सुर्यपूत्र भय्यासाहेबांच्या स्मृती जपतांना...

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

सुर्यपूत्र भय्यासाहेबांच्या स्मृती जपतांना...

सूर्यपूत्र भय्यासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती दिनानिमित्त वंचित बहुजन युवा आघाडीचे अमरावती जिल्हा महासचिव सागर भवते यांचा लेख

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अखिल शोषित, पीडित समूहासाठी मानवमुक्तीचा लढा उभारत असताना जो संघर्ष करावा लागला त्या संघर्षामध्ये माता रमाई तथा आपल्या चार अपत्यांचे बलिदान  बाबासाहेबांना द्यावे लागले. प्रचंड गरिबी आणि संघर्षाच्या झळा सहन करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे एकमेव वारसदार समाजासमोर येऊ शकले ते म्हणजे सुर्यपूत्र भय्यासाहेब उपाख्य यशवंतराव आंबेडकर.


आज भय्यासाहेब आंबेडकर यांचे परिनिर्वाण होऊन पंचेचाळीस वर्षे लोटत असताना आपण भय्यासाहेबांना समजून घेतले का हा महत्वाचा प्रश्न आहे. जागतिक विद्वान तथा भारतीय घटनेचे शिल्पकार एवढेच नाही तर कोट्यवधी शोषित,  पीडित, वंचित समूहाचे उद्धारकर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा एकमेव वारसदार म्हणून भय्यासाहेब कसे जगले असेल हा खरच चिंतनाचा विषय आहे. सुर्यपूत्र हा एक शब्द कायम स्वाभिमानाने निष्कलंक ठेवण्यासाठी भय्यासाहेब आंबेडकर कायम झटत राहिले. आज जो तो उठतो आणि बोलतो की, मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वारसदार आहे, त्यांच्या विचारांचा वारसदार आहे. परंतु डॉ. बाबासाहेबांचे व

वारसत्व जपताना स्वाभिमान, संघर्ष, वेदना या बाबी सोबत घेऊन जगावे लागते हे मनुवाद्यांच्या दावणीला बांधलेल्या व बेगडी वारसत्व सांगणाऱ्यांना कदाचित माहीत नसेल.

सुर्यपूत्र भय्यासाहेब आंबेडकर कसे घडले याचा संपूर्ण इतिहास आज आंबेडकरी समाजासमोर येणे गरजेचे आहे. कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण झाल्यानंतर आमच्या प्रत्येक घरात एक नवा विद्वान निर्माण झाला आणि आपापल्या सोयीचे बाबासाहेब प्रत्येकाने मांडणे सुरू केले आहे. परंतु आंबेडकरी कुटुंबाचा संघर्ष आणि आंबेडकरी वारसांचा संघर्ष समाजासमोर मांडण्यास तथाकथित विद्वान समोर का येत नाही हा कायम अनुत्तरित असलेला प्रश्न आहे. सुर्यपूत्र भय्यासाहेब आंबेडकर यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेली चळवळ उभी करण्याचा प्रयत्न करत असताना कुणी भय्यासाहेब आंबेडकर यांना बदनाम केले तर कुणी भय्यासाहेबांच्या कार्यात अडथडे आणले, आंबेडकरी कुटुंबाच्या व राजगृहाच्या विरोधात कोण होते याची मांडणी होऊन जेव्हा ते उजेडात येतील तेव्हा स्वार्थी आंबेडकरी वारसा सांगणाऱ्याना पडता भुई थोडी असेल.. सुर्यपूत्र भय्यासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेल्या भीमज्योत यात्रेमधून समाजाच्या एक एक पैशातून आज आम्हाला चैत्यभूमीचे स्मारक दिसत आहे. परंतु चैत्यभूमी स्मारकाच्या शिल्पकाराचा आम्हाला विसर पडू नये याकरिता भय्यासाहेबांचे कार्य नव्या पिढीसमोर आणणे अगत्याचे आहे. आज घडीला राजगृहाचा आणि चैत्यभूमीचा इतिहास नव्या पिढीने समजून घेणे गरजेचे आहे असे मला वाटते.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना निवडणूकित पराभव पत्करावा लागला, सुर्यपूत्र भय्यासाहेबांना सुद्धा प्रत्यक्ष राजकारणात काम करता आले नाही, आज वंचित समूहाचे एकमेव सूर्य असलेले श्रद्धेय ऍड. बाळासाहेब आंबेडकर वारंवार पराभवाला सामोरे जात आहे आणि आमचे रक्त पिणारे, आमचे वर्षानुवर्षे शोषण करणारे आमच्याच मतांच्या जोरावर सत्ता भोगत आहे. राजकीय शहाणपण आम्हाला कधी येणार हा कळीचा मुद्दा आहे. मुंबईच्या चैत्यभूमीवर आणि नागपूरच्या दीक्षाभूमीवर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करायला येणाऱ्या प्रत्येकाने जर आंबेडकर या नावासोबत इमान राखले तर महाराष्ट्राच्या राजकारणातून आंबेडकर नाव कधीच हद्दपार होणार नाही एवढे मात्र निश्चित...!

आज 17 सप्टेंबर म्हणजे सूर्यपुत्र भय्यासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा क्रांतिकारी स्वाभिमानी वारसा निष्कलंकपणे जपत बौद्ध धम्माच्या अविरत विस्तारासाठी आपले आयुष्य वाहून घेतलेल्या सुर्यपूत्र भय्यासाहेबांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन...!


- सागर भवते

वरखेड, ता. तिवसा. जि. अमरावती

मो. 9850528687

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या