बुलढाणा/प्रतिनिधी - खामगाव तालुक्यातील चितोडा गावामध्ये दलित समाजावर झालेल्या अत्याचारानंतर पीडित कुटुंबाला भेट दिली म्हणुन ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे खामगाव शहराध्यक्ष धम्मपाल नितनवरे आणि 20 कार्यकर्त्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी केदार यांनी सोशल 24 नेटवर्कशी बोलतांना सांगितले की, बुलढाणा जिल्ह्यातील चितोडा गावामध्ये दोन समाजामध्ये झालेल्या वादानंतर शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी चितोडा येथे जावून ॲट्रॉसिटी ॲक्ट विरोधात गरळ ओकली, दोन समाजामध्ये दंगल उसळविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आम्ही ऑल इंडिया पॅंथर सेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पीडित कुटुंबाला भेट देवून त्यांचे सात्वन केले. आम्ही भुमिका घेतली नसती तर स्थानिक पातळीवरील सामाजिक परिस्थिती आटोक्यात आली नसती.
दरम्यान, आमदार गायकवाड यांच्या बेताल वक्तव्याचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निषेध करण्यात आला. आणि त्यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीसह ऑल इंडिया पॅंथर सेनेने केली होती. पंरतु पोलिस प्रशासनाने आमदार गायकवाड यांच्यासह 90 कार्यकर्त्यांवर आपत्ती व्यवस्थान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गतच गुन्हा नोंद व्हावा, अशी मागणी लावून धरली आहे.
केदार पुढे म्हणाले की, पोलीस प्रशासनाने माझ्यासह वंचित बहुजन आघाडीच्या शहराध्यक्ष आणि 20 कार्यकर्त्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कोरोनाकाळात गर्दी जमविल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याचा आम्ही तीव्र निषेध करतो. ठाकरे सरकार पीडितांना न्याय देण्याची मागणी करणे गुन्हा ठरविणार असेल तर आम्ही समाजरक्षणासाठी कायम लढत राहू. माझ्या आधी बुलढाण्याचे खासदार, मलकापूर येथील आमदार संबंधित स्थळाला भेट देण्यासाठी आले होते. त्यांच्यावर कोणतीही कारवाई नाही. पोलिस प्रशासन कोरोनाचे एवढे काटेकोर पालन करीत असेल तर शांतता समितीची बैठक शेकडो लोकांच्या उपस्थितीमध्ये कशी घेतली याचा जाब पोलीसांनी द्यावा, आमदार गायकवाड यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत तात्काळ गुन्हा नोंदवून त्यांची आमदारकी खारिज करण्यात यावी, अशी मागणी यावेळी दिपक केदार यांनी केली आहे.
0 टिप्पण्या