपणास सम्बोधी-ज्ञान प्राप्त झाले असे भगवंताने त्याला सांगितले, पण उपकाला ते खरे वाटले नाही."असेल बोवा कदाचित!" असे मान हलवत म्हणून तो दुस-या दिशेने निघून गेला.
भगवंतही क्रमाक्रमाने सारनाथकडे निघाले. भ. बुद्धाच्या उरुवेला ते ऋषीपतन (सारनाथ) पर्यंतच्या प्रवासाचे वर्णन चीन देशाचा बौद्ध प्रवासी फाहियान याने इ. स. ४१४ साली लिहून ठेवले आहे. तो म्हणतो- "भ. बुद्ध गंगा नदीच्या काठाकाठाने पश्चिमेकडे १२ योजने प्रवास करीत काशी देशांतील वाराणशीला पोहचले. तेथून उत्तरेस ५ मैलावर असलेल्या हरीणांच्या बागेत (मिगदाय ) ते आले. या बगीच्यात पूर्वी एक ऋषी राहत होता. त्याच्या आश्रयाने त्या वनातील हरिण तेथे येत व विश्रांती करीत. पुढे एकदा आकाशवाणी झाली की "राजा शुद्धोदनाचा पुत्र ज्ञानप्राप्तीसाठी घर सोडून गेला. आणि आजपासून ७ दिवसांती तो बुद्ध होणार आहे." ही आकाशवाणी ऐकताच तो ऋषी गर्भगळीत होऊन तेथे मरण पावला. यामुळेच पुढे वाराणशीजवळील या हरिणांच्या बागेला ऋषीपतन (ऋषी पतन पावला) असे नांव पडले.
चीनचा दुसरा प्रवासी हुएनत्संग हा ६५० साली सारनाथला आला होता, तेव्हा तेथे १५००० भिक्खू राहत होते, असे त्याने लिहून ठेवले. अश्याप्रकारे प्रवास करीत करीत भ. बुद्ध सारनाथ येथे आले असतांना पंचवर्गीय भिक्खुंच्या भेटीच्या वेळी जो प्रसंग घडला तो मोठा हृदयंगम आहे भगवंताला दुरून येतांना पाहून पंचवर्गीय भिक्खूनी असे ठरविले की, “या गौतमाने तपश्चर्येचा मार्ग सोडून दिला, हा अन्न खाऊ लागला व विलासी बनला; म्हणून आपण त्याचे स्वागत करावयाचे नाही. तो येताच उठून उभे रहायचे नाही. आणि त्याच्याशी बोलायचेसुद्धा नाही. परंतु बुद्धत्त्व प्राप्त झालेले ते भगवंत जसजसे जवळ येऊ लागले तसतसा पंचवर्गीय भिक्खूचा निर्धार डळमळू लागला. भगवंत जवळ येताच त्या पंचवर्गीयांचा कुविचार पार बदलला. ते सर्व उभे राहिले, त्यातील एकानें पात्र घेतले, एकाने चीवर घेतले, एकाने पाय धुण्यासाठी पाणी आणले आणि बसावयास आसन दिले.
याच पंचवर्गीय भिक्खूना ऋषिपतन (सारनाथ) येथील मिगदाय (हरणाची बाग) मध्ये बसून भ. बुद्धाने आपला नविन मार्ग उपदेशिला. आणि पूर्वी कोणासही साध्य झाले नाही असे अनुपम धम्मचक्र प्रवर्तित केले. आपणास प्राप्त झालेल्या नविन धम्माचे मुख्य तत्त्व सांगण्यासाठी त्यांनी पंचवर्गीय भिक्खूसमोर जे भाषण केले तेच “धम्मचक्र प्रवर्तन सुत्त" या नावाने प्रसिद्ध आहे. ज्या जागेवर बसून बुद्धाने हे प्रथम भाषण केले त्या जागेवर सम्राट अशोकाने बांधलेला विशाल 'धम्मेक स्तूप' आजही सारनाथला पहावयास मिळतो. २६०० वर्षांपूर्वी फिरविले हे धम्मचक्र आजही विश्वातील कोटयावधी मानवांना दुःखमुक्त शांतीचा अमर संदेश देत आहे. यावरून ते भाषण किती महत्त्वाचे, किती प्रभावी, किती अभिनव व किती प्रकाशमान असेल याची आज कल्पना येते!
भन्ते अश्वजित
सदधम्म बुद्धविहार,
आरतीनगर, औरंगाबाद
मो. नं. ९६७३२९२२९७
0 टिप्पण्या