डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील संशोधक विद्यार्थ्यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अॅड. के. ई. हरिदास, प्रा. भारत सिरसाट, विद्यार्थी नेते प्रकाश इंगळे, अमोल खरात, अमरदीप वानखडे, रविंद्र गवई, संतोष अंभोरे आदी उपस्थित होेते.
औरंगाबाद/प्रतिनिधी - बाबासाहेबांचे विचार हे समताधिष्ठित समाज व्यवस्थेची निर्मिती करणारे आहेत. त्यांचा जयजयकार करण्यापेक्षा, त्यांना प्रतिकांमध्ये अडकविण्यापेक्षा त्यांचे कार्य कृतीत उतविण्याची आज गरज आहे. बाबासाहेब समजून घ्यायचे असतील तर त्यांना प्रतिकांमध्ये अडकवू नका, असे प्रतिपादन फुले-आंबेडकर विद्वत सभेचे मा. जिल्हाध्यक्ष प्रा. भारत सिरसाट यांनी केले.
ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील रिडिंग हॉलच्या विद्यार्थ्यांनी (आज ता. 6 रोजी) आयोजित केलेल्या व्याख्यानाच्या कार्यक्रमातुन बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सत्यशोधक समाज प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड. के. ई. हरिदास तर विचारमंचावर सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे मा. प्रदेश महासचिव प्रा. प्रकाश इंगळे, सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे अमोल खरात आदी उपस्थित होते.
पुढे बोलतांना प्रा. सिरसाट म्हणाले की, तरूणांनी राष्ट्र उभारणीमध्ये आपले योगदान दिले पाहिजे. विज्ञानवादी दृष्टीतुन देशामध्ये घडणा-या घडामोडींकडे पाहिले पाहिजे. फुले-शाहू-आंबेडकरांनी जातिअंताची चळवळ बळकट करण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला आज मात्र जात बळकट करण्याचे प्रयत्न होत आहेत. याला हाणुन पाडण्याची जबाबदारी तरूणांची आहे. अॅड. हरिदास बोलतांना म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या प्रत्येक कृतीवर केवळ संशोधन न करता त्यांचे विचार अंमलात आणण्यासाठी संशोधक विद्यार्थ्यांनी स्वतःपासून सुरूवात केली पाहिजे. बाबासाहेबांचे विविध पैलु आपण समाजासमोर मांडले पाहिजे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रविंद्र गवई यांनी केले. सूत्रसंचालन अमरदीप वानखडे यांनी केले तर आभार अॅड. नागसेन वानखडे यांनी मानले. यावेळी संतोष अंभोरे, अनिल दिपके, राजेश शेगांवकर, अफसर शेख, अक्षय मोरे, प्रा. आकाश लोणकर, अजय तुरूकमाने आदींसह संशोधक विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते.
0 टिप्पण्या