लेखी आश्वासनानंतर डॉ. प्रकाश इंगळे यांचे आमरण उपोषण मागे
छत्रपती संभाजीनगर/प्रतिनिधी - पीएच. डी संशोधक विद्यार्थ्यांना सक्तीने लागू करण्यात आलेली बायोमेट्रीक हजेरी रद्द करण्यात यावी, प्रगती अहवालाचे अवाजवी शुल्क कमी करण्यात यावे या मागण्यांसाठी संशोधक विद्यार्थ्यांनी विद्यार्थी नेते डॉ. प्रकाश इंगळे यांच्या नेतृत्वात दि. 2 नोव्हेंबर 2023 पासून आमरण उपोषण सुरू केले होते. उपोषणाच्या दोन दिवसांपर्यंत प्रशासनाशी कुठलीही सकारात्मक चर्चा झाली नाही. आज (दि. 4 नोव्हेंबर) उपोषणकर्त्यांच्या शिष्टमंडळाने कुलगुरूंची भेट घेतली असता या प्रकरणी कुलगुरूंनी आठवडाभरात तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर अखेर उपोषण मागे घेण्यात आले आहे.
विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने कुलगुरू, प्रकुलगुरू यांनी आंदोलनकर्त्यांची बाजू ऐकल्यानंतर बायोमेट्रीक रद्द करता येणारच नाही अशी सुरूवातीली भुमिका मांडली होती. परंतु परंतु डॉ. प्रकाश इंगळे बायोमेट्रीक हजेरी रद्द झालीच पाहिजे या मागणीवर ठाम राहिले. अखेर कुलगुरूंनी गुरूवारपर्यंत तज्ञांशी सल्लामसलत करून निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले. तोंडी झालेल्या चर्चेअंती बायोमेट्रीक हजेरीची अट शिथिल करण्यात येणार असल्याचे विद्यापीठ प्रशासनाने सांगितले. प्रशासनाच्यावतीने कुलसचिव डॉ. भगवान साखळे उपकुलसचिव कराळे, श्री. मोरे यांच्या शिष्टमंडळाने उपोषणस्थळी येउन उपोषण सोडविले. लेखी पत्र मिळाल्यानंतर संशोधक विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी करून विजयोत्सव साजरा केला.
0 टिप्पण्या