रमाईच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती महोत्सवाची सांगता
सागर धोडपकर
औरंगाबाद/प्रतिनिधी - परिवर्तनवादी चळवळीत संशोधन करणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सक्रिय सहभाग नोंदविला तर आदर्श समाजव्यवस्था निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन फुले-आंबेडकर विद्वत सभेचे माजी जिल्हाध्यक्ष प्रा. भारत सिरसाट यांनी केले.
ते काल (दि. ११ फेब्रुवारी) विद्यापीठाच्या मुख्य नाट्यगृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ समतेचे युवा पर्व भिमोत्सव समितीच्या वतीने आयोजित दोन दिवसीय रमाई जन्मोत्सव कार्यक्रमातून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर्स लॉयर-डे चे प्रणेते ऍड. एस. आर. बोदडे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून अधिसभा सदस्य डॉ. योगीताताई तौर, ऍड. पंकज बनसोडे, सतीश गायकवाड, प्राचार्य व्ही. के. खिल्लारे, डॉ. कुणाल खरात आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना प्रा. सिरसाट म्हणाले की, रमाईने केवळ बाबासाहेबांशी संसार केला नाही तर या देशातील कोट्यवधींच्या संसाराचा उद्धार केला आहे. अनेक आघात सहन करूनही ती बाबासाहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली होती. संशोधक विद्यार्थ्यांनी आपल्या नोकरीला प्रथम प्राधान्य देत चळवळीत प्रत्यक्ष सहभाग घेऊन समाजाला दिशा देण्याचे काम करावे, हीच रमाईला खरी आदरांजली ठरेल.
योगीताताई तौर बोलतांना म्हणाल्या की, रमाईच्या प्रचंड त्याग आणि समर्पणाच्या बळावर बाबासाहेबांची चळवळ यशस्वी होत होती. रमाईने पावलो-पावली बाबासाहेबांना साथ दिली होती. रमाईची साथ होती म्हणून बाबासाहेब यशस्वी होऊ शकले.
अध्यक्षीय समारोप करताना ऍड. एस. आर. बोदडे म्हणाले की, रमाई शिक्षित नसली तरी जागतिक पातळीवरील 32 पदव्या मिळवणाऱ्या प्रकांडपंडिताची सावली बनली होती.
प्रास्ताविक प्रा. प्रकाश इंगळे यांनी केले, सूत्रसंचालन ऍड. नागसेन वानखडे यांनी केले तर आभार सुयश नेत्रगावकर यांनी मानले.
यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या कथेवर आधारित आणि रावबा गजमल दिग्दर्शित 'म्हसनातले सोने' ही एकांकिका सादर करण्यात आली.
0 टिप्पण्या