अकरावे रमाई महिला चळवळीचे साहित्य संमेलन शेगाव येथे उत्साहात संपन्न
शेगाव/प्रतिनिधी - फुले-आंबेडकर चळवळ ही मुळात समताधिष्ठित समाज निर्मित असल्याने ती मूलतः राजकीय चळवळ आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांती-प्रतिक्रांती सिद्धांत मांडून या चळवळीचा राजकीय संघर्ष स्पष्ट केला आहे. एवढेच नाही तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या एकूण चळवळीचा आधार हा राजकीय सत्तांतर हाच आहे. त्यांनी साऊथ ब्युरो कमिशनला दिलेल्या निवेदनापासून ते धर्मांतरापर्यंतच्या सर्व कृतींमागे राजकीय अधिष्ठान आहे. मात्र असे असूनही फुले-आंबेडकरी चळवळीच्या विचारवंतांनी राजकीय चळवळीकडे दुर्लक्ष केले आहे आणि त्यामुळेच ते फुले-आंबेडकरी चळवळीच्या विरोधकांच्या राजकीय षड्यंत्राला बळी पडत आहेत. विचारवंतांमध्ये राजकीय चळवळीचा अभाव असणे ही एक प्रकारे चळवळीला हानीच होय. जेवढ्या लवकर या चळवळीतील विचारवंतांना चळवळीच्या राजकारणाचे भान येईल तेवढ्या लवकर ही चळवळ यशाच्या दिशेने प्रवास करू शकेल, असे प्रतिपादन फुले-आंबेडकरी विचारवंत डॉ. संजय मुन यांनी केले.
ते स्थानिक वर्धमान भवन (जिजाऊ नागरी) येथे आयोजित ११ वे रमाई चळवळीचे साहित्य संमेलनातील "चळवळीतील विचारवंतांची राजकीय प्रगल्भता किती?" या विषयावर आयोजित परिसंवादाच्या अध्यक्षीय भाषणातून बोलत होते. प्रमुख वक्ते म्हणून प्रा. राजकुमार सोनेकर (खामगाव), भास्कर भोजने (बाळापूर), डॉ. मनोहर नाईक (नागपूर), डॉ. वसंत डोंगरे (खामगाव) आदी उपस्थित होते.
भास्कर भोजने बोलताना म्हणाले की, आंबेडकरी चळवळीतील विद्वानांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर राजकीय भुमिका घेऊन सवर्ण मानसिकतेच्या राजकीय पक्षांना अर्थात मविआला मतदान करा आणि बसपा तथा वंचित बहुजन आघाडीला मतदान करु नका म्हणून जो फतवा काढला तो अत्यंत अविवेकी आणि नालायकपणाचा होता. एवढेच नाही तर तो फुले आंबेडकरी विचारधारेच्या राजकारणासाठी अवसानघातकी होता. आंबेडकरी राजकीय चळवळीला मारक ठरणारे किंवा राजकीय अवरोध निर्माण करणारे, स्वतः ला विचारवंत म्हणवून घेणारे राजकीय प्रगल्भ नाहीत हेच त्यांच्या एकूण कृतीतून सिद्ध होते, भविष्यात अशा समाजद्रोही संधीसाधू लोकांपासून सावध राहिले पाहिजे असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
साहित्य संमेलनाच्या सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते संमेलनस्थळ अशी संविधान सन्मान रॅली काढण्यात आली. भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी बुद्ध वंदना घेतल्यानंतर संमेलनाचे उद्घाटन झाले. यावेळी संमेलनाच्या अध्यक्षा माया दामोदर, उदघाटक डॉ. विजयालक्ष्मी वानखडे, स्वागताध्यक्ष भाऊ भोजने, संमेलनाच्या मुख्य संयोजक प्रा. डॉ. रेखा मेश्राम उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा समन्वयक डॉ. राजकुमार सोनेकर, वंचितचे जिल्हाध्यक्ष देवा हिवराळे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष विशाखा सवंग, जिल्हा परिषद सदस्य राजाभाऊ भोजने, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष न. ल. खंडारे आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक करताना डॉ. रेखा मेश्राम म्हणाल्या की, फुले-आंबेडकरी चळवळीत महिला साहित्यिकांचे अत्यंत महत्त्वाचे योगदान आहे परंतु त्याला कायम बाजूला सारण्याचे पद्धतशीर प्रयत्न होताना दिसतात. महिलांनी निर्माण केलेल्या साहित्याची व्यापक स्वरूपाची चर्चा, मांडणी करण्याची संधी गेल्या १० वर्षांपासून रमाईच्या माध्यमातून आम्ही प्रयत्नशील आहोत.
भारतीय स्त्रीवाद : जिजाऊ, ताराबाई शिंदे, सावित्रीमाई फुले या विषयावर डॉ. अशोक इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद संपन्न झाला. वक्ते म्हणून प्रवीण कांबळे, सुषमा पाखरे, संजय डोंगरे, कैलास वानखडे, डॉ. भास्कर पाटील उपस्थित होते.
विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा यावेळी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. तसेच ज्येष्ठ कवयित्री सुरेखा भगत यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन संपन्न झाले. संमेलनाची सांगता भीम शाहिरी जलशाने झाली. यावेळी साहित्य-सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या