छत्रपती संभाजीनगर/ प्रतिनिधी - संगमनेर येथील सुजात फाउंडेशन संचलित 'कवी दिनकर साळवे स्मृती पुरस्कार-२०२६' ची घोषणा करण्यात आली आहे. यंदाचा हा पुरस्कार छत्रपती संभाजीनगर येथील 'रमाई' मासिकाच्या संपादिका आणि प्रसिद्ध व्याख्यात्या प्रा. डॉ. रेखा मेश्राम यांना जाहीर करण्यात आला आहे. सुजात फाउंडेशनचे हे पुरस्काराचे पाचवे वर्ष असून, सामाजिक आणि साहित्यिक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन ही निवड करण्यात आली आहे.
या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन शनिवार, १४ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५:३० वाजता संगमनेर येथील व्यापारी असोसिएशन हॉल, पडतानी कॉम्प्लेक्स येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सदस्य मा. डॉ. सुधीरजी तांबे भूषविणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून मुंबईचे ज्येष्ठ पत्रकार मा. ज्ञानेश महाराव उपस्थित राहणार आहेत.
या सोहळ्याला सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील विविध संघटनांनी आपला सक्रिय पाठिंबा दर्शवला आहे. यामध्ये राष्ट्रीय दलित पँथर, वंचित बहुजन आघाडी, आर.पी.आय., राष्ट्र सेवा दल, छात्र भारती, शिव आर्मी, शेतकरी संघटना, जयहिंद लोकचळवळ, लोकपंचायत, सत्यशोधक विचार मंच, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, मा. आमदार दादासाहेब रोहम फाउंडेशन, आधार फाउंडेशन, ऑल इंडिया पँथर सेना आणि बहुजन विकास परिषद अशा अनेक संयोजक संघटनांचा समावेश आहे.
डॉ. रेखा मेश्राम यांच्या निवडीमुळे साहित्यिक वर्तुळात आनंदाचे वातावरण असून, छत्रपती संभाजीनगरसह संपूर्ण जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


0 टिप्पण्या