औरंगाबाद येथे 10 वा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर्स लॉयर-डे उत्साहात संपन्न
औरंगाबाद/प्रतिनिधी - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना संविधान सभेत येण्यासाठी दरवाजाच नाही तर खिडकी सुद्धा बंद करू अशी भुमिका तत्कालीन सर्व कॉंग्रेसच्या पुढा-यांनी घेतली होती. त्यावेळी सरकारमध्ये सर्वपक्षीय नेते असल्यामुळे, राजेंद्र प्रसाद तसेच ब्रिटीश सरकारच्या दबावापोटी जागतिक विद्वान असलेल्या बाबासाहेबांना संविधानसभेत स्थान मिळाले आहे. हा ज्वलंत इतिहास लिखित स्वरूपात उपलब्ध असतांना केवळ गांधीजींच्या आग्रहाखातर बाबासाहेब संविधानसभेत निवडुन आले असे सांगणे ही निव्वड भाकडकथा असल्याचे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्रे व साधने प्रकाशन समितीचे सदस्य सचिव तथा ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत डॉ. प्रदीप आगलावे यांनी केले.
ते 10 व्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर्स लॉयर-डे निमित्त (ता. १७ डिसेंबर) तापडिया नाट्य मंदिरात आयोजित कार्यक्रमातुन बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अॅण्ड गोवाचे माजी अध्यक्ष तथा मंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे अॅड. व्ही. डी. साळुंके यांनी केले. प्रमुख वक्ते म्हणुन संविधान विश्लेषक डॉ. अनंत राउत उपस्थित होते. पाहुणे म्हणुन अॅड. नितीन चौधरी, अॅड. सुहास उरगुंडे, अॅड. एस. एस. चौधरी, अॅड. अमोल सावंत, अॅड. सतीश तळेकर, अॅड. विजय साकोळकर, ऑ. एस. बी. बाखरिया, अॅड. डी. आर. शेळके, अॅड. उत्तम तेलगांवकर, अॅड. एस. एस. काझी, अॅड. श्याम अरोरा, अॅड. कैलास बगनावत, अॅड. योगेश फाटके आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला कार्यक्रमाचे मुख्य संयोजक तथा स्वागताध्यक्ष अॅड. एस. आर. बोदडे यांनी प्रास्ताविकामध्ये सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 5 जुलै 1923 रोजी आपल्या वकीली व्यवसायाला सुरूवात केली हा दिवस संपुर्ण भारतामध्ये केवळ औरंगाबाद येथे गेल्या 10 वर्षापासून आम्ही साजरे करीत आहोत.
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर लॉयर डे विधी सेवा पुरस्कार अॅड. नितीन चौधरी, अॅड. सुनिल मगरे, अॅड. एस. एस. काझी, अॅड. विजय साकोळकर, अॅड. अभय राठोड, अॅड. योहान मकासरे आदींना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
संविधान विश्लेषक डॉ. अनंत राउत बोलतांना म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ कलमांचा सापडा रचून कायदा निर्माण केला नाही तर या माध्यमातुन त्यांनी नवसंस्कृती निर्माण केली. आदर्श समाजव्यवस्था, आदर्श संस्कृती निर्माण करण्याची उर्जा भारतीय संविधानात समावली आहे. परंतु हे समजावून सांगण्यासाठी बुद्धीजीवी कमी पडल्यामुळे संविधान संस्कृती निर्माण होउ शकली नाही. परंपरावादी संस्कृतीला चिकटून राहिण्यापेक्षा संविधानवादी संस्कृती निर्माण करण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे. संविधान संस्कृती निर्मितीसाठी स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, संविधान दिन घराघरांत उत्सव म्हणुन साजरे झाले पाहिजे.
समारोपीय भाषणात व्ही. डी. साळुंखे म्हणाले की, भारतीय संविधानाने बोलण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. तो स्वैराचार नव्हे. राज्यकर्त्यांनी आणि संविधानिकपदावर असणा-या व्यक्तींनी भान ठेवून बोलले पाहिजे आणि माध्यमांनीही त्यांच्या बोलण्याचा जाती-जातींमध्ये तेढ निर्माण होईल असा अर्थ लावून बातम्या प्रसारित करू नये. बाबासाहेब आज असते तर त्यांना अभ्यासपूर्व भाषण करण्याचे स्वातंत्र्य असा कायदा करावा लागला असता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. भारत सिरसाट यांनी केले तर आभार अॅड. नागसेन वानखडे यांनी मानले. यावेळी मैनाबाई बोदडे, डॉ. संजय मून, डॉ. श्रीकिशन मोरे, डॉ. रेखा मेश्राम, अॅड. के. ई. हरिदास, डॉ. प्रज्ञा साळवे, अमरदीप वानखडे, क्रांती बोदडे, शांतीदूत बोदडे, रूपाली बोदडे, चेतन गाढे, डॉ. सागर चक्रनारायण, कुणाल वराळे आदींसह संविधनप्रेमी उपस्थित होते. मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या