बुद्धांचे शासन म्हणजे काय? - भन्ते अश्वजित

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

बुद्धांचे शासन म्हणजे काय? - भन्ते अश्वजित



बुध्द वंदनेमध्ये धम्मपालन गाथा आहे. त्या गाथेतील पहिल्या दोन ओळीमध्येच बुध्दांचे शासन म्हणजे काय? या प्रश्नाचे उत्तर सामावलेले आहे. ती गाथा आम्ही नेहमी म्हणतो परंतु त्या गाथेचा मूळ अर्थ आम्हाला माहित नसल्यामुळे आमच्या हातुन अकुशल कर्म घडत असतात. त्या एकाच गाथेचा मूळ अर्थ काय आहे हे जाणून घेऊन त्या गाथेनुसार आचरण केले तर प्रत्येक बौध्दवस्ती धम्म मार्गावर आरूढ होऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला समाज निश्चित घडू शकतो एवढी ती गाथा शक्तीशाली आणि प्रभावी आहे. त्यासाठी पहिल्यांदा आम्ही त्या गाथेचा अर्थ समजावून घेतला पाहिजे. गाथा अशी आहे;

सब्बपापस्स अकरणं कुसलस्स उपसंपदा

सचित्त परियोदपनं, एतं बुध्दानं सासनं ।।

सब्ब पापस्स = सर्व प्रकारची अकुशल कर्मे, अकरण = न करणे, कुसलस्स उपसंपदा = कुशल कर्म संपादित करणे, सचित्त परियोदपन चित्त शुध्द करा, एतं बुध्दानं सासनं हेच बुध्दाचे शासन आहे. म्हणजे कोणतेही पाप कर्म करू नये कुशल कर्माचा संचय करणे आणि चित्त परिशुध्द करणे हेच बुध्दांचे शासन आहे. आता आपण पाहू की, पापकर्म कोणती आहेत. तर यामध्ये तीन भाग पडतात ते म्हणजे काया, वाचा आणि मन. तर कायेचे पापकर्म तीन प्रकारचे आहेत.  

१) हिंसा करणे किंवा हत्या करणे. 

२) चोरी करणे. 

३) व्यभिचार करणे. वाचेचे पापकर्म चार प्रकारचे आहेत. १) निंदा करणे. २) चुगली करणे. ३) कठोर बोलून कोणाचे मन दुःखी करणे. ४) खोटे बोलणे. त्याचप्रमाणे मनाचे पापकर्म तीन प्रकारचे आहेत. १) दुसऱ्याच्या धनाबद्दल आसक्ती असणे. २) मनातून कुणाचा द्वेष करणे. ३)  मिथ्यादृष्टी असणे म्हणजे सम्यक मागींचे ज्ञान नसणे. किंवा मनात कुणाविषयी गैरसमज, संशय किंवा मतभेद असणे.  

तर अशा प्रकारचे हे दहा पापकर्म होत. बुध्द म्हणतात पापकर्म जी घडतात त्याला सुध्दा कारण आहे. 'माणूस हत्या का करतो तर त्याचे उत्तर तथागत सांगतात रागामुळे, द्वेषामुळे, गुढ मोहात गुंतल्यामुळे, लोभामुळे, निर्धन आपला उदरनिर्वाह चालविण्यासाठी, घमेंडी आपल्या दुष्ट स्वभावामुळे, मुर्ख लोक आपला खेळ समजून आणि राजा दंड देण्यासाठी. असे आठ प्रकारचे लोक जीवहिंसा करतात. चोरी करण्यासाठी मनाची लोभी वृत्ती, कपटी वृत्ती कारणीभूत आहे. आणि व्यभिचारासाठी आसक्ती कारणीभूत आहे. मनामध्ये चांगले विचार असतील तर आमचे हातून चांगले कर्म घडतील आणि वाईट विचार असतील तर आमच्या हातून वाईट कर्म घडतील. काही लोकांचे म्हणणे असे येते की, त्याने तर खून केले तरी तो कोटीतून पुराव्या अभावी सुटला आणि आता मस्त आरामात जगत आहे. काहींचे म्हणणे असे येते की, विजय माल्यासारखे अनेक लोकांनी फसवाफसवी करून जबरी चोऱ्या केल्या तरी ते या देशात आणि परदेशात ऐषआरामाचे जीवन जगत आहेत. आणि काही लोक म्हणतात बलात्कार करून सुध्दा जे लोक निर्दोष होतात तेही तर बिनधास्त जगत आहेत. ते जे लोक गुन्हा करूनही सध्या आरामात जगतात हे आपणाला वर वर दिसण्यासारखे आहे. प्रत्यक्ष पाहिल तर ते मुळीच सुखी नसतात त्यांना क्षणोक्षणी आपल्या पापकृत्याचा पश्चाताप होत असतो पण ते एवढे निगरगट्ट असतात की, त्याचा मागसुमही ते आपल्या चेहऱ्यावर दाखवित नसतात.

दुसरी गोष्ट महत्वाची आपण लक्षात घेतली पाहिजे ती ही की, अशा लोकांना एक ना एक दिवस कोणीतरी सव्वाशेर हा भेटतोच! आणि मग त्याला आपल्या पापाचे प्रायचित्त करायलासुध्दा वेळ मिळत नसतो. माणसाने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, ही जी पावसात भिजणा-याला सर्दी होतेच. मग तो कोणत्याही जाती धर्माचा असो, किंवा सांप्रदायाचा असो, वा पंथाचा असो! म्हणजे काय झाले त्याने निसर्गाचा नियम मोडला म्हणून त्याला लगेच शिक्षा झाली. त्याचप्रमाणे बुध्दांचा नियम म्हणजेच निसर्ग नियम आहे तो म्हणजे 'कराल ते भराल अन् पेराल तेच उगवेन' हा नियम आजपर्यंत तरी कुणाला सुटला नाही आणि यापुढे सुध्दा सुटणार नाही. हे माणसाने पक्के ध्यानात ठेवावे. त्यानंतर ही गाथा म्हणते 'कुसलस्स उपसंपदा' म्हणजे कुशल कर्म संपादित करावे संचित करावे. आम्ही आमचे घरात, घराबाहेर, सार्वजनिक ठिकाणी, समाजामध्ये आणि कार्यालयात जे काही दैनंदिन कामकाज करतो. ते करित असतांना किंवा केल्यानंतर आम्हाला सुख वाटत असेल, आनंद होत असेल आणि समाधान लाभत असेल तर निश्चित समजावे की, आपण जे करीत आहोत किंवा जे केले आहे. ते कुशल कर्म आहे, सत्कर्म आहे, पुण्यकर्म आहे. आणि जे करित असतांना किंवा केल्यानंतर आम्हाला कुठेतरी दुःख होत असेल, वाईट वाटत असेल, पश्चाताप होत असेल, वेळप्रसंगी आमच्यावर अश्रु गाळण्याची पाळी येत असेल तर समजून जावे की, आपण जे करित आहोत किंवा जे केले आहे ते पापकर्म होय, अकुशल कर्म होय, दुष्कृत्य होय. 

आणि सर्वात महत्वाचे म्हणजे माणसाने एक गोष्ट आपल्या अंत: करणात नेहमीसाठी कोरून ठेवावी ती ही की, कुशल कर्म आणि अकुशल कर्माचे फळ त्याच वेळेपासून आपला सावलीसारखा पाठलाग करून आपल्याला तश्या प्रकारचे फळ देत असते हे बुध्दवचन म्हणजे सत्यवचन होय. आणि ते त्रिकाल सत्य असते. त्यानंतर बुध्द म्हणतात आपल्या चित्ताला शुध्द करावे, निर्मळ करावे, पवित्र करावे. आमचे शरीर आणि आमचे कपडे मळलेले असतील, त्यावर घाण असेल तर ते आम्ही साबुने किंवा वॉशिंग पावडरने साफ करून ते स्वच्छ करू शकतो. मग मनही तसेच शुध्द करण्यासाठी काय करावे लागेल? तर त्यासाठी सुध्दा बुध्दांनी सम्यकदृष्टी, सम्यक वाचा, सम्यक संकल्प, सम्यक कर्मांत, सम्यक आजिविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी अशा आठ गुणांनी युक्त असलेला जडीबुटीचा फार उत्तम साबू दिला आहे. त्याचा आपण नियमित वापर केला तर आपल्या चित्तावर असलेली राग (आसक्ती) द्वेष, मोह, लोभ आणि मत्सर रूपी घाण निघून जाते आणि आपले मन शुध्द होते, निर्मळ होते, त्यासाठी आम्हाला अष्टांगिक मार्ग समजून घ्यावा लागेल.

१) सम्यक दुष्टीः माणसाला दुःखाचे अस्तित्व व दुःख निरोधाचा उपाय ही उदात्त सत्ये न समजणे ही अविद्या होय. या अविद्येचा नाश करणे हाच सम्यक दृष्टीचा मुख्य उद्देश आहे.

२) सम्यक वाचा: कुणाची निंदा न करणे, कुणाची चुगली न करणे, कठोर बोलून कुणाचे मन दुःखी न करणे आणि असत्य न बोलणे म्हणजे सम्यक वाचा होय.

३) सम्यक संकल्प : माणसाचे ध्येय, आकांक्षा आणि महत्वाकांक्षा उदात्त व प्रशंसनीय असावी. त्यासाठी योग्य संकल्प, पक्का निर्धार करूनच आपल्या जीवनाची वाटचाल करावी. हाच सम्यक संकल्पाचा आशय आहे.

४) सम्यक कर्मात : दुसऱ्याच्या भावना आणि त्यांचे हक्क यांचा मान राखून प्रत्येक कृती करावी म्हणजे योग्य कर्म करावे.

५) सम्यक आजिदिका : वाईट मार्गाने उपजिविका न करता आपला प्रपंच चालविण्यासाठी योग्य व्यवसाय करून उदरनिर्वाह करावा म्हणजे दारूचा धंदा, शस्त्रांची विक्री, विषाचा वापर, मांस विकणे आणि माणसांचा व्यापार करू नये.

६) सम्यक व्यायाम : सुविचार वाढीला लावून वाईट विचारांना थारा न देणे, वाईट विचार किंवा मनामध्ये वाईट विकार निर्माण झाले म्हणजे त्याचा नाश करणे यालाच सम्यक व्यायाम म्हटल्या गेले आहे.

७) सम्यक स्मृती : शरीरातील सुख-दुःखादी वेदनांचे वारंवार अवलोकन स्वतः नेहमी सजग राहणे सावध राहणे. आणि आपली आठवण पक्की करणे. अशा व्यकोतीने भौतिक लालसा व निराशा बाजूला सारलेल्या असतात म्हणून तो दुःखावर मात करतो, वेदनामुक्त होतो, शोकरहित होतो, सन्मार्गावरून चालतो आणि त्याला निब्बाणाची जाणीव होते.

८) सम्यक समाधि : कोणत्याही दुष्ट प्रवृत्तीपासून मन अलग ठेवून चित्त प्रसन्न आणि शांत ठेवणे. यामध्ये येणारे कामच्छंद (ज्ञानेंद्रिय उपयोग आनंद), व्यापाद (दुष्ट इच्छा), थिनमिध्द (आळस व सुस्ती), उप्दच्चकुक्कुच्च (चिंता व अस्वस्थता) आणि विचिकिच्छ (संशय वृत्ती) हे पाच अडथळे ध्यानाची एकाग्रता वाढू देत नाहीत. म्हणून अशा प्रवृत्तीपासून मनाला अलग करणे म्हणजे सम्यक समाधि होय. हेच बुध्दांचे शासन आहे, बुध्दाची शिकवण आहे.  

बुध्दांची शिकवण ही अखिल मानव जातीसाठी असते. म्हणून संपूर्ण मानव जातीने बुध्दांचे शासन, बुध्दांची शिकवण अंगिकारून आपले जीवन व्यतित करावे. कारण त्यापासून उन्नती होईल हानी होण्याचा प्रशच येत नाही. ही गोष्ट अखिल मानव जातीने आपल्या अंत:करणात खोलवर रुजवावी आणि बुध्द शासनाची अंमलबजावणी स्वताः पासून करून आपले जीवन सुखी बनवावे हाच बौध्द जीवन मार्ग होय. आणि हेच बुध्दांचे शासन आहे.



भन्ते अश्वजित

सदधम्म बुद्धविहार, 

आरती नगर,औरंगाबाद.

मो. नं. ९६७३२९२२९७

भन्ते अश्वजीत यांचे आणखी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

बौध्दांचा कायदा म्हणजे २२ प्रतिज्ञा !

संघर्षाचे नांव डॉ. बाबासाहेब आंबेडकर! 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे धम्म मिशन 

मातापितु उपट्ठानं 

दुःखाचे कारण आणि उपाय  सर्वप्रथम बुद्धांनीच सांगितले!

टिप्पणी पोस्ट करा

4 टिप्पण्या

Unknown म्हणाले…
अतिशय सोप्या भाषेत प्रत्येक व्यक्तिला समजेल असा लेख लिहिला आहे. सब्बपापस्स अकरणं कुसलस्स उपसंपदा

सचित्त परियोदपनं, एतं बुध्दानं सासनं ।। ही गाथा मी नेहमी म्हणायचो आज त्याचा अर्थ भंतेजी च्या सानिध्यात समजला. जयभीम नमो बुद्धाय !
Unknown म्हणाले…
Atishay sundar vivechan kel ahe buddha shasanache samzel evadhya sopya bhashet
Thank you so much bhanteji
sujay म्हणाले…
वंदामी भंन्तेजी,
सोप्या भाषेत सविस्तर सर्वांना समजेल असा खूप छान लेख लिहला आहे. धन्यवाद
साधू साधू साधू!
Unknown म्हणाले…
नमो बुद्धाय जय भीम वंदामी भंते.लेख साध्या सरळ सोप्या भाषेत लिहिला आहे. आज समाजात ज्या काही अडचणी समस्या आहेत ,त्यांच्या मुळाशी आपण धम्म पालनात केलेली हेळसांड हेच आहे. लेख प्रेरणादायी आहे. मनाला योग्य वळण लावून आपण कायिक वाचिक कुशल कर्म करू शकतो.त्यामुळे समाजात सुख शांती नांदू शकते. संपूर्ण जगात धम्मराज्य स्थापित होईल.आपल्या धम्म समाजकार्यास खूप खूप शुभेच्छा!!!