प्रा. भारत सिरसाट संपादित एस. आर. बादडे यांचा ऐतिहासिक धम्ममार्च ग्रंथाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन
छत्रपती संभाजीनगर/प्रतिनिधी - आंबेडकरी चळवळीकडे ऐतिहासिक भान नसल्याचे आतापर्यंतच्या एकुण वाटचालीवरून लक्षात येते. अनेक आंदोलने होतात, मोर्चे निघतात, चळवळी चालविल्या जातात परंतु त्याचा कागदोपत्री इतिहास या चळवळीने विस्ताराने मांडला नाही, आमच्या धम्मकार्याच्या नोंदी आमच्याकडे नाहीत ही खंत असली तरी प्रा. भारत सिरसाट संपादित ‘ज्ञानभूमी ते दीक्षाभूमी’ (एस. आर. बोदडे यांचा ऐतिहासिक धम्ममार्च) या ग्रंथाने हा परीघ मोडीत काढला त्यामुळे हा ग्रंथ बौद्ध संस्कृतीची पाळेमुळे रूजविणारा आहे, असे गौरोद्गार ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक तथा विचारवंत प्रा. डॉ. ऋषिकेश कांबळे यांनी काढले.
ते शुक्रवारी (दि. 30 जून 2023 रोजी) भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्र येथे रामजी बोदडे मानव कल्याण सेवाभावी संस्था, औरंगाबाद (रजि.) प्रकाशन प्रकाशित आणि प्रा. भारत सिरसाट संपादित ‘ज्ञानभूमी ते दीक्षाभूमी’ (एस. आर. बोदडे यांचा ऐतिहासिक धम्ममार्च) ग्रंथाच्या प्रकाशन प्रसंगी बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत तथा समीक्षक डॉ. संजय मून हे होते. विचारमंचावर भ. डॉ. एम. सत्यपाल महाथेरो, प्रा. धम्मदर्शना महाथेरी, भ. सुगतबोधी महाथेरो, भ. धम्मज्योती महाथेरो, भ. ज्ञानज्योती महाथेरो, भदंत बोधीरत्न, डॉ. प्रमोद हेरोडे, प्रा. विजयकुमार गवई, ग्रंथाचे लेखक अॅड. एस. आर. बोदडे, मैना बोदडे, ग्रंथाचे संपादक प्रा. भारत सिरसाट आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात राजाभाऊ सिरसाट निर्मित 'भीमा तुझ्या जन्मामुळे' या बुद्ध भीम गीतांच्या कार्यक्रमाने झाली. एस. आर. बोदडे बोलतांना म्हणाले की, 2009 मध्ये औरंगाबाद ते नागपूर हा 600 किलोमिटरचा प्रवास पायी चालून आम्ही या धम्ममार्चमधून धम्म चळवळीचा प्रसार आणि प्रचार केला आहे. दररोज 15 ते 20 किलोमिटरचा प्रवास होत होता. या मार्गाने जाताना अनेक गावांना आम्ही भेटी दिल्या. गावागावात श्रद्धावान उपासक-उपासिकांनी सन्मान केला, सत्कार केला, सर्व व्यवस्था केली. या धम्ममार्चद्वारे मी धम्मचळवळीला गतिमान करण्यासाठी खारीचा वाटा उचचला असल्याचा आनंद आहे. संपादकीय भूमिका मांडतांना प्रा. भारत सिरसाट म्हणाले की, 2009 पासून या ग्रंथाची निर्मिती व्हावी म्हणुन आम्ही प्रयत्नशिल होतो. धम्ममार्चने भेटी दिलेल्या 80 गावांमधील महत्वाच्या नोंदी या ग्रंथामधून मांडल्या आहेत. हा ग्रंथ ऐतिहासिकतेला प्रकाशमान करणारा आहे. यावेळी भ. एम. सत्यपाल, डॉ. प्रमोद हेरोडे, भ. धम्मज्योती आदींची भाषणे झाली.
अध्यक्षीय समारोप करतांना डॉ. संजय मून म्हणाले की, धम्म सामाजिक परिवर्तनाचे तत्वज्ञान मांडणारा आहे, जगाच्या पूनर्रचनेचे तत्वज्ञान मांडणारा आहे. धम्मासमोर उभ्या असलेल्या आव्हानांवर चर्चा झाली पाहिजे. भारत बौद्धमय करण्यासाठी जातीच्या पलिकडे जावून काम करण्याची गरज असून धम्माला जातीत अडकविण्याचे प्रयत्न हाणून पाडले पाहिजे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार आनंद चक्रनारायण यांनी केले तर आभार अमरदीप शामराव वानखडे यांनी मानले. यावेळी धम्ममार्चमध्ये सहभागी झालेल्या सर्व श्रामनेर तथा उपासक-उपासिकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी क्रांतिदुत बोदडे, शांतिदुत बोदडे, रुपाली बोदडे, ज्योती बोदडे निंबाळकर, बनसोड, गंगाताई सुरडकर, गाडेकर साहेब, एड. नागसेन वानखडे, बोधाचार्य व्ही. के. वाघ, पंडितराव तुपे, प्रा. राजेश शेगांवकर, चेतन गाडे, डॉ. सागर चक्रनारायन, रतनकुमार साळवे आदींसह शहरातील उपासक-उपासिका उपस्थित होते.
0 टिप्पण्या