रमाई मासिकाचा १६ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा.
छत्रपती संभाजीनगर/प्रतिनिधी -
रमाई मासिकाच्या माध्यमातून डॉ. रेखा मेश्राम यांनी वंचित, बहुजन समाजातील महिलांना लिहिते करण्यासाठी, व्यक्त होण्यासाठी निर्माण केलेली संधी ही फुले - आंबेडकरी चळवळीला बळकटी देणारी असून रमाई मासिक हा फुले - आंबेडकरी चळवळीचा महत्त्वाचा दस्तऐवज आहे, तो जतन करण्याची जबाबदारी फुले - आंबेडकरवाद्यांचा आहे, अनेक माध्यमे उभी राहतात परंतु दीर्घकाळ टिकत नाहीत, रमाई मासिकाचा चळवळीतील वृत्तपत्रांप्रमाणे इतिहास होऊ देऊ नका, असे प्रतिपादन फुले-आंबेडकर विद्वत सभेचे भास्कर भोजने (अकोला) यांनी केले.
ते मराठवाडा साहित्य परिषद, रॉक्सी टॉकिजजवळ, पैठणगेट येथे आयोजित रमाई मासिकाचा १६ वर्धापनदिन व भारतीय स्त्रीमुक्त दिना निमित्त आयोजित कार्यक्रमातून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. संजय मून हे होते. प्रमुख वक्ते जिजाऊ ब्रिगेडच्या अॅड. वैशाली डोळस व बौद्ध विचारवंत डॉ. भगवान धांडे हे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध विचारवंत प्रा. डॉ. अरुणा लोखंडे, सत्यशोधक समाजाचे अॅड. के.ई. हरिदास, बौद्ध साहित्यिक डॉ. धनराज गोंडाणे, वंचित बहुजन महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष, कोमल हिवाळे, वंचित बहुजन महिला आघाडीच्या शहराध्यक्ष वंदना जाधव व साधना पठारे आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकात रमाई फाऊंडेशनच्या प्रा. रेखा मेश्राम (संपादक रमाई मासिक) म्हणाल्या की, रमाई फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या १६ वर्षापासून रमाई मासिक अविरतपणे चालवले जात आहे. विविध उपक्रम राबवून फुले - आंबेडकरी विचारधारा रुजविण्याचे काम सातत्याने केले जात आहे, रमाई स्मृती दिनी दरवर्षी रमाई महिला चळवळीचे साहित्य संमेलन महाराष्ट्रभर भरविले जातात, समताधिष्ठित समाजव्यवस्थेच्या निर्मितीसाठी रमाई फाऊंडेशन, रमाई मासिक अविरतपणे काम करीत आहे व भविष्यातही करत राहील.
कार्यक्रमाची सुरुवातीला भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेचे डॉ. वंदना पाटील यांनी केले वाचन करून झाली. रत्नकला बनसोडे यांनी यावेळी कविता सादर केली. कांता अहिरे यांनी राजस्थान मधील जयपूर हायकोर्टातील मनूच्या पुतळ्याला काळे फासले होते त्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. माजी नगर सेविका शकुंतला धांडे, लढाऊ कार्यकर्त्या रेखा उजगरे यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला.
ॲड. वैशाली डोळस बोलताना म्हणाल्या की, माध्यमांची मुस्कटदाबी होत असताना रमाई मासिक निर्भिडपणे १६ वर्षापासून अविरत सुरू आहे, तत्वांमध्ये आणि विचारांमध्ये होत असलेली घुसळण थांबली पाहिजे, भाजपा, काँग्रेसमध्ये राहून स्वतःला कट्टर आंबेडकरवादी म्हणणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे त्यामुळे आंबेडकरवादी म्हणजे कोण? याची नव्याने मांडणी करण्याची गरज आहे. बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली परंतु आजही मनुस्मृती नष्ट झाली आहे का? हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. सूत्रसंचालन दैवशीला गवंदे यांनी केले आभार ललिता खडसे यांनी मानले.
कार्यक्रमाला मान्यवर डॉ. यशवंत खडसे, ॲड. जयश्री भगत, राजन किर्तने, कांचन गादेकर, सी. पी. पाटील, रतनकुमार साळवे, मनोरमा बनसोडे, सविता अभ्यंकर, धम्मप्रिया खरात, संगीता अंभोरे, मंगल निकाळजे, मंगल मुन, गंगाबाई सुरडकर, मधुकर गवंदे, शैलेंद्र मिसाळ, प्रयाग म्हस्के, भीमराव गाडेकर, अनंत भवरे आदी उपस्थित होते.




0 टिप्पण्या