वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा महासचिव सागर भवते यांचा इशारा.
अमरावती/प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदने मनुस्मृतीचा पुरस्कार करणारा शैक्षणिक आराखडा जाहीर केला असून फुले - शाहू- आंबेडकरांच्या महाराष्ट्राला कलंकित करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे तेव्हा मनुस्मृती पुरस्कृत आराखडा तात्काळ रद्द करण्यात यावा अन्यथा भाजपा मंत्र्यांना अमरावती जिल्हाबंदी करू असा इशारा वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा महासचिव सागर भवते यांनी दिला आहे.
मनुस्मृतीने देशातील नागरिकांना समतेचा अधिकार, महिलांचे स्वातंत्र्य, विकासाच्या संधी नाकारल्या असल्याने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 25 डिसेंम्बर 1927 रोजी मनुस्मृतीचे दहन केले. आज मनुस्मृती मधील श्लोकांचा समावेश शैक्षणिक आराखड्यात होत असेल तर ही विद्यार्थ्यांकरिता मोठा धोका आहे. भाजपाने शैक्षणिक आराखड्याचे आडून राज्यातील शैक्षणिक व्यवस्थेमध्ये मनुस्मृती लादण्याचा प्रयत्न करू नये. समता, स्वातंत्र्य, बंधुता यांची शिकवण देणाऱ्या शिक्षण प्रणाली मध्ये विषमतेच्या विचारांची भेसळ करण्याचा डाव असून राज्य सरकार शैक्षणिक विकासाबाबत गंभीर नसल्याचा आरोप सागर भवते यांनी केला आहे.
शैक्षणिक व्यवस्थेमध्ये सर्व धर्मियांची मुले एकाच जागी शिक्षण घेत असून भारतीय संविधानातील धर्मनिरपेक्षतेची तत्वे आपण स्वीकारली असताना फक्त एका समूहाच्या शिकवणुकीचा अभ्यासक्रमात समावेश करणे हे अत्यन्त चुकीचे आहे. याद्वारे देशाच्या भावी पिढीला चुकीचा संदेश देण्याचा प्रयत्न राज्य सरकार कडून होत आहे तेव्हा सदर शैक्षणिक आराखडा तात्काळ रद्द करण्यात यावा अन्यथा भाजपच्या मंत्र्यांना अमरावती जिल्ह्यात फिरू देणार नसल्याचा इशारा जिल्हा महासचिव सागर भवते यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिला आहे.
0 टिप्पण्या