डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात रमाईची १२५ वी जयंती उत्साहात साजरी
सागर धोडपकर
औरंगाबाद/प्रतिनिधी - भारतातील दलित, वंचित, पीडित, शोषितांचे, स्त्रियांचे दुःख, त्यांच्या वेदना नष्ट करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना प्रचंड संघर्ष करावा लागला. पोटच्या मुलांचा विचार न करता रमाईने बाबासाहेबांच्या कार्याला ऊर्जा देण्याचे काम केले आहे. त्या त्यागाची आपण जाण ठेवून आपल्या शिक्षणाचा वापर मोक्याच्या जागा हस्तगत करण्यासाठी केला पाहिजे, असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे महासंचालक डॉ. धम्मज्योती गजभिये यांनी केले.
ते समतेचे युवा पर्व भीमोत्सव समितीच्या वतीने रमाईच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षानिमित्त काल (दि. १० फेब्रुवारी रोजी) विद्यापीठाच्या मुख्य नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमातून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाणिज्य विभागाचे अधिष्ठाता प्रोफेसर डॉ. वाल्मिक सरवदे हे होते. प्रमुख वक्ते म्हणून रमाई मासिकाच्या संपादक प्रोफेसर डॉ. रेखा मेश्राम, वंचित बहुजन आघाडीचे नेते अमित भुईगड, अधिसभा सदस्य डॉ. सुनील मगरे, दत्ता भांगे, डॉ. आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही. के. खिल्लारे, ऍड. पंकज बनसोडे, कार्यक्रमाचे मुख्य संयोजक प्रा. प्रकाश इंगळे आदी उपस्थित होते.
पुढे बोलतांना डॉ. गजभिये यांनी बार्टी संस्थेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजना अनुसूचित जाती-जमातीच्या सर्वांगीण विकासामध्ये महत्वपूर्ण ठरल्या असल्याचे नमूद करीत पीएच. डी संशोधक विद्यार्थ्यांच्या फेलोशिप संदर्भातील प्रस्ताव शासनाकडे पाठवला असून त्यावर सकारात्मक प्रतिसाद मिळेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
यावेळी प्रोफेसर रेखा मेश्राम बोलतांना म्हणाल्या की, बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये रमाईचा प्रत्यक्ष सहभाग होता. अनेक सभा, आंदोलनांना त्या स्वतः उपस्थित राहत असत. महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहाला त्यांना जायचे होते परंतु त्यांची प्रकृती बरी नसल्याने त्यांना जाता आला नव्हते. बाबाहेबांच्या खांद्याला खांदा लावून रमाई त्यांच्या चळवळीत सहभागी होत होत्या. त्याग, करुणेपलीकडची रमाई आपण समजून घेतली पाहिजे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. प्रकाश इंगळे यांनी केले. सूत्रसंचालन ऍड. नागसेन वानखडे यांनी केले तर आभार अमरदीप वानखडे यांनी मानले. यावेळी महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक मेघानंद जाधव, कुणाल वराळे, डॉ. किशोर वाघ, चेतन चोपडे, अजय देहाडे आदींचा आंबेडकरी जलसा सादर झाला. कार्यक्रमाला विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या