समतेचे युवा पर्व भीमोत्सव -2023 चा समारोप
सागर धोडपकर
छत्रपती संभाजीनगर/प्रतिनिधी - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आजपर्यंत अनेक गीतांची निर्मिती झाली आहे. अनेक गायक, कलावंत, संगीतकारांनी अतिशय सुंदर पद्धतीने ती गायली आहेत, संगीतबद्ध केली आहेत. परंतु बहुतांश गाण्यांची निर्मिती करतांना बाबासाहेबांच्या विचाराची पायमल्ली करणारी गीते मोठ्या प्रमाणात सादर होतांना दिसतात, ही अत्यंत गंभीर बाब असून आंबेडकरी सांस्कृतिक चळवळ बळकट करण्याचे मोठे आव्हान आपल्यासमोर असल्याची चिंता प्रसिद्ध लेखक, नाटककार तथा दिग्दर्शक अनिलकुमार साळवे यांनी व्यक्त केले.
ते (दि. 10 एप्रिल रोजी) समतेचे युवा पर्व भीमोत्सव -2023 च्या समारोपीय सत्रातुन बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनिलकुमार बस्ते हे होते. वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते अॅड. पंकज बनसोडे, प्रा. प्रकाश इंगळे, अविनाश सावंत प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते.
यावेळी चरण जाधव दिग्दर्शित ‘उन्हाच्या कटाविरूद्ध’ (नागराज मंजुळे यांच्या कवितासंग्रहावर आधारीत) काव्यनाट्याचे सादरीकरण झाले. त्यानंतर नितीन गायकवाड प्रस्तुत ‘प्रबुद्ध भीम भास्करा’ संगीत व नाटय आविष्कार कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. नागसेन वानखडे यांनी केले तर आभार अमरदीप वानखडे यांनी मानले.
विविध स्पर्धांचे निकाल आणि बक्षिस वितरण 14 एप्रिल रोजी
समतेचे युवा पर्व भीमोत्सव -2023 च्या वतीने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे निकाल दि. 14 एप्रिल रोजी विद्यापीठाच्या मुख्य नाट्यगृहात मा. कुलगुरू यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. विविध स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविलेल्या सर्व स्पर्धकांनी 14 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता मुख्य नाट्यगृहात उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजन समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या